Literature

फाल्गुन शुद्ध नवमी

भगवत् चिंतन करण्याचे कार्य मनाचे आहे व मनाची ती शक्ती वाढवण्याचे काम मानवाचे आहे. म्हणून आपले मन भक्तिमार्गाकडे निष्ठेने वळविले पाहिजे.

‘नाशिवंत अशा व शेवटी दुःखास कारणीभूत होणाऱ्या या संसारातील कोणत्याही वस्तूंवर विश्वास ठेवू नकोस. अविनाशी सुखस्वरूपी, स्वयंसिद्ध अशा परमात्म्याचे चिंतन करून सुखी हो !’ असा मनास उपदेश करून त्याला भक्तिमार्गाकडे खेचून नेले पाहिजे.

*’मच्चित्तस्तन्मयो भवति गुह्यमेतत्सनातन |’*

‘जे ज्यामध्ये तन्मयेतेने आसक्त होतात ते तत्स्वरूप होतात.’ भ्रमर-कीटक न्यायाने ही पुरातन अशी सत्य गोष्ट आहे. परमात्मा अज, अक्षर, अव्यय आहे म्हणजेच त्यास जन्ममरणादि नाही. तो सत्यस्वरूप आहे. भक्ताने परमात्म्याच्या ठिकाणी अनन्यासक्त होऊन तन्मय झाल्यास तो भक्त सुद्धा तन्मय होऊन जातो.

प्रेमाने प्रेम मिळविले पाहिजे किंवा वाढविले पाहिजे. जे भक्त परमात्म्यास प्रेमाने वश करून घेतात अशांचा परमात्मा दास होतो. सर्व ऐश्वर्यसंपन्न सकललोकपाल असलेला महाविष्णू चक्रवर्ति बलिराजाचा सेवक झाला होताच की नाही? हा कशाचा प्रभाव? यास प्रेमच कारणीभूत नाही काय ? भक्ताभिमानी भगवंतास भक्तांच्याबद्दल दुजाभाव असूच शकत नाही.

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img