Literature

भाद्रपद वद्य सप्तमी

सर्व मंत्र हे सोsहं वाचक आहेत. आपण श्वास घेताना ' सो ' असा श्वास सोडतांना ' हं ' असा शब्द
साहजिकच होत असतो. प्रत्येकजण ' सोsहं ' अशा स्वरूपाचीच उपासना अखंड करीत असतो ते
परमात्मस्वरूपाच असे अतूट आत्मसंबंधीचे आहे, अनुभवरूप, जाणीवरूप असा मी संवेदनारूप असा स्वयं
एक आनंद परमात्माच आहे अशी खुणगाठ बांधून वागावे.

सदा प्रकाशमान, अविद्या व तिचे जितके म्हणून उत्पत्तिनाशयुक्त कार्य आहे तद् विहीन आपल्या आपण
स्वज्ञानरूपी बंध समूळ नष्ट करणारा, सदैव द्वैतरहित, आनंदरूप, सर्वाधार स्वमात्र अविद्या आवरण
अज्ञानमोह नष्ट झालेला, ॐकारवाच्य लक्ष्य तें जें चिदात्म रामचंद्ररूप परब्रह्म आहे, सर्वाधिक अनंत
प्रकाशरूप ॐकारलक्ष्य जे रामभद्ररूप आहे तेच मी अशा जाणीवेने आनंदघन परब्रह्माशी आपले एेक्य

करावे. हे ऐक्य दृढ करा ! हे ऐक्यच आनंदघनरूपच जपामध्ये पहा. ध्यानात पहा, तदाकाराने, समाधीत असता
आणि उत्थान झाल्यानंतरही तुमच्या साऱ्या व्यवहारात पहातांना, बोलताना, ऐकताना, जातांना, येतांना,
बसतांना, उठतांना, श्वास घेतांना सोडतांना याचाच अनुभव घ्या ! आनंदमात्र स्थितीत असणे हेच जीवन
आणि हेच आपले अस्तित्व माना. या धारणेनेच अंतर्बाह्य विघ्ने म्हणजेच भिन्न कल्पना समूळ नष्ट करून,
चुकलेले मिळवून एक आनंदमात्र रूपानेच तुम्ही शिल्लक रहा ! हा माझा तुम्हा सर्वांना मंगल आशीर्वाद आहे.
ॐ तत्सत्.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img