Literature

ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा

विवेक बाळगून आपणांस जन्मसार्थक करून घेण्यास अनुकुल व्हावें म्हणून त्या करूणार्द्र भगवंतानें आपल्यावर दया करून विवेकशक्ती दिली आहे. योग्य, अयोग्य जाणून घेऊन त्यानुसार वागण्यासाठी तसेंच भगवद्कृपेनें आपले कष्टमय जीवन पुनीत करून घेऊन पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाहीं अशी सद्बुद्धी आपणांस प्राप्त होण्यासाठी परमात्म्याने कांही गोष्टी योजिल्या आहेत.

केवळ भगवत्स्वरूप असलेला परमात्मा क्षुद्र मानवी शरीराच्या आश्रयानें राहून सर्वसाक्षीभूत होऊन प्रकाशमान होतो ही गोष्ट सत्य आहे. मानवी शरीरस्थ परमात्मस्वरूप सर्व जगास प्रकाशमान करून ते अत्यंत अद्वितीय सच्चिदानंदस्वरूप सर्व ठिकाणी व्यापिले आहे. हें अखिल जग त्या आत्मप्रकाशानेंच प्रकाशित होतें. त्याचे अस्तित्व जगाच्या अस्तित्वास कारणीभूत आहे. परमेश्वर येथें आहे तेथें नाही ही जी मोहमय कल्पना आहे तिला मायाच कारणीभूत आहे. ही मायाच मानवाला अंध- कारांत लोटते. आत्म्याच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान न होतां इंद्रियसुखलालसेंत गुरफटून मानव चुकीच्या मार्गाने, त्याला मायाच कारणीभूत आहे एवढे समजून घेतलें तरी पुरें आहे. त्यानेंच मानवी जन्माचें सार्थक होईल. परमात्मा मानवदेहस्थ असला तरीहि अरणीतून प्रगट होणाऱ्या अग्निप्रमाणे स्वयंप्रकाशी आहे. तो सर्व कांही जाणतो व पहातो.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img