Literature

ज्येष्ठ शुद्ध सप्तमी

मनुष्यास पुण्यकर्मापासून प्राप्त होणारीं सुखें हवीं असतात पण पुण्यकार्य करण्याची त्याची तयारी नसते. पापाचें फळ असणारें दुःख त्याला नको असतें परंतु सदासर्वदा ते पापकर्मातच मग्न असतात. ही व्यवहांरातील एक सत्य गोष्ट आहे. प्रत्येक मनुष्यानें स्वतःच आपल्या मनांत विचार करून करावयाची ही गोष्ट आहे. आपल्या घरी याचक म्हणून आलेल्यास त्याच्या दृष्टीनें विचार करून त्याची असहायस्थिती लक्ष्यात घेऊन वाईट वाटून घेणारे किती लोक आहेत ? तीच स्थिती आपल्यावर आली असती तर काय झालें असतें याचा विचार करून तो कार्यवाहीत आणल्यास कोणीहि याचक शिल्लक रहाणें शक्य नाही. आपल्या शरीरास कष्ट पडू नयेत म्हणून भिक्षावृत्ती धारण करणाऱ्या लोकांची गोष्ट सोडून देऊ. कारण त्यांना सहाय्य करणें म्हणजे आळशीपणास आमंत्रण दिल्यासारखेच आहे असें व्यवहारी लोक म्हणतात हे खरंच आहे. परंतु कष्ट करून जीवन जगविणें खरोखरच अशक्य असणाऱ्या दीन, शक्तिहीन लोकांना आपण मदत करूं नये काय ? त्यांना मदत करणें पुण्यकर्म नव्हे काय ? असें केले असतां परमात्मा आपल्यावर अनुग्रह करणार नाही काय ? त्या पुण्याचें फळ आपणांस मिळणार नाही काय ? त्यामुळें आपण आत्मसुखसंपन्न होणार नाही काय ?

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img