Literature

तो आनंदरूपच तूं आहेस

विषई वैराग्य उपजले । तयासीच पूर्ण ज्ञान जालें । मणी टाकितांचि लाधलें राज्य जेवीं ॥ (दा. ५-६-६१) ज्याची कल्पना निमाली तो प्राप्तपुरुष ” आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु । बुद्धि तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च। । इन्द्रियाणि यानाहुर्विषयास्तेषु गोचरान् ।‘ (क. उ. अ. १ व २. ३-४) श्रुतिमाता प्रेमानें कुरवाळून साधकाला सांगते, बाळ तूं ज्या रथांत बसला आहेस तो रथ म्हणजे हा देह. तुझी सदसद्विवेक शक्ति बुद्धि हा रथ हांकते; म्हणजे बुद्धि सारथी आहे. हिच्या हातांत असलेला लगामच मन.. या रथाला लावलेले मोठे उद्दाम घोडे म्हणजेच हीं इंद्रिये. साहजिक विषयांकडे असणारी यांची धाव चुकवून तुला ब्रह्मरूपाच्या वैराग्य मार्गानें यांना न्यावयाचे आहे. त्याकरितां तुझा विचार सारथ्याला कळवून, मनाचा लगाम घट्ट आवळायला लावून, इंद्रिये तुझ्या इच्छेप्रमाणे वागतील असे त्यांना वळवून तुझे उद्दिष्ट मोठ्या शिताफीनें पार पाड. यस्तु विज्ञानवान्भवति स मनस्कः सदा शुचिः| स तु तत्पदमाप्नोति यस्माद्भूयो न जायते || विज्ञानसारथिर्यस्तु मन: प्रग्रहवान्नरः| सोऽध्वनः पारमाप्नोति तद्विष्णोः परमं पदम् ॥(क. उ. अ. १ व उ. ३,८-९) ज्याची बुद्धि आत्मज्ञानपूर्ण आहे. ज्याचे मन शुद्ध होऊन आत्मध्यानासक्त झाले आहे, तो जन्ममरणात्मक वैषयिक मार्गाच्या पार पलीकडे असणाऱ्या पुनर्जन्मशून्य परमपदाकडे वेगाने रथ न्यावयाला लावून तेथेंच स्थिर होतो.हेंच ते ब्रह्मपद,हेंच विष्णुपद, हेंच आत्मपद. इंद्रियेभ्यः परा ह्यर्था अर्थेभ्यश्च परं मनः । मनस्तु परा बुद्धिर्बुद्धे रात्मा महात्परः || महतः परमंव्यक्तमव्यक्तापुरुषः परः | पुरुषान्न परं किंचित्सा काष्ठा सा परागतिः| (क.उ.अ.१ व ३/१०-११) विषयांच्या करिताच इंद्रिये असल्यामुळे इंद्रियांपेक्षा विषय श्रेष्ठ, विषयांपेक्षा मन, मनापेक्षा बुद्धि, बुद्धि पेक्षा महत्तत्व,महत्तत्वापेक्षा अव्यक्त,अव्यक्तापेक्षा पुरुष श्रेष्ठ ;पुरुषापेक्षा मात्र दुचसरे कोणीहि मोठे नाही. ‘पुरुष एवेदं सर्वं (पु.सू) तोच हे सर्व आहे, असे पराकाष्ठेंचे आनंदरूपच जर तु जाणलेंस, तर ते तुझे आणि या अखिल जगाचे यथार्थ रूप आहे.

श्रद्धा ठेव. ‘यत्परं ब्रह्म सर्वात्मा विश्वस्यायतनं महत्  | सूक्ष्मात्सूक्ष्मतरं नित्य तत्वमेव तत् ॥‘ (कै.. १६) जे अतिसूक्ष्म, संविन्मात्र आनंदरूप या विश्वातल्या सर्व सुखांचे खरें आधारभूत आहे ते सर्वात्मरुप् असल्यामुळे तुला सोडून नाही. ते ब्रह्मच तू आहेस. शंका न धरता अखिल जगाचा आनंदच तू होऊन निरंकुश नांद. ‘ॐ यो ह वै श्रीपरमात्मा नारायण: स भगवान्स्तत्परः परमपुरुष: पुराणपुरुषोत्तमो नित्यशुद्धबुध्दमुक्तसत्य परमान्ताद्वयपरिपूर्णः परमात्माब्रम्हैवाहं रामोऽस्मि |  (वारसारोप. ३-८). ॐकारलक्ष्य जो परमात्मा श्रीमान् नारायण भगवान, मायेहून पर परमपुरुष, पुराणपुरुषोत्तम नित्य शुद्ध मुक्त सत्य परम अनंत, अद्वय, आनंदरूप तो राम, तें परब्रह्म मीच ही जाणीव ठेव. ‘भूर्भुवः सुवस्तस्मै  वै नमो नमाः ।। ( श्रीराम उ. ता १). म्हण-तुझे अस्तित्व भातित्व, प्रियत्व त्या मुळच्या सच्चिदानंदरूपी, नमो नमः म्हणून, एकरूप करून टाक. सोऽहंभावो नमस्कारः। सोऽहंभाव म्हणजेच नमस्कार. आता स्वस्थ ऐस. अभय आनंदमात्रच तू. तुझ्या चिंतनाने इतर प्रारंभीच्या साधकांची भीति नाहीशी होत जाईल. ‘देखता मृगजळाचे पूर। म्हणे कैसा पावों पैलपार | कळतां तेथींचा विचार । सांकडे कैचें ॥” (दा. ८-८-४२) स्वरूपनिष्ठेने जे, या आपल्या अज्ञानाने केवळ भासणाऱ्या मायानदीच्या उगमापलीकडे गेले, आनंदस्वरूपांत एकरूप झाले आणि मग पोहून आलेली नदी किती मोठी आहे पहावे म्हणून त्यांनी मागे वळून पाहिले– तंव तें पाणीच आटलें । काहीं नाहीं ॥ (दा. ११-३-२१) आहे. तितुकें नाहीं जालें। नाही नाहीपणे निमाले ।आहे नाही जाऊन उरले। नसोन काहीं ॥ (दा. ६-१०-३८). वृत्तिशून्य योगेश्वर । याचा पहावा विचार ।दास म्हणे वारंवार ।किती सांगों ॥ (दा. ११-७-२२) महाराज, आता सांगणे पुरे. आमचा निश्चय झाला. आम्ही नित्य निर्विकार, अद्वितीय आनंदरूपच आहोत.

home-last-sec-img