Literature

भाद्रपद शुद्ध चतुर्थी

चर्मचक्षुंनी दिसणाऱ्या दृश्यास ' बाह्यप्रपंच ' म्हणतात व शरीरातील कल्पना तरंगांना ' अंतःप्रपंच ' हे नाव
आहे. या बाह्य व अंतःप्रपंचाच्या आच्छादनांत परमात्मा झाकलेला आहे. ही आच्छादने काढून
टाकल्याशिवाय त्याचे यथार्थदर्शन होण्याचा संभव नाही.

बाह्यप्रपंचामध्ये परमात्मा नामरूपादी आवरणांनी आच्छादलेला असतो. बाह्यदृष्टीचे प्रतीक असलेली ही
आवरणे विवेकाच्याद्वारे बाजूस सारून ज्ञानदृष्टीने परमात्म्याच्या निर्गुण, निराकार सच्चिदानंदात्म