Literature

प्रवृत्ति निवृत्तिरूपी सगुणनिर्गुण उपासना

वैदिक आर्य धर्माच्या उन्नत संस्कृतीचे प्रवृत्ति व निवृत्ति असे दोन मार्ग आहेत. द्वावेव वेदोक्तौ मार्गों प्रवृत्तिश्च निवृत्तिश्चेति ॥ हे परमात्म्याचे सगुणनिर्गुणात्मक दोन उपासनामार्ग होत. सगुण परमात्म्यांतच विश्वप्रपंचाचा अथवा आपल्या बहुत्वाचाः प्रवृत्तिधर्म दिसून येत असल्यामुळे हा प्रवृत्तिधर्म चालविणें, गृहस्थाश्रम स्वीकारणें, स्त्रीपुरुष एकात्म भावनेनें, पुत्रेच्छेनें असणे, धन संपादन करून त्याचा कुटुंबपोषणाकरितां, देवपितृकार्याकरितां, अतिथिसेवेकरितां, गोरगरिबांकरितां उपयोग करणें, स्ववर्णाप्रमाणे वागून आत्मतृप्तीचें दिव्य जीवन चालविणें, परमात्म्याचे एकत्व समजून घेऊन सुख संतोषानें नांदणें, इह आणि पर अशा संसार व मोक्ष यांना कारणीभूत असणारें कर्म उपासना ज्ञानादि साधनांनी करीत राहणे हा प्रवृत्तिमार्ग. प्रवृत्तिलक्षणं कर्म । —ही प्रवृत्ति कर्मपर आहे. या प्रवृत्तीचा संकल्प व तत्कर्म सगुण परमात्म्यांतच दिसून येत असल्यामुळे एतदर्थ कर्म करणें त्या सगुण

परमात्म्याचीच उपासना आहे. परमात्म्याचीहि सगुणोपासना आहे. वे बाब ब्रह्मणो रूपे मूर्तं चामूर्तं च । सगुण व निर्गुण अशी परमात्म्याची दोन रूपें आहेत, सगुण साकारं रूपानेंच जगदुत्पत्तीचे कार्य म्हणजेच प्रवृत्ति धर्मकर्म होतें. आत्मा वा इदमग्र आसीत्पुरुषविधः । (बृ.) इत्यादि श्रुति वाक्यें याला प्रमाण होत. हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् ।—या हिरण्यगर्भापासूनच जगाची उत्पत्ति झाली; हाच प्रवृत्तिमार्ग हैं गृहस्थाश्रमाचें मूळ. या सृष्टि करण्याच्या संकल्पाचा, पुत्रेच्छेचा व तदंगभूत सतीपतीच्या साऱ्या संसाराचाच हा गृहस्थाश्रम आहे. ही परमात्म्याची सगुणोपासना होते.

स्त्रीची इच्छा धनाची इच्छा पुत्राची इच्छा समूळ नष्ट होऊन देहवासना, शाखवासना, लोकवासना जाऊन मायाऽविद्योपाधि जिवंशोपाधि यांनी रहित प्रवृत्तिसंकल्पशून्य असे तें निष्प्रपंच, निर्विकल्प, चिदानन्द परमात्मस्मरूप मीच म्हणून स्वरूपाच्या ज्ञानानें राहणे, या आत्मस्फूर्तीचें आपल्यासह या सर्व प्रपंचाचे केवळ आनंदघन परमात्मस्वरूपच एक सत्य स्वरूप आहे असे जाणून त्या स्थितीनेच सदा स्वमात्र राहणे, सर्वसम होणे, निष्कामतेनें या सत्यस्थितीस तत्त्वोपदेशद्वारां उजळवीत आनंदमात्र असणे हीच निर्गुणोपासना होय.

home-last-sec-img