Literature

भक्तियोग सारांश

सामान्यत: ‘भक्ति’ म्हणताक्षणीच परमात्म्याच्या ठिकाणी असणारे प्रेम, प्रीति असे समजले जाते.
‘सा परानुरुक्त्तिः ईश्वरे।’ अशी शास्त्रसूचना आहे. भक्ति म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी असणारी अत्याधिक प्रीति. परमात्म्याच्या ठायी असणारी सर्वातिशय प्रीतीच भक्ति. भक्तिचे लक्षण कोणते ? ‘परमप्रेमरूपा सा’ परमात्म्याच्या स्थानी असणारी परमप्रीतीच भक्ति. ‘अन्यस्मात् सौलभ्यं भक्तानाम् ।’ परमात्म्याची प्राप्ती करुन घ्यावयाच्या निरनिराळ्या साधनामध्ये ‘भक्ति’ हे अतिसुलभ साधन आहे असें नारदांचे म्हणणे आहे. मोक्षसाधनेसाठी ‘भक्तिरेव गरीयसी’ भक्ति हे अतिसुलभ असें साधन आहे. तें सोडून कठीण असणाऱ्या इतर साधनांचा कां बरें स्वीकार करावा? तसे केल्यास शेवटी आपण मुद्दामच आपल्यामागे कष्ट लावून घेतल्यासारखे होईल. सुलभ साधनाने अल्पकाल असणाऱ्या जीवनांत, इहलोकांतील आयुष्यांत शक्य तितक्या लवकर परमात्म्याची प्राप्ती करून घेतल्यास जन्म सार्थक होणार नाहीं कां? जीवनाची कृतकृत्यता होणार नाहीं कां? कठीण अशा साधनानी परमात्म्याची प्राप्ती होईपर्यंत आपले जीवन, आपले आयुष्य शिल्लक तरी राहील का ? हेच संशयास्यद आहे. त्या दृष्टीने ‘भक्ति हें सुलभसाधन आहे’ असें सर्व महात्मे स्तुती करून सांगत असतांना विचारवंताना तेच साधन महान असें वाटणे साहजिकच आहे. भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायांत परमात्म्याने सगुणभक्तीला अत्यंत महत्व दिले आहे.

‘परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् ।’ (अध्याय १४ लोक १) मी आतापावेतों ज्ञानशास्त्रच सांगितले आहे. आतां तुला ह्यामध्ये गुह्यतर असें ज्ञान सांगतो. तूं माझा भक्त हो! ‘मय्येव मन आधत्स्व’ माझ्या ठिकाणी मन स्थिर कर. माझ्याठायींच निश्चय असू दे, म्हणजे कोणत्याहि प्रकारची अडचण किंवा कष्ट होणार नाहीत ‘याबद्दल कोणताहि संशय धरूं नकोस. मच्चित्तः सततं भव ।’. मम प्रसादात् —।’ आपल्या चित्तात मला सामावून घेणारास कोणतीच अडचण येणार नाही. कोणत्याहि कष्टांस तो बळी पडणार नाही. कोणत्याहि विघ्नातून तो विनासायास पार पडतो, असें भगवंतानी सांगितले आहे.

