Literature

परमात्म प्राप्ती

वेद त्रिकाण्डात्मक आहेत – कर्म, उपासना व ज्ञान. कर्म, उपासना व ज्ञान ही क्रमशः सच्चिदानंद ब्रह्माच्या लक्षणाची पूर्वता. ब्रह्म म्हणजे ‘यतो वा इमानि भूतानि जायन्ते’ जे कांही ह्या जगाला मुख्य कारणीभूत बनले आहे त्यास ‘ब्रह्म’ असे नाव आहे. ते जगाच्या पूर्वी त्या जगाचे कारणरूप असून ते अत्यंत महान आहे. त्यात सर्व चराचर विश्व सामावले आहे. सर्वाच्या पूर्वीचे, सर्वांचे ते सर्वप्रथम आहे. सर्वांची उत्पत्ति ह्यातूनच झाली. त्याच्या सत्यतेमुळेच हे जग दृग्गोचर होते. ह्यातीलच अणुरेणूत ब्रह्म भरलेले आहे. जे सर्वात भरलेले असते, व्यापिलेले असते तेच कारण ! जे अविच्छिन्नपणे अखंडतेनें व्यापून उत्पत्ति, स्थिति, लयामध्ये निर्विकारपणे आहे तेच मूळ कारण, सर्व जगाचे कारण असणारेच जगाचे मूळकारण, अनंतासहि हेच कारण.

मडक्यात जशी माती हे मूळ असते तसेच सुवर्णालंकारात सोने असते. ज्याप्रमाणे मडक्यात माती व अलंकारात सोने मूळ कारण असते त्याप्रमाणे ब्रह्म हे कार्यरूप अशा जगतात कारण बनून जगाला व्यापून आहे. तेच जगाचे ज्ञान ! त्याच्याद्वारे रचिले गेलेल्या, तयार करण्यात आलेल्या जगात ‘सुख आहे’ असे दिसते. आता आपण मडक्याच्या दृष्टांताचा विचार करू या ! मडक्याच्या स्वरूपातून माती काढून घेतली. तर ‘मडके’ हे नाव तरी शिल्लक राहील काय ? तात्पर्य, कारण कार्याला व्यापून असते पण कारण नाहीसे झाले, निघून गेले तर कार्याचे अस्तित्वव रहात नाही. कार्याचे अस्तित्व कारणामुळेच नाही का ? कार्याचे अस्तित्व, जीवन कारणच. सोने ह्या कारणामुळेच दागिन्याचे अस्तित्व असते; नाही का ?

मातीच्या मडक्यात मातीच स्पष्टपणे दिसते. जगाकडे पाहिले तर आपणास जगच दिसते. खांबामध्ये लाकूड दिसते. सोन्याच्या विविध अलंकारांना, दागिन्यांना आपण विभिन्न नामरूपांनी ओळखतो, त्याप्रमाणे जग कारणास विविध नामरूपांनी दाखविते. झालेल्या कार्याला कोणते तरी रूप आहे, नाव आहे. अलंकार किंवा दागिने वेगवेगळे असले तरी त्यांना कारण असणारे एकमेव सोनेच होय. जगाला कारणरूप असलेल्याला ‘ब्रह्म’, ‘परमात्मा’ अशी निरनिराळी नावे आहेत. माझे ‘श्रीधरस्वामी’ असे नाव, तुझे ‘भागवत’. ‘भागवत म्हणजे मी नव्हे, त्या नावाने मी ओळखला जात नाही. जसे नारळ, केळी, सुपारी इत्यादि जगांतील पदार्थ भिन्न भिन्न आहेत; तसेच भिन्न भिन्न कार्यरूपांना कारणरूप असणारे तेच ‘ब्रह्म’ ! ते एकमेव आहे. अनेक पदार्थांना बनविणारी, अनेक पदार्थात सामावलेली एकच वस्तू. ज्याप्रमाणें निरनिराळ्या धातूंद्वारे घडलेल्या कार्यरूपी वस्तूंना ही पितळेची, ही सोन्याची असे संबोधल्याप्रमाणे, अशा अनेक प्रकारच्या वस्तूंना आधार असणारे एकमेव ब्रह्मच. हे जग अनेक गोष्टींनी व्यापिले असून त्या सर्वांना कारणीभूत असणारे एकटेच ब्रह्म होय.

