Literature

भक्ति १

परमेश्वराची भक्ति व वात्सल्य अगाध आहे. आपण परमेश्वरावर विश्वास ठेवूनच वागतो नाहीं कां? सर्वांचा रक्षणकर्ता तो परमात्माच होय. त्याच्याशिवाय इतर कोण असणार? आपले कोणीतरी रक्षक आहेत, असे वाटत असले तरी त्याचेंहि रक्षण करणारा जर कोणी असेल तर तो परमात्माच. परमात्म्याएवढे बलवान दुसरे कोण आहे ? तो एकमेव सर्वसमर्थ आहे. तो आपली कालापासूनहि सुटका करतो असें म्हटल्यावर तेथें मनुष्याचा काय पाड? मनुष्याची काय किमत ? त्याची कृपा संपादन केल्यावर जगात दूसरें कोणते अगम्य व अगाध आहे ? तो राजांचा राजा, मालकांचा मालक, देवांचाहि देव आहे. त्याच्यापेक्षां वरिष्ठ असे दुसरें कोण आहे ? त्याच्या शक्तीनेच सूर्य वेळेवर उगवतो आणि योग्यवेळी मावळतो; इंद्र पाऊस पाडतो; यम आपली कामें बिनचूक करतो, अग्नि जाळण्याचें काम करतो; जमीन कोणताहि आधार नसतां पाण्यावर तरंगते; एका बीजापासून अंकुर फुटून त्याचा मोठा वृक्ष होतो; शिशूची गर्भात वाढ होते व मातेच्या स्तनांतून दूध येते. हे सर्व करणारा तो परमात्माच नव्हे का? मोरास रंग देणारा कोण ? कोकिळेस गोड गळा देणारे कोण? तन्हेत-हेची फुलें निर्माण करून त्यांत सुवास उत्पन्न करणारा कोण? विभिन्न फळे निर्मून त्यांत अमृतरूपी गोड रस भरून ठेवणारा कोण? मनुष्यास बोलण्याचो शक्ति देणारा कोण ? एवढ्याशा लहान असणान्या डोळ्याच्या बाहुलींत एवढे मोठे दृश्य कोणामुळे दिसतें ? देहांतच आपल्याला सर्वकाही समजण्याची शक्ति देणारा कोण? ही सर्व त्या परमात्म्याची शक्ति नाही का?

एक देव सोडल्यास ह्या जगांत कोण कोणाचा आहे ? बालकास जन्म देऊन माता मरण पावल्यावर त्या बालकाचे संगोपन करण्याची बुद्धी देवच इतरांना देऊन त्याचे संगोपन करवीत नाहीं कां? जग निर्माण करून त्याचे संरक्षण करून व शेवटी त्याचा लय करणारा देव नसून दुसरे कोण आहे ? समुद्रास मर्यादा घालून सीमा बांधून देणारा तो परमात्माच नव्हे काय ? इतर कोणाचे म्हणणे समुद्र ऐकेल ? परमात्म्याचे शासन नसते तर पृथ्वी कधीच पाण्यात विरघळून गेली असती नाहीं कां ? मनुष्य आपण स्वतःच कांही करू शकत नाही. त्याचे तोंड त्यालाच दिसत नाही तसेच त्याची पाठहि त्यास दिसत नाही. देहामधील व्यवहार त्यास समजत नाहीत. एखाद्या लहान दगडाची ठेच लागली तर झाड मोडून पडल्याप्रमाणे तो अडखळून खाली पडतो. अशा प्रसंगी त्याचे रक्षण करणारा कोण ? मेल्या त्याच्या पापपुण्याचा विचार करून त्यास सद्गति किंवा दुर्गति देणार कोण ? राजाला किंवा लहानशा अधिकाऱ्याला आपण भिऊन वागतो मग आपण देवास किती भिऊन वागले पाहिजे बरें? राजा अधिकारी यांच्यासमोर किती विनयाने वाकून, नमून आपण वागतो। मग देवासमोर किती विनयाने व नम्रतेने वागावयास पाहिजे बरें! एखाद्या सावकाराचा आपणास फार मोठा आधार आहे असे आपण म्हणतो. मग देवाचा आपणास किती आधार वाटावयास हवा? आपल्यास जन्म देणाऱ्या, आपल्या जन्मास कारणीभूत असून आपले पालन-पोषण करणाऱ्या आपल्या आईवडिलांवर आपलें जेवढे प्रेम असते त्यापेक्षां परमात्म्यावर आपलें किती प्रेम असावें बरें!