जीवनातील सर्व मार्गामध्ये विघ्ने आहेत, कष्ट आहेत, मोक्षाच्या मार्गात मात्र कष्ट नाहीत. तुमची सामान्य दिनचर्यासुद्धा कष्ट, दुःख, अनंत प्रकारच्या चिंता ह्यानी भरलेलो आहे. मनुष्य हा अत्यंत परतंत्र, अत्यंत दुर्बल, पराधीन व दीन झालेला आहे. त्यामुळे भगवंतानीं ‘ तुझें मन ज्ञानामध्ये रमत नसेल तर, तुझ्या मनात निश्चय निर्माण होत नसेल तर माझा भक्त हो! माझ्या प्रीतीसाठीच सर्व काही करून । मला संतुष्ट कर. तुझी ओढ मजकडेच असल्यावर तुला कोणत्याच प्रकारची चिंता नाही. मी प्रतिज्ञापूर्वक तुझी शपथ घेऊन सांगतो की, तूं माझ्यातच मन ठेवून माझ्या प्रेमाला, माझ्या कृपेला पात्र झालास तर तुला माझीच प्राप्ती होईल. मग तुला कांहीहि कमी नाही. परमात्म्याच्या प्राप्तीसाठींच तुला काही करावयाचे असेल तर प्रीतिवश होऊन परमात्माच तुला अनुग्रहित करील असे सांगितले आहे. ह्या ज्ञानाने परमात्म्यांत ऐक्य होते व नंतर लगेच परमात्म्याची प्राप्तीच होते असे म्हटल्यानंतर भक्तीपेक्षा मोठे, महान असें काय असू शकेल ? परमात्म्याच्या ठिकाणी प्रेम वाढून त्याने अनुग्रह केल्यावर तो आणखी देणार तरी काय? आपले ऐक्यच !! भक्तिगम्यः परमेश्वरः।’ भक्तीनेच परमात्मा वश होतो. परमात्मस्वरूपाची प्राप्ति परमात्म्यापासूनच व्हावयास हवी, नाही का? म्हणूनच परमात्मस्वरूपाची प्राप्ति करून घ्यावयाची असल्यास त्याची कृपा पण हवीच. परमात्मा आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करून देणार असला तरी प्रीतीवर, भक्तीवर खूष होऊन, संतुष्ट होऊनच, नाही का? तुझ्यावर माझे अत्यंत प्रेम असल्यामुळे मी हे गुपित सांगतो’ असेहि म्हटले आहे. अशा प्रकारे अनेक साधनानी युक्त अशी उपासना सांगितली असली तरी शेवटी सांगितलेली ती ‘भक्ति’ च. ‘यावान् यश्चास्मि’ भक्तीमुळेच परमात्मस्वरूप ओळखता येते. चित्ताचा एक स्वभाव आहे तुम्ही ज्याचें ध्यान कराल, ज्यामध्ये तुमचें चित्त एकाग्र होईल, समरस होईल, त्यानुसार तुमचें चित्त रूप धरते. विषयाचें ध्यान जास्त लागले तर तुमच्या डोळ्यासमोर विषयच उभे रहातील, नाही कां? स्त्री, विषय अथवा वस्त्र, दागदागिने म्हणा, ज्यामध्ये सुख आहे असे वाटते त्याचेच ध्यान तुमचें मन करील तर तेंच रूप मन धारण करते. परमात्म्याच्या ध्यानात तल्लीन होऊन त्याच्यांत एकरूप झालांत तर तुम्हीहि परमात्मस्वरूपीच व्हाल, नाहीं कां?

कोणत्याही गोष्टीला कारण हे असतेच. संकल्पानेच कोणतेहि कार्य होते. म्हणून संकल्पानेच परमात्म्याच्या संकल्पानेच सृष्टीची – उत्पत्ति, असे श्रुतीने सांगितले आहे. ‘एतावानस्य महिमा।’ सृष्टी परमात्म्यापासूनच उत्पन्न झाली असे म्हटले जात असल्याने सृष्टीतील सर्व वस्तूमध्ये, सर्व पदार्थामध्ये दिसून येणारे सुख परमात्म्यामुळेच निर्माण झालेले आहे. ह्या सर्व जगद्वस्तूमध्ये ज्याचे सुख केवळ अंशमात्रच दिसून येते तो परमात्मा सृष्टीतील सर्व सुखापेक्षा अनंत सुखरूप असाच आहे. त्या परमात्म्याचे आनंदरूप किती महान ! किती विशाल ! त्याचे वर्णन करण्यास वाणी, मन अपुरे पडले. मनाने ते सुख अनुभवावयाचे म्हटले तर मनच लहान ठरेल. मोठ्या पात्रात लहान भांड्यांचा समावेश होतो त्याप्रमाणेच परमात्म्याच्या अनंत सुखाच्या सावलीत इतर सर्व सुखे एकवटली आहेत.