एक कारण व एक कार्य अशा दोन्हीही दृष्टीने पहावयाचे असते. सोन्याला कस लावून त्याचे वजन करून त्याची किंमत ठरविली जाते. सराफ दागिन्यामधील सोन्यालाच फक्त कस लावून त्यातील सोन्याची परीक्षा करून किंमत ठरविण्याप्रमाणे ज्ञानीही जगात फक्त कारणच पहातो. अन्य लोक कार्यरूप अशा ह्या जगातील विविध पदार्थानाच पहातात.

ज्याच्यापासून सर्व कांही उत्पन्न झाले आहे, ज्याच्यामुळे सर्व कांही समजून येते, सर्वांमध्ये ज्याचे अस्तित्व आहे तेच ‘ब्रह्म’, ज्याला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करून ज्यात शेवटी विलीन व्हावे लागते तेच ब्रह्म. जगाचे कारण त्याच्याद्वारेच व्यक्त होत असते व अव्यक्ततेकडे जाताना सूक्ष्म होत जाऊन शेवटी नष्ट होऊन त्यात विलीन होते. जगाचे कारण अव्यक्त आहे. डोळ्याला दिसणारे ते व्यक्त. एखाद्यास आकार मिळाला म्हणजे तो त्याचा जन्म किंवा उत्पत्ति. एखाद्या दुकानदाराकडे जाऊन त्याला ‘द्या’ असे म्हटल्यास तो दुकानदार तुम्हाला काय बरे देऊ शकेल ? तुम्हाला काय पाहिजे ? किती पैशाचे पाहिजे ? किती वजनाचे अथवा किती मापे पाहिजेत ? असे तो विचारील. ह्याकरिताच नामरूपाची आवश्यकता आहे. नाव, रूप नसेल तर व्यवहार होऊच शकणार नाही. व्यवहार चालतो तो नामरूपामुळेच. आपल्या सर्व व्यवहाराला कारण असलेले हे जग होय. आपल्या सर्व व्यवहारांचे ज्ञान नामरूपापासून प्राप्त झाले आहे. नाम-रूप नसेल तर ज्ञानप्राप्ती होणारच नाही.

आता आणखी एक रहस्य स्पष्ट करू या. आपण ब्रह्म है नामरूपांनी व्यापलेल्या जगाचे कारण बनलेले आहे हे जाणून घेतले पाहिजे. ते पूर्ण रूप आहे तर कार्य अति अल्प असून ते नाश पावणारे आहे. सर्व पदार्थ अल्प आहेत; पण त्यांचे कार्यकारण कोणी उत्पन्न केलेले नसल्याने नष्ट होणारे नाही. ते अनंत, अपार आहे. तुम्हांला अल्प सुख हवे की अनंत सुख हवे ? आंबा आदि करून जगातील पदार्थाद्वारे प्राप्त होणारे सुख ‘अल्पसुख’ होय. म्हणून अनंत, अपार सुखप्रात्पसाठी आपण परमात्म्याची प्रात्पी करुन घेतली पाहिजे. ते अनंत सुख कसे आहे ? तात्पर्य, आपणाला अनंत सुख हवे आहे. जगातील सर्व पदार्थापासून मिळणारे सुख एकत्र केले तरी ते सुख अल्पच. असे सुख अल्पकाळपर्यंतच टिकणारे असून अनंत काळ टिकणारे, राहणारे अनंत अपार सुख परमात्म्यापासूनच प्राप्त होते. म्हणून आपण परमात्म्याच्या प्राप्तीसाठी साधना, प्रयत्न केला पाहिजे. आपण एखादा पदार्थ पहात असूनहि तो मनाला गोचर होत नाही. त्यावेळी आपले मन दुसरीकडे होते असा आपल्यास अनुभव येतो. डोळ्यांनी पहात असता मनहि तिकडे एकाग्र करून विचार करून पाहिले असता आपणास त्या पदार्थाची जाणीव होते व दुसऱ्या पदार्थाची जाणीव होईपर्यंत ती जाणीव राहते. मन दुसन्या गोष्टीकडे खेचले गेल्यावर पहिल्या पदार्थाची जाणीव, पदार्थाचे ज्ञान सुटले जाते, नाहीसे होते. अशाप्रकारे आपले जीवन क्षणनिमित्त स्वभावाचे बनलेले आहे. अल्प पदार्थापासून आपणास अनंत सुख प्राप्त होईल का ? मिळेल का ? जेवण करीत असता गाणे ऐकता ऐकता झोप लागून जाते. झोपी गेला असताना त्यास ‘जेवणाची चव कशी काय आहे ?” असे विचारल्यास तो ते सांगू शकणार नाही. अशा तऱ्हेने भटकणाऱ्या मनाच्या द्वारे अनुभवास येणारे, समजून येणारे ह्या जगातील सुख अगदी अल्प कालपर्यंतच अस्तित्वात राहणारे, टिकणारे असून नंतर दुःख देते असा सर्वाचा अनुभव आहे, हे अल्प सुख अंती सुखकारक आहे काय ?

