Literature

भाद्रपद शुद्ध एकादशी

दुःखाच्या अत्यंतिक अभावपुर्वक निरतिशय आनंदस्वरूपाची प्राप्ती होणे यालाच ' मोक्ष ' असे म्हणतात.

हा मोक्षानंद उत्पत्तिनाशशून्य, सदासर्वदा एकरूप असणारा असतो. यात या व्यतिरिक्त ऐकण्यास,
पहाण्यास, अनुभवावयास आणि रहाण्यासही पण दुसरे काहीही नसते. अशा ब्रह्मानंदाची प्राप्ती गुरूकृपेने
होत असते. येथे सर्व संसारबंधने आपोआप तुटून जातात. अशाप्रकारे संसारबंधनापासून झालेल्या कायम
सुटकेलाच ' मोक्ष ' म्हणतात.

ध्यान करावयास योग्य असे एकमेव गुरूवाक्यच आणि मोक्षाचे मुख्य कारण म्हणवून घेण्यास योग्य अशी
गुरूकृपाच एकमेव समर्थ आहे. गुरूंना ' गुरूमाऊली ' म्हणून संबोधितात ना ! सद्गुरू आईहुनही कितीतरी
पटीने निस्वार्थी व कोमल ह्रदयांचे असतात. सद्गुरूंचे उपकार फेडता येत नाहीत. आईसह प्रपंचातील सर्वही
नाती संकुचित व सापेक्ष असतात. निरपेक्ष प्रेमाचे आणि निरतिशय आनंदाचे सर्वसमान, सर्वांचे ' सद्गुरू ' हे
सर्वोत्कृष्ट माहेरघर आहे.

तत्त्वज्ञान अतीद्रिंय असल्याने आदिनारायणापासून म्हणजेच मुळपुरूषांपासून परंपरागत तत्त्वज्ञान प्राप्त
झालेल्या मानवीदेहधाऱ्यापर्यंतच्या अनुभवी श्रोत्रीय गुरूपासून ते लाभते. श्री समर्थ संप्रदायाच्या गुरूपरंपरेला
' आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणञ्य वसिष्ठकम् ' असा प्रारंभ झाला आहे. सकल देवदेवता या एका अर्थाने

गुरूच होत. त्यांची गुरूभावानेने आराधना केल्यास साक्षात त्याच्यापासूनही ब्रह्मविद्येचा लाभ झालेल्या भृगु,
याज्ञवल्क्यादींची उदाहरणे आहेत. श्रीसमर्थांचेही यातलेच उदाहरण होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img