Literature

पौष शुद्ध पौर्णिमा

यथार्थतत्वाने विचार केला असता सर्वत्र परमात्मरूपच असून त्यात ‘मी’ ‘तू’ असे जे व्यावहारिक भेद दिसतात ते मायेमुळेच ‘ माया ही सत्य नाही ‘ असे श्रुतींचे सांगणे आहे.

     ‘ कोट्यावधी ग्रंथांचे तात्पर्य एका वाक्यात सांगावयाचे झाल्यास ब्रह्म सत्य आहे, त्याहून वेगळे दिसणारे हे जग मिथ्या आहे आणि भ्रमाने भासमान होणारे जीवनही यथार्थत्वाने विचार केल्यास ब्रह्मच आहे ‘ असे श्रीमत् शंकराचार्यांनी सांगितले आहे. 

     सुवर्णमूर्तीमध्ये मूळ द्रव्य सुवर्णच असते. तद्वत् पिंडब्रह्मांडात यथार्थत्वाने परमात्म्याचे अद्वैत स्वरूप आहे. संपूर्ण देह, इंद्रियांची रूपे परमात्म्याने  आपल्या संकल्पाने सहजरित्या निर्माण केली आहेत. या सर्वांचे मूळ परमात्माच असून इतर कोणीही नाही हे आपणास ज्ञानदृष्टीने विचार केल्यास समजू शकेल. ‘ भूत, वर्तमान व भविष्यकाळात निर्माण होणारे असे सर्व परमात्म्यापासूनच उत्पन्न होत असते ‘ असे श्रुती म्हणते. यावरून परमात्मा भूतकाळी होता, आज आहे व भविष्यातही असणारच हे स्पष्ट होते. त्रिकालांत व त्रिलोकांत परमात्मा सर्वव्यापी असून दृश्य अशी रूपे त्याचीच होत.

     तिन्ही कालांत हे विश्व असतेच व ते परमात्मस्वरूप असल्याने ते व परमात्मा हे निरनिराळे आहेत हे समजणे चुकीचे होय. ‘ ब्रह्म ‘ या नावाने ओळखला जाणारा परमात्मा अद्वितीय आहे असे असल्याने इतर कशाचेही अस्तित्व असू शकत नाही. 

*श्री प.प स भ श्री श्रीधर स्वामी महाराज*

home-last-sec-img