Literature

ज्येष्ठ शुद्ध एकादशी

आजकाल अकाली मरणाचे प्रमाण वाढले आहे तसेंच वेडे व पिशाच्चबाधा झालेले लोकहि वाढलेले आढळतात. या सर्वांना कारण पापाचरणच होय. खरे सुख कोणते ? तें कसें प्राप्त केलें पाहिजे ? याची मुळीच कल्पना नसणें हेंच सर्व दुर्मार्गप्रवृत्तीस मूलकारण आहे. क्षणिक अशा इंद्रियसुखास मोहून जाऊन खरें शाश्वतसुख विसरलेल्या लोकांची संख्या जास्त असणें हेंहि एक कारण असूं शकेल. मानवी शरीर कसें आहे ? ते स्थिर आहे काय ? याचा थोडासा विचार करून पहा !

मानवी शरीर अपवित्र पदार्थांनी युक्त असून अपवित्र स्थानांत वाढून अपवित्र मार्गानेंच या जगात येतें. स्त्री-पुरूषाच्या अपवित्र रजारेताच्या संपर्काने बीजोत्पत्ती होते. मलमुत्रांच्या दुर्गंधमय कोषाजवळ हे बीज वाढत वाढत त्याचा गर्भपिंड होतो. मांसमय गर्भकोषांत नऊ महिने राहून आईने खाल्लेल्या उष्ट्या अन्नरसाने त्याची वाढ होते. श्वासोच्छवासासहि अवकाश नसतांना परमात्म्याच्या कृपेनेंच योनिमार्गाने बाहेर पडून ‘ आपण कोठें येऊन पडलों ? ‘ असें ओरडत तो भूमीवर येतो. हे ओरडणे ‘ या दुःखमय मानव लोकांत मी येऊन पडलों ? ‘ असे आत्मा म्हणतो याचेच दर्शक होय. जननसमयी शिशु मांसपिंडासारखे असून सर्व बाजूंनी छिद्रमय नवद्वारांनी मलमुत्रादि बाहेर टाकीत, त्याच्यातच पडून लोळत असते. यादृष्टीने विचार केल्यास मानवजन्माची खरी किंमत व योग्यता आपणांस कळणार नाहीं काय ?

श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img