पदार्थांची उत्पत्ती, निर्मिती मनापासूनच त्यामुळे मनाकडूनच त्यांच्या सुखाचा अनुभव होतो. अपार अशा परमात्मसुखात मन विलीन झाले असता ज्या दिव्य सुखाचा अनुभव प्राप्त होईल, तो बहिर्मुख असणारे मन वर्णन करू शकणार नाही. जगातील सर्व सुखांचा, सर्व पदार्थांचा एकाच वेळी अनुभव घेतला तरी त्या दिव्य आनंदाची बरोबरी करणारा आनंद सापडणार नाही, त्याची प्राप्तीहि होणार नाही. सर्व पदार्थांचा विचित्र शक्तीद्वारे अनुभव घेतलेला असला तरी तो सुद्धा ह्या दिव्यसुखाचे वर्णन करू शकणार नाही. ‘मुकास्वादनवत्’ न्यायाने मुक्याने साखर खाल्यावर तिच्या गोडीचे वर्णन करू शकत नाही त्याचप्रमाणे परमात्म्याचे सुख अनुभविलेले मन आपल्या स्वतःच्या आनंदातच तृप्त होऊन त्याचे वर्णन मात्र करू शकत नाही.

सामान्य सुख जसजसे अनुभवीत जावे तसतसा त्यात त्याचा तिटकारा, कंटाळा निर्माण होत जातो. पण परमात्मसुख हे केवळ सुखच. दु:ख निर्माण करणारे सुख ते विषयसुख; त्यामुळेच ते दुःखमिश्रित सुख. परमात्म्याच्या सुखात ती भेसळ नाही. ते जास्तीत जास्त आसक्ति प्रवृत्ति निर्माण करणारे ! विषयामध्ये तिटकारा का निर्माण होतो? तर ते दोषदृष्ट बनलेले आहेत म्हणून. सुखाच्या आशेने विषयांचा अनुभव घेतला तर ह्या विषयापासून सुख न मिळाल्यामुळे निराशाच पदरी पडते. सुखाची इच्छा निर्माण होते ती सुखाच्या संस्कारानेच, सुखाच्या अस्तित्वानेच. त्यामुळे ज्यात सुख नाही अशा वस्तूंचा अनुभव घेतला असता, त्यांना अनुभविले असता त्यांच्यामध्ये सुखाचा अनुभव न मिळता शेवटी दुःखच मात्र प्राप्त होते. अशा प्रकारे विषयांचा मूळ स्वभावच प्रगट झाल्यामुळे त्यांच्याबद्दल तिरस्कार, घृणा, तिटकाराच निर्माण होतो. ह्या दृष्टीने परमात्मसुख | कितीतरी महान, कितीतरी मोठे !!

भिंतीवर काढलेल्या चित्रातील पाणी प्याल्यास तप्ति प्राप्त होईल काय ? या उलट अमृतपानाने किती महान आनंद मिळेल ? परमात्म्याच्या सुखाबद्दल गुणाकार करा ! विषय लाभ भोगानी जेवढे सुख मिळते त्याहीपेक्षा कितीतरों महान, सांगता वा वर्णन करता न येणारे असे खरे खरे आत्मसुख प्राप्त होते, संतृप्ति होते ती परमात्मप्राप्ति होते तेव्हांच !!