तात्पर्य ही सर्व सुखे अल्पकालीन असल्याने त्यापासून तृप्ती नाही; समाधान नाही. सुख मिळाले, सुख प्राप्त झाले म्हणून त्यांचा अनुभव घेताघेताच ते नष्ट होऊन त्याचे दुःखात परिवर्तन होते. पाहता पाहता त्याच्यावरील दृष्टी काढून घेऊन डोळे दुसऱ्याच एखाद्या ठिकाणी धाव घेतात. अनुभव घेताघेताच इंद्रियशक्ती नाहीशी होऊन जाते. जिलेबी किंवा लाडू खाताना इतके गोड, इतकी चांगली चव वाटते की पानच खाऊन टाकावे की काय असे वाटते. नंतर घास घेताघेता आवडते म्हणून नव्हे, चवदार म्हणून नव्हे तर जेवणाचा वेळ घालविण्यासाठी पानावर रेंगाळत रेंगाळत असल्याचे पहावयास मिळते.

मृत्यु म्हणजे नाश. नाश म्हणजे त्याचा त्याग. त्याचा अनुभव घेऊन त्याला सोडून देणे, त्याची जाणीव न उरणे हाच त्याचा नाश. त्याची जाणीव जेव्हा नाहीशी होते तेव्हांच त्या गोष्टीचा नाश होतो. अशाप्रकारे पदार्थ क्षणात निर्माण होऊन क्षणात नाश पावतात. अनंत अविनाशी सुखाला न ओळखता अंधारासारख्या तमरूपी असलेल्या विजेच्या चमकेप्रमाणे असणाऱ्या नश्वर सुखाच्या, विषयसुखाच्या मागे जाऊ नये.

परमात्म्यापासून मिळणारे सुखच अनंत राहणारे सुख होय. म्हणूनच आपण परमात्म्याचा आश्रय घेतला पाहिजे. आपण घालवीत असलेल्या प्रत्येक क्षणातही परमात्म्यावर आपली भक्ती पूर्णपणे असली पाहिजे. आपला श्वास भक्तियुक्त असला पाहिजे.

‘आत्मा वा इदमग्र आसीत् ।’ सर्वप्रथम आत्माच फक्त होता. आत्म्याने आपणच आपणास दोन प्रकारे विभागून ‘तो’ व त्याची ‘शक्ती’ असे तो झाला. ह्या दोन शक्तींच्याद्वारे ‘स्त्री-पुरुष’ अशी त्याने निर्मिती केली. ‘मी’ हे परमात्म्याचे नाव. ‘मी’ हे आत्मस्फूर्तीने म्हणताच निर्माण झाले. त्यानंतर अनेकत्वाच्या सिद्धीसाठी ‘मी’ ह्या जाणिवेने, नावाने, देहाच्याद्वारे तो अनेक झाला. ‘तिकडे कोण आहे ?” असे विचारल्याबरोबर ‘मी’ ही जाणीव कोणी विसरेल काय ? अर्थात कोणीच विसरत नाही. ‘मी’ हेच उत्तर सर्वप्रथम येते. गृहस्थाश्रमी असो किंवा संन्यासाश्रमी असो, ‘मी’ ही जाणीव कोण बरे सोडू शकेल ? चित् ज्योतीचे प्रतीक जीवनच. ‘मीच’ असे म्हणण्याची त्याची इच्छा असल्याने, भिन्नत्व निर्माण करतो असे असणारे, ‘मी’ म्हणून म्हटले जाणारेच परमात्म्याचे रूप आणि दिव्य आनंदघन होऊन राहणेच त्या परमात्म्याचे स्वरूप. प्रवृत्ति व निवृत्ति असे दोन मार्ग परमात्म्याने आपणासाठी केले आहेत. ‘प्रवृत्ति’ हिला परमात्म्याची शक्ति म्हटले असून तोच त्याचा धर्म. प्रजोत्पत्तीच त्याचा संकल्प. ही कल्पना उत्पन्न होण्यापूर्वी, येण्याआधीच परमात्मा मात्र ‘एक आसीत् ।’ एकच होता.

