Literature

ज्येष्ठ शुद्ध षष्ठी

आपल्या जीवनांत योग्य कर्मे करून परमेश्वराच्या आमंत्रणाची मार्गप्रतिक्षा करणाऱ्यास मरणसुध्दा सुखदायक होतें. पक्वफळ जसें झाडावरून आपोआप गळून खालीं पडतें त्याप्रमाणें त्याच्या देहाचें पतन होतें. त्यांतहि सुख असतें. असे मरण आल्यास त्याच्या नात्यागोत्यातील लोकांनी कशासाठी रडावें ? पूर्वार्जित कर्मानुसार मिळालेला जन्म सन्मार्गानें घालविणाऱ्या मानवास जन्म दुःखविनाशासाठी कवटळणारा मृत्यु दुःखास कारणीभूत होत नाही. याच्या उलट पापाचरणानें जीवन व्यतीत करणारास मरण महाभयंकर व दुःखद वाटते.

दुःख कोणालाहि नको असलें, सर्वांना सुखच हवे असलें तरीहि सुख किती लोकांच्या वाट्यास येते ? मृत्युरूपी सुख मात्र सर्वांना मिळते. पण हा मृत्यु केव्हा सुखदायी होईल ? प्रपंचदुःख सहन न होणारे लोक मरणाची इच्छा करणारे असतात. पण तो मार्ग योग्य नसून तें मरणहि सुखद नसते. त्याला ‘ दुर्मरण’ असेंच म्हणावें लागेल. दुर्मरण म्हणजे आत्महत्या. हें महापापकर होय. दुःख नसावें हे योग्यच. पण दुःख झाल्यास त्याला तोंड देत देत झगडलें पाहिजे. सुखदुःखाकडे समदृष्टीने पाहणारे धैर्यवान लोक क्वचितच आढळतात. परंतु आपल्या नशीबीं दुःखच आहे अशी समजूत करून घेऊन सजीवपणीं शवरूपी होऊ नये. परमात्म्याच्या ठिकाणी मन गुंतवून सन्मार्गगामी होणें हीच दुःखशमनासाठीं महौषधी होय.

श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img