श्रीनारदांनी ‘अथातो भक्ति व्याख्यास्यामः’ असें म्हणून भक्तीचें । लक्षण सांगितले आहे. ‘सा त्वस्मिन् परमप्रेमरूपा अमृतस्वरूपा च ।। परमात्म्याच्या ठिकाणी अचल व अतिशय असणाऱ्या प्रेमासच भक्ति असें म्हणतात. यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो | भवति ।‘ जें प्राप्त झाल्याने मनुष्य सिद्ध, अमर आणि तृप्त होतो तीच भक्त्ति. तुम्हाला आपल्या प्रिय व्यक्तींवर प्रेम करण्याचे माहित आहे, परमात्मा सर्वांहूनहि जास्त प्रीतिपात्र आहे. तेव्हा दुसरीकडे वाहाणारे तुमचे प्रेम ह्या बाजूने वहावयास हवे. नुकतेच लग्न झालेल्या पतिपत्नीमधील प्रेमाप्रमाणे प्रेम आणि खाण्यापिण्याच्या पदार्थावरील लक्ष्य जर परमात्म्याकडे लागले तर तो मानव जीवनमुक्त होईल. त्यासाठी निराळा खटाटोप करण्याची गरज नाही.

श्रीमद्भागवतामध्ये भक्तीचे नऊ प्रकार दिले आहेत. ‘श्रवणं कीर्तनं विष्णोःस्मरणं पादसेवनम् । अर्चनं वन्दनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनम् ॥’ भगवंताच्या लीलेचे वर्णन ऐकणे व ऐकलेलें तितक्याच प्रेमाने इतरांना ऐकवणे म्हणजेच ‘श्रवण व कीर्तन’. सतत नामस्मरण करीत असणे, ह्यालाच ‘स्मरण’ भक्ति म्हणतात. श्रीगुरुची चरणसेवा करण्यासच पादसेवन’, पूजा करण्यास ‘अर्चन’ व नमस्कार करण्यास ‘वंदन’ असे म्हणतात. श्रीगुरुची व देवाची निःस्वार्थपणे सेवा करणे हैं ‘दास्य’ होय. आपले मित्र, आई, वडील, इष्ट, बंधु ह्यांच्यापुढे आपण आपलें अंतःकरण मोकळे करतो त्याप्रमाणे परमात्म्यासमोय आपले अन्तःकरण उघडे करणे हे सख्य व परमात्म्यास सर्वस्व अर्पण करणे म्हणजेच ‘आत्मनिवेदन’ होय. अशा ह्या नऊ प्रकारच्या भक्तींना ‘ नवविधाभक्ति’ असें नांव आहे. ह्यापैकी एक किंवा सर्व प्रकारच्या भक्ति करून आपण धन्य झाले पाहिजे.

सकीय॑मानः शीघ्रमेवाविर्भवति अनुभावयिति भक्तान् ।’

अशा त-हेनें परमात्मा प्रसन्न होण्यासाठी त्याची भक्ति केल्याने, त्याची स्तुतिस्तोत्रं, ध्यान, जप, अखंड आचरल्यास शीघ्र आविर्भूत होऊन तो परमात्मा भक्तावर अनुग्रह करतो. परमात्म्याची भक्ति करून त्याच्या संपूर्ण कृपेस पात्र झाल्यास तें महत्तम भाग्य होय. अशा प्रकारें परमात्मकृपापात्र होण्याचे भाग्य तुम्हा सर्वांस लाभो अशी भगवंतचरणी प्रार्थना करतो.

ॐ तत्सत्

home-last-sec-img