‘यं लब्ध्वा पुमान् तृप्तो भवति’ जे सुख प्राप्त झाल्याने मनुष्य तृप्त होतो तेच परमात्मसुख ! त्या सुखानेच तृप्ती प्राप्त होते, निर्माण होते. ‘आत्मा रामो भवति’ भक्तींमुळे मनुष्य पुढे पुढे परमात्म्याचा आनंद आपणातच पहातो; त्यात एकत्व पावतो, त्या दिव्य आनंदातच सामावून जाऊन तो आनंदरूप होतो. ‘मामेवेष्वस्व’ तू मलाच प्राप्त करून घे! ‘मयि एव मन आधत्स्व’ तुझ्या प्रेमाचा, प्रीतीचा विषय मी एकमेवच असल्याने तू माझ्यात सामावून विरघळून जा ! म्हणजे काय ? आनंदातच विरघळवून जा, सामावून जा! आनंदरूप होणे हेच भक्तीचे फळ ! भक्तीमुळे परमात्मा प्रसन्न होऊन देत असलेले फळ म्हणजेच आपला स्वतःचा साक्षात्कार ! सायुज्य! ” मम माया दुरत्यया’ हे परमात्म्याचे एक रूप तर दुसरे म्हणजे जगात विभिन्न प्रकारची दु:खे आहेत त्या सर्वाना कारण झालेली, नको, नको म्हटले तरी दुःखात लोटणारी शक्ती ‘माया’. माहीत असूनहि समजून उमजून फसवणूक करणारी अशी ती मायाच ! असल्या बळजबरीने इच्छा नसलेल्या प्रकृती मध्ये असलेल्या शक्तीपासून, मायेपासून सुटका करून घेणे हे परमात्म्याच्या अनुग्रहानेंच साध्य ! मायेचे परिणामच होऊ नयेत अशी तुझी इच्छा असेल तर तु परमात्म्याचा आश्रय घे! परमात्म्याचे एक स्वरप व मायेचे एक स्वरूप. परमात्म्याचा भक्तीला मिळणारे बक्षीस कोणते? परमात्मा की माया? मायेमध्ये दुःख, चिंता, विस्मृति, परमात्म्यापासून वेगळे करणे ह्या सर्व गोष्टींचा समावेश आहे. अशा सन्निवेशात परमात्मा आपल्या भक्तांना जे देतो तें आपलें सायुज्यच ! सायज्यच दिले नाही तर परमात्मभक्ताचे कोणतें हित साधल्यासारखे होईल? आणि असे झाले तर परमात्मा वंचक झाल्याप्रमाणे होणार नाही का? भक्तासाठी क्षेमकर असणा-या रूपाखेरीज परमात्म्याचे दुसरें रुप नाही । असें म्हटल्यावर भक्ताचे हित साधण्यासाठी परमात्मा आपलें सायुज्य देण्याखेरीज इतर आणखी काय देणार? म्हणूनच भक्तांसाठी परमात्म्याने राखून ठेवले असे काही असेल तर तें आपलें ऐक्यच! असें सुंदर ऐक्य प्राप्त करावयाचे, संपादन करावयाचे असल्यास अपण परमात्म्याच्या कृपेला, पसंतीला पात्र व्हावयास हवे. नाही का?

मायेमध्ये लोळत राहिल्यास जीव तिच्यातच ऐक्य पावतो. ‘यच्चित्तः तन्मयो भवति ।’ तुम्ही ज्या कोणाचा आश्रय घ्याल त्याचाच स्वभाव तुमच्यामध्ये निर्माण होतो हे अगदी सामान्य, सहज लक्षण आहे. दुःखाचा आश्रय घेतल्यास दु:खाची प्राप्ती होईल मुक्तपणे सांगता येईल. त्याचप्रमाणे सुखाचाच आश्रय घेतल्यास सुखाचीच प्राप्ती होईल. मग ह्या दोघापैकी कोणाचा आश्रय घ्यावा? असा एक प्रश्न तुमच्यापुढे ठेवितो. परमात्मा व माया असे दोनच विभाग. परमात्मा दिव्यरूप आहे. तो सोडल्यास बाकीचे सर्व मायरूपच, झालें संपले. ह्याच्या विरहित कांही नाही. ह्याच्यामध्ये सुख असे म्हटल्यानंतर तेच तुम्ही कां मिळवू नये? मायेमुळेच स्फुरण, शक्ती, अज्ञान ही उत्पन्न होतात. असे असल्यामुळे सुखरूपी अशा परमात्म्याचा आश्रय न घेता आपण दुःखरुप अशा मायेचा, क्षणोक्षणी दुःख देणाऱ्या विषयांचाच आश्रय घेतो. ह्या सर्वाला खऱ्या सुखाबाबतचे अज्ञानच कारणीभूत असते, परमात्मा हा सुखरुप, सर्वज्ञ आहे हे सर्वांना माहीत आहे. तरीहि ‘देवासाठी त्याग करावयाचा’ हे मात्र पटत नाही. देवाला नवस केला जातो पण त्याची पूर्तता करण्याची वेळ आली की, आपणच बुद्धिमान असे समजून परमात्म्यालाच आपण फसवतो. देवासाठी दिलेले पैसे देवालयाचे उत्पन्नाचे पैसे खाणारे कितीतरी महाभाग आहेत ! आपल्या बायकामुलासाठी सर्वजण दागदागिने करतात. पण देवस्थान बांधण्यासाठी किती जण पैसे देतात ? देवासाठी कष्ट करणारे किती जण आहेत ? परमात्मा हा सर्वापेक्षा महान. भक्तीही तशीच महान असली तरच परमात्मप्राप्ती होईल.

