Literature

ज्येष्ठ शुद्ध नवमी

पूर्वार्जित कर्मदुर्विपाकाचे फळ म्हणजेच दुःख बालविधवा ‘ कोणत्या दुष्कर्माचे फळ म्हणून माझ्या नशिबी हे दुःख आले ‘ असे म्हणेल. सदाचारी दंपतीस सर्व सुखे असूनहि पुत्रसंतती नसते असे कां ? हें कोणत्या पापाचें फळ ? रोगपीडित मनुष्यहि ‘ हें कोणत्या पापाचें फळ माझ्या नशिबी आले ? ‘ असें म्हणतो. याचे उत्तर ‘ पूर्वजन्मकृतं पापं व्याधिरूपेण पीड् यते | ‘ एवढेच हे कर्मार्जित कष्ट नाहिसे होण्यासाठी जप, होम, देवतार्चन इत्यादि सत्कर्मेच साधनभूत आहेत. असें आपले पूर्वज म्हणतात. सर्वजण आपापल्या कर्माची फळें भोगण्यासाठींच या कर्मभूमीस जन्म घेतात. पूर्वजन्मकृत कर्मास अनुसरून या जन्मीं जन्म मिळतो. आजच्या कर्माच्या सामर्थ्याने पुढील मार्ग सुगम करून घेतला पाहिजे.

सुखाने किंवा दुःखाने जन्म घालवून शेवटी एके दिवशी मृत्युवश होणें हे मानव जन्मास चुकत नाही. मरण म्हणजे सर्व त्यागाची शेवटची पायरी. ही पायरी कोणीहि चुकवूं शकत नाही. कोणास चुकली नाही. असें असल्याने मागील पायऱ्यामध्ये त्यागबुध्दी कां बाळगू नये ? आपण मिळविलेल्या संपत्तीतून दान, धर्मकर्माचरण यासाठीं कांही भागाचा त्याग कां करू नये ? सर्वसंगपरित्याग करणारे साधु सत्पुरूष होत. हे सर्वांना शक्य नाही. परंतु प्रपंचामध्ये असूनहि हळुहळु सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी सिध्द होऊन आपल्या भावी मार्गासाठी शिधारूपी अल्पस्वल्प त्याग करणे हितकर नव्हे काय ? कारण मृत्यू कोणालाच चुकत नाही.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img