Literature

फाल्गुन वद्य द्वितीया

संत तुकाराम महाराज एके दिवशी श्रीसमर्थांच्या दर्शनास आले होते. त्यावेळी बोलण्याच्या ओघांत श्रीसमर्थांनी तुकारामांना जिज्ञासू दृष्टीने ‘तुम्हास ही उन्नत अवस्था कशी प्राप्त झाली ?
कोणत्या साधनांमुळे प्राप्त झाली ? आपली गुरूपरंपरा कोणती ? असा प्रश्न केला असतां तुकारामांनी विठ्ठलदास्य हा माझा रोजचा मंत्र. चैतन्य हा माझा सांप्रदाय. मी जे साधन केले ते फक्त मनोनिग्रहासाठीच मी जेथे जेथे किर्तन करतो तेथे तेथे माझे स्वतःचे दोष मीच उमजून घेऊन लोकांना सांगत असतो.’ असे उत्तर दिले.

स्वतःचे दोष समजून घेणे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आपण सर्वजण संत तुकाराम महाराजांसारखे नसून आपण आपले दोष झाकण्याचा प्रयत्न करीत असतो. इतकेच नव्हे तर खोटेही सांगतो. आपल्यामधील दोष कोणी दाखविले तर आपल्याला त्याचा राग येतो. ही लक्षणे मुतुक्षूची खचितच नव्हेत. आपण स्वतः कसे आहोत हे समजणारे लोक क्वचितच. कांहीतरी खोटेनाटे सांगून आपला मोठेपणा दाखविण्याचा जो तो प्रयत्न करीत असतो. हे त्यांचे कारण म्हणजे मांजराने डोळे झाकून दुध पिण्यासारखेच होय. जगाला डोळे नाहीत काय ? आपण आपल्या चुका झाकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या इतरांच्या नजरेत आल्यावाचून रहात नाहीत. आपण कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी निसर्गशक्तीही तुमच्या योग्यतेचे यथार्थ मूल्यमापन करून त्यानुसार फल देते.

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img