Literature

पौष शुद्ध षष्ठी

 मनुष्यजन्माच्या सार्थकतेसाठी कोणत्या शक्तीचा विकास झाला पाहिजे? असा प्रश्न उत्पन्न होतो. आधिभौतिक शक्तीच्या विकासाने परस्वापहारादि शक्य असते तर अध्यात्मशक्तीच्या विकासाने स्वतःसुखी होऊन जन्ममरणाच्या रहाटगाडग्यापासून मुक्त होऊन चिरसुखी होता येईल. इतकेच नव्हे तर आपल्यास शरण आलेल्यांच्याही उद्धार करता येईल. 

      आधिभौतिक शक्तिसंपन्नास आपल्यापेक्षा शक्तिशाली असलेल्या मनुष्यापुढे नतमस्तक व्हावे लागते. पण अध्यात्मिक शक्तिशाली मनुष्यास द्वैताची भावना नसल्याने तेथे तर – तमभावच रहात नाही. मग नतमस्तक होण्याचा संबंध नाही. अध्यात्मिक शक्तींशी बरोबरी करू शकणारी दुसरी  कोणतीही शक्ति नाही हे विचारांती आढळून येते. 

     जे प्राप्त झाल्याने इतर गोष्टींच्या प्राप्तीची जरूरी भास नाही, जे सुख प्राप्त झाले असता इतर सर्वसुखे क्षुल्लक वाटतात, ज्याची जाणीव झाल्यावर ज्ञेय असे काही शिल्लक रहात नाही, त्याला ‘ब्रम्ह’ म्हणतात व ते ब्रह्म म्हणजेच ‘मी’.

      ‘सर्व व्यवहार उद्योग सोडून मी ब्रम्ह आहे ही जाणीव करून घे’ असे आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे. अशा अध्यात्मशक्तींचा संग्रह करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहून झटले पाहिजे. 

*श्री.प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img