Literature

भाद्रपद वद्य चतुर्थी

दुःखाची समूळ निवृत्ती होऊन जो निरवधि आनंद प्राप्त होतो त्यालाच मोक्ष म्हटले जाते. स्वस्वरूपामध्ये
प्राप्त होणाऱ्या स्थितीस ' मोक्ष ' म्हणतात. ज्याच्या लाभापेक्षा मोठा लाभ असू शकत नाही. ज्या सुखापेक्षा
इतर कोणतेही जास्त सुख असत नाही, तसेच ते समजून घेतल्यावर इतर काही समजून घेण्यासारखे नसते
तेच आनंदस्वरूप ब्रह्म मीच आहे असे निश्चयपूर्वक समजावे.

जो शास्त्रविधींचा त्याग करून इंद्रियसुखाच्या आधीन होऊन आपले जीवन फुकट घालवितो त्याला
आत्मज्ञानरूप सिध्दी प्राप्त होत नाही. त्याला ऐहिक सुख मिळत नाहीच पण मोक्षही मिळत नाही. यासाठी
कार्य कोणते, अकार्य कोणते हा विधिनिषेधरूपी मार्ग जाणण्यासाठी शास्त्र हेच एकमेव प्रमाण होय. निव्वळ
मानवीबुध्दीने त्याचे ज्ञान होत नाही. शास्त्रविधीचे उत्तमप्रकारे ज्ञान करून घेतल्यावरच जीव कर्म करण्यास

योग्य असा होतो. मोक्षप्राप्तीस साधनभूत असणाऱ्या दिव्य जीवनाचा आदेश ज्याच्यामुळे प्राप्त होतो त्यास
शास्त्र असे म्हणतात.

श्रुत्युक्त उपदेशच इहपरसाधक आहे यात किंचितही संशय नाही. एकमेव श्रुतीपासूनच ऐहिक जीवनात
सफलता व परमात्मसुखाचा लाभ होतो. श्रुतींनाच वेद म्हटले जाते. मानवधर्म कोणते हे जाणून घ्यावयाचे
असेल तर त्याला एकमात्र परमप्रमाण श्रुतीच होत. हा धर्म प्राकृतबुध्दिगम्य नाही. श्रुतीशिवाय जीवनात
सुफलता नाही हे यावरून स्पष्ट होते. यादृष्टीने जीवनात सफलता मिळवण्यासाठी श्रुतीचा आश्रय घेणे हे
मनुष्यमात्रांचे अनिवार्य कर्तव्य ठरते.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img