Literature

पुनर्जन्म हा कर्मफलरूप होय

जीवनांत कर्मे करूनच त्यांचें फळ अनुभवावें लागतें. अनुभवलेली सारीं पूर्वकर्मेच होत. अनुभविले जाणारे सर्व कर्मफलच असतें. कशाचीहि प्राप्ति कर्मफलरूपच म्हणून ठरलें तर लाभलेला जन्मसुद्धा कर्मफलरूपच झाला. त्या त्या योनीत, त्या त्या जातीत, एकेका वैशिष्ट्यानें प्राप्त होणारा जन्म तत्पूर्वजन्मकर्माचंच फल म्हणून मानावे लागते. लाभलेला जन्म पुढे त्या जन्मांत होणाऱ्या कर्माचे फल म्हणून कोणीहि म्हणू शकत नाही. या दृष्टीनें उत्तरोत्तर लाभणारे जन्म पूर्व-पूर्व जन्मांचे कर्मफल म्हणून मानणे सहज ओघानेच प्राप्त होते. जगामध्ये दिसून येणाऱ्या विविधतेला आणि वैचिला त्या त्या कर्मक्त्यांची मागचीं भिन्न भिन्न कर्मेच कारण होत असे मानल्या शिवाय गत्यंतर नाही. विविध जातींत लाभणारा जन्म, जन्मादारभ्य असलेलें वैगुण्य व वैशिष्ट्य, जीवनांत दिसून येणारे अकारण वैषम्य व अकारण प्रेम, कल्पना नसतांना प्राप्त होणारे सुखदुःख इत्यादिकांना या जन्माचे कर्मच कारण होत नाही असे दिसत असल्यामुळे अशा तऱ्हेच्या अनुभवांना मागचें जन्म कर्मच कारणीभूत होते असे म्हणावें लागते. या जन्मीं केली जाणारी कर्मे पुढच्या जन्माला कारण झाल्याप्रमाणे प्रकृत जन्माला मागील जन्माचे कर्मच कारण होते हैं ओघानेच आलें. मागच्या जन्माचे कर्म या जन्माला, या जन्माचे कर्म पुढच्या जन्माला, त्या जन्मांत घडलेलें कर्म त्याच्या पुढील जन्माला कारणीभूत होऊन, जन्ममरणांची ही सांखळी विशिष्ट फल अनुभविण्याच्या इच्छेनें जोपर्यंत ती ती कर्मे करण्याची प्रवृत्ति असते, तोपर्यंत अखंड चालून, ही जन्ममरणांची परंपरा चुकत नाही असे कळून येईल. हातून झालेले अभुक्त कर्म केव्हांतरी आपले फल दिल्याशिवाय राहात नाहीं, असें एकदां झाल्यानंतर कर्माचें फळ प्राप्त होणे आणि तें या जन्मीं अथवा पुढच्या जन्मीं अनुभवून संपवायें लागणे हा निसर्गसिद्ध नियम ठरतो. या जन्मीं केलेली, अभुक्त कर्मे भोगण्यास या दृष्टीने पुढचे जन्म अपरिहार्य ठरतात. इच्छापूर्वक केलेल्या सर्व कर्माचे फळ या जन्मींच अनुभवून संपत असतें तर, तें अनुभविण्याकरितां पुढचा जन्म घ्यावाच लागला नसता ! लिहिण्याचें, वाचण्याचें करण्याचे कोणतेंहि एक काम शिल्लक राहिले असतां आपण झोपून उठल्यानंतर ज्याप्रमाणें तें पूर्ण करतो त्याप्रमाणें मरणरूपी निद्रेच्या विस्मृतींत कांहीं काल घालवून ( झोपून) मागील जन्माच्या अपूर्ण क्रमांच्या पूर्तीकरितां, अपूर्ण कर्मवासनेच्या पूर्तीकरितां, अथवा केलेल्या कर्माचे फळ भोगण्याकरितां पुढच्या भोगसाधक जन्मांत तदनुरूप कर्मे हातून होतात. मृत्युरत्यन्तविस्मृतिः । मृत्यु म्हणजे एक विस्मृतिच असल्यामुळे आपल्याला केलेल्या कर्माची जाणीव नसते. तरी पण त्याचें फळ अनुभवावे लागते. या दृष्टीने सर्वज्ञ परमात्माच त्या कर्माची फळे देतो असें मानावें लागून कर्म-फळ-दाता एक परमेश्वर आहे असे उघड होतें. विशिष्ट फलाकरितां जसें विशिष्ट कर्म करावें लागतें त्याप्रमाणे ते कर्मफल भोगण्याकरितां सुद्धां विशिष्ट कर्मच करावे लागते. विशिष्ट प्राप्तिकरितां केलें जाणारें विशिष्ट साधनहि कर्मच, आणि त्या साधनानें प्राप्याची प्राप्ति झाल्या नंतर त्याचा फलभोगहि कर्मच. अनेक फलांच्या म्हणजे अनेक सुखांच्या वासनांनी कर्मे करीतच राहणाऱ्या जीवांना त्या त्या कर्मफलाच्या वासनांचा पूर्ण क्षय होईपर्यंत जन्म तरी कसा चुकणार? त्या त्या कर्मफलांच्या अनुभवाला ते ते जन्म आवश्यक असणार की नाही ?

home-last-sec-img