अल्पत्यागयुक्त भक्तीमुळे परमात्मा संतुष्ट होणार नाही, प्रसन्न होणार नाही. पण सर्ववस्तूपेक्षा अधिक असणाऱ्या प्रेमामुळे मात्र तो सतुष्ट होईल, खुश होईल. आपण इतके सर्व प्रकारचे प्रेम करूनहि परमात्मा आपल्याला का प्रसन्न होत नाही? आपल्या हाकेस कां बरे ‘ओ’ देत नाही? तर द्रौपदीप्रमाणे, गजेंद्राप्रमाणे आपण त्यास हांक मारीत नाही म्हणूनच अत्यंत कळवळ्याने, अंतःकरणपूर्वक बोलाविल्यास तो येईलच येईल, तो आला नाही तर तुम्ही त्यास जसे बोलवावयास पाहिजे तसे बोलविलें नाही असेच पाहिजे. परमात्म्याच्या ठिकाणी तुमचे किती प्रेम आहे ? परमात्म्यासाठी तुम्ही किती निरलसपणे श्रम करतां? त्याच्यासाठी किती स्वार्थत्याग करतां? याचा विचार करा !

परमात्मा तुमच्या बुद्धीला प्रेरणा देणारा म्हणजेच बुद्धिप्रेरक आहे. मनांत विवार उत्पन्न झाल्यानंतर ते तुम्हाला समजून येतात नाही का? पण तुमच्या अगोदरच ते विचार परमात्म्याला समजतात, तो तुमच्या मनाच्या तळाशीच असतो. देवाच्या ठिकाणी अनन्यता असणारे किती लोक ह्या जगात आहेत ? अगदीच थोडे. हे भक्तीचे लक्षण नव्हे, ‘सा परानुरक्तिः’ भक्ति म्हणजे पराप्रीति. परमात्म्याला काय देऊ ? त्याच्यासाठी काय करूं? प्राणच देऊ कां? त्याच्या चरणकमलावर शरीरच अर्पण करू का? पर्वतावरून खाली उडी घेऊ कां ? अथवा शरीराचे तुकडे तुकडे करूं? सर्वच तुच्छ. परमात्म्याच्या ठायी असलेले प्रेम कोणत्याही साधनाने, विधानाने दाखविले तरी ते योग्यच आहे असे वाटतच नाही, असे म्हणणारा जो खरा भक्त आहे तोच प्रेमासाठी आतुर व कासाविस होत असतो. प्रेमाचा अनुभव असणाऱ्यालाच ते माहीत ! ! ‘तदपिता चारिता’ असे भक्तीचे लक्षण सांगितले आहे, सर्व काही करावयाचे ते त्याच्या प्रीतीसाठी; सर्व काही त्यालाच समर्पण केल्यास प्रीतीला वेगळा विषयच नसल्यासारखे होईल. परमात्म्याच्या आनंदाशिवाय किंवा आनंदास सोडून राहू न शकणाराच भक्त. ‘तद्विस्मरणे परम व्याकुलता।’ त्या आनंदरूपाला सोडून मन दुसरीकडे गेल्यास अत्यंतिक व्याकुलता उत्पन्न होते. परमात्म्यावरील प्रेमामुळे परमात्म्याच्या दर्शनासाठी वेडे झालेल्या भक्ताग्रणींना पाहिल्यावर इतरांना ‘त्याला वेड लागले आहे’ असे वाटते. पण तो असतो प्रितीचा भाव ! प्रेमाचा उमाळा ! त्याची समाधी क्षणाक्षणाला लागते. परमात्म्याचो स्मृतीच त्याचे संपूर्ण चित्त व्यापून त्या स्मृतीने जगणेच त्याला सुखप्रद वाटते. परमात्म्याचा कथालाप, भजन, कीर्तन इत्यादीमध्ये वेळ घालवणेच त्यांना प्रितीचा विषय वाटतो. सदा सर्वदा एकच चितन! आभासमान होणा-या अशा अनुभवाने प्राप्त न होणान्या गोष्टींचा अनुभव घेतला तरी त्यांत सुख नाही. ज्याच्यापासून अखंड सुख निर्माण होत नाही अशा संसारांत केव्हांहि परिश्रमाचाच त्रास होतो. परमात्मा आनंदरूपी आहे. त्याच्याठायीं तुम्हास प्रेम निर्माण झाल्यास त्याचेच ध्यान तुम्हास लागेल व तुमच्या अंतःकरणांत त्याचा पाया सहजच रोवला जाईल. चित्त हे नेहमी प्रीतीच्या विषयाचेच चिंतन करीत असते. चित्तांत विषयस्मरण निर्माण झाले तर विषयच तुमच्यामध्ये निर्माण होतील. त्याचप्रमाणे परमात्म्याच्या ठायीं तुमची प्रीती वाढली तर आपोआपच त्याचें ध्यान साधणे, सिद्ध होणे साहजिकच !

भक्तीमध्ये ‘गौण’ व ‘परा’ असे दोन प्रकार आहेत. गौणभक्ति साधनरूप व पराभक्ति साध्यरूप होय. जन्मास आलेल्या प्रत्येकाचे मन साधारणपणे विषयाकडेंच ओढले जात असते. इंद्रिये ही बहिर्मुख आहेत. मनसुद्धा बाह्य विषयामध्ये गुरफटणारे व त्याच्याकडेच जाणारे आहे. विषयापासूनच देहाची उत्पत्ति. तेव्हा ह्या देहाचे लक्षण, पावित्र्य ह्याचा विचार केल्यास किती सुख होईल तें पहा ! परमात्मा खरोखरच प्रकाशमान झाला नसता, परमात्मसुखाचा अनुभव झाला नसता तर विषयापासूनच जगले पाहिजे असे होऊन तुम्ही कोणी एक क्षणहि जगू शकला नसता. पण कोणत्या तरी प्रकाराने सर्व जगद्वस्तूंत अदृश्यपणे वास करणा-या परमात्म्याचे सुख न समजतांहि अनुभवून त्या सुखाच्या ओलाव्यानेच तुम्ही जगला आहांत. डोळ्यांना दिसणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रकाशाद्वारे जशीच्या तशी गोचर होणारी सर्व सुखें परमात्म्याच्या आनंदाच्या मार्गामुळेच ! त्यामुळे जे सुख तुमच्या जीवनाला कारण झालेलें आहे तें सुख

तात्पर्य, परमात्मा सत्यानंदरूपी असल्याने त्या सत्यस्वरूपी परमात्म्याच्या प्रकाशाच्या योगाने तुम्ही आपले जीवन जगत असतांना परमात्म्याच्याच सहाय्याने तुमच्या सर्वांचे जीवन सुरळीत चालेल.

इतिशम्।

home-last-sec-img