Literature

ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी

परमार्थपरायण होऊन निवृत्तिमार्गावलंबी मनुष्यांना ‘आत्मा वै पुत्रनामासी |’ या श्रुतिवचनाचा काहींहि उपयोग नाही. कारण त्यांचा या वचनाशी काही संबंध येत नाही.

स्वतःची दुःखे जशी प्रबळ परिणामकारी भासतात त्याचप्रमाणे मुलांची सुखदुःखादि भासत नाहींत व तीं स्वतःशी संबंधितहि असूं शकत नाहींत. म्हणूनच ‘गौणात्मा’ पुत्रादि आत्मसुखस्वरूपी नाहींत.

‘मिथ्यात्मा’म्हणजे हे शरीर होय. खरें पाहिलें तर हें अचेतन व पंचमहाभूतात्मक आहे. जोपर्यंत शरीरांत चैतन्यस्वरूपीं परमात्म्याचे अस्तित्व आहे तोपर्यंत त्याचें चलनवलन व कार्यशक्ती हें सर्व असतें. ही चलनशक्ती कांहीं विशिष्ट कालावधीपुरतीच मर्यादित आहे व त्यालाच आपण ‘ आयुर्मान ‘ म्हणतो. ते संपल्यानंतर चेतनस्वरूपी प्राणपक्षी उडून गेल्यावर अस्थिपंजर शिल्लक रहातो. त्याला काय किंमत आहे ? त्याला कोणीहि आश्रय देत नाहींत तर त्याला अग्निंत किंवा मातीत विलीन व्हावे लागतें. तो तसाच ठेवल्यास दुर्गंधी सुटते व त्यामुळें घरहि दुर्गंधमय होते. प्रेमानें आलिंगन देणाऱ्या स्त्रीपुत्रादिकांनाहि ती दुर्गंधी असह्य होते.

रक्तमांसादियुक्त शरीर माझेंच आहे असें म्हणून व्यवहार करणारा मनुष्य शुद्ध अविचारीच होय,हा अविद्देचा प्रभाव आहे. आत्म्यामध्यें देहधर्म दिसणार नाहींत. देहोत्पत्तीमुळें आत्मा प्रसन्न होत नाहीं व देह नाश पावल्यामुळें आत्मा नाशहि पावत नाही.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img