Literature

ज्येष्ठ शुद्ध अष्टमी

पापाचे कटू फळ दुःखच होय. असें कटुजीवन कोणाला आवडेल ? पण जीवन कष्टमय करणारी अशी पापकर्मे करू नयेत अशी भावना बाळगणारे कितीअभक्ष्यभक्षण, अपेयपान इत्यादी अनाचार व अगम्यगमन,परस्वाहार आदि महापातकी कृत्ये आपणांस प्रतिक्षणीं पहावयास मिळतात. त्यामुळे त्या पातकांचे फलरूप दुःख त्यांच्या मागे लागून त्यांना लटकल्यास त्यात आश्चर्यकारक असे काहीहि नाही. कष्ट न करता द्रव्य मिळविण्याची प्रवृत्तीहि अशा पातकांपैकीच. मजूर कमी कष्ट करून जास्त मजूरी मागतो तर मालक त्याच्या कष्टाचे चीज न करता, योग्य मजूरी न देतां पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतो. व्यापारी खोटी किंमत सांगतो, वेळेस शपथपूर्वक जास्त किंमत घेतो व मापहि कमी देतो. गिऱ्हाईक उधारी बुडविते. धनको चक्रवाढव्याज लावून एखाद्याच्या घरदारांचा निकाल लावतो तर ऋणको आपली मालमत्ता दुसऱ्यांच्या नांवे करून सावकारास चकवतो. जगातील दैनंदिन व्यवहारांत अशा हजारो गोष्टी चालतात. ही सर्व पापकर्मे होत, हें करणाऱ्याच्या ध्यानी येत नाही. पण त्या पापाचे फलरूप दुःख दारिद्र्य प्राप्त झाल्यावर मात्र देवास साकडे घालणे, स्वामींचे दर्शन घेऊन त्यांचा आशिर्वाद, प्रसाद, तीर्थ, मंत्राक्षता या सर्वांची त्यास आठवण होते. पण त्यावेळी तरी त्याचे मन शुध्द असते का ? मागील सर्व विसरून पुढे तरी पापमार्गे टाकून पुण्यमार्गाकडे वळावे असे त्यास वाटतें काय ? या प्रश्नाचे उत्तर देणे कठीणच. अशा मनुष्याने मनांतच विचार करून योग्य ती गोष्ट ठरविली पाहिजे.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img