Literature

फाल्गुन शुद्ध पंचमी

निरनिराळ्या योगसाधनांनी सर्वच काही साध्य होत नाही. देहदंडण, मनोनिग्रह इत्यादि उग्रकार्ये त्यात सांगितली आहेत. पण भक्तिमार्ग तसा नाही.

‘हे दयासाधना, परमात्मा! तूच माझा उद्धार कर. मी दुसऱ्या कोणासही शरण जाणे शक्य नाही’ अशी एक दृढभावना असली की भक्तीचा मार्ग सुलभतेने साधता येतो.

*भक्तिरेव गरीयसि* अशी एक म्हण आहे. कलियुगात मानवी शक्तीचा ऱ्हास झाल्यामुळे अनुष्ठानादि साधने कष्टसाध्य असल्याकारणाने त्यापेक्षा भक्तीलाच जास्त प्राधान्य आहे.

प्रीतीनेच प्रीती उत्पन्न होते. अधिकारबलाने किंवा कायद्याच्या निर्बंधानेसुद्धा न होणारी कामे केवळ प्रीतीमुळे सुलभपणे होतात. त्याचप्रमाणे शास्त्रविधीने साध्य होण्यास शक्य असलेली भगवद्कृपा केवळ भक्तीनेच सुलभतया साधता येते. एखाद्याच्या अधिकाराला घाबरून कार्यप्रवृत्त झालेले लोक वाणीने व शरीराने त्याचा अधिकार मान्य करूनच कार्यप्रवृत्त झालेले दिसतात. पण मनाने ते कार्यप्रवृत्त झालेले असतीलच हे मात्र सांगणे अशक्यच. अशा कडक मालकाबद्दल मजूर मनामधून अप्रीतीच दाखवतो. मनांतून तो त्यास शिव्याच देत असतो. मन न लावता केली जाणारी कामे कधीही चांगली होत नाही. म्हणून प्रीतीपूर्वक भक्ति हीच तीव्र सद्यःफलकारी होय.

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img