‘आता संसार पुरे’ असे म्हटल्यानंतर निवृत्तीचा मार्ग सांगितला आहे. गृहस्थाश्रम असो वा संन्यासाश्रम असो, तो विधियुक्तच असला पाहिजे. संन्याशास कशाचीहि कोणतीहि चिंता, काळजी नसते. परमात्म्याच्या ठिकाणी स्वतःचे मन विलीन केल्यावर मग काय उरणार ? ह्यासाठी परमात्म्याच्या ज्ञानाचा अभ्यास ब्रह्मचर्याश्रमापासून सुरू करा. तो गृहस्थाश्रमात पूर्णपणे पूर्णतेने करून ज्ञानमार्गाने चालणे हीच भक्ति. पण ते निषिद्ध मात्र असू नये.

सुपुत्र कुलदीपक असावेत. कुलाची वृद्धी करणाऱ्या, सृष्टिकार्याला अनुकूल अशा पितृऋणाचा परिहार करण्यासाठीच गृहस्थाश्रम आहे. ह्या पद्धतीनेच सुपुत्र कुलाचा उद्धार करतो. इतर पुत्र हे आपल्या अनेक मुलांना बरोबर घेऊन फिरणाऱ्या डुकरीच्या मुलाप्रमाणे होत. ज्येष्ठ पुत्र हाच फक्त ‘धर्मपुत्र’ राहिलेले इतर सर्व ‘कामपुत्र’ होत. आपले जीवन संयमाने विषयापासून दूर करून भक्तिपर मार्गाकडे आणणे हाच ‘धर्ममार्ग’. सुपुत्राच्या लाभासाठी पातिव्रत्याची अत्यंत आवश्यकता असते. ‘वामावंशवर्तिनी’ असे म्हटले आहे. वामा म्हणजे डावी बाजू. परमात्म्याची डावी बाजू म्हणजे स्त्री, उजवी बाजू म्हणजे पुरुष. अशाप्रकारे स्त्री, पुरुष हे एक देह न्यायाने राहिले पाहिजेत. ‘मी’ पुरुषात आहे व स्त्रीतहि आहेच. एका अद्वितीय परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी स्त्री पुरुष ऐक्य झाले पाहिजे. मरेपर्यंत ते अन्योन्यतेने राहिले पाहिजे. तदनंतर स्त्रियांनी पुनर्विवाह करू नये. पुत्र नसला तरीही विधवेला मोक्षप्राप्ती होऊ शकते. पण ऐक्य धर्माचे अतिक्रमण करून पुनर्विवाहाचा अधिकार नाही. पुनर्विवाहाने समाजाचा कसा काय उद्धार होतो हे काही समजत नाही. परमात्म्याच्या ठिकाणी असलेले प्रेमच भक्ति. ‘मी’ ह्या जाणिवेचे ध्येय जाणून आनंदस्वरूपाला ओळखून, समजून घेऊन आनंद उपभोगणे हीच श्रेष्ठ भक्ति परमात्म्याच्या ठिकाणी भक्ति ठेवावयाची म्हणजे आपल्या स्वतःमध्येच भक्ति ठेवावयाची कारण ‘मी’ हा परमात्म्यापासून भिन्न असा नाही.

तात्पर्य, भक्ति केली पाहिजे. भक्ति परमात्म्यात विलीन झाली पाहिजे. ह्या दुर्गंधीयुक्त शरीराच्या सुखाकरिता उगीच श्रम करू नयेत. ह्या नश्वर देहापासून काय सुख ? पदार्थांच्या प्राप्तीसाठी श्रम केले तर ते देहाच्या उपयोगास येतील त्याप्रमाणे परमात्म्यासाठी श्रम केलेत तर परमात्माहि भेटेल. परमात्म्याच्या ठिकाणी अधिकाधिक प्रेम ठेवून परमात्मस्वरूप आईमध्ये, मुलामध्ये, सर्वांमध्ये पाहिले पाहिजे. तो मोठा, तो धाकटा असा भेद असू नये. लहान मुलांच्यावर जेवढे ओरडावे लागते तेवढे मोठ्यांवर लागत नाही व ओरडण्याची पद्धतही भिन्न असते. दर्जाप्रमाणे पाहिले पाहिजे व वागलेहि पाहिजे. अनंतानंत सुखाच्या प्राप्तीसाठी आपल्या स्वरूपीच विलीन होणे, स्वतःस विलीन करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय असू द्या !

सर्वांनाच अनंत सुखाची प्राप्ती होवो असा माझा तुम्हांस अंतःकरणपूर्वक आशीर्वाद आहे !!

इति शम्!

home-last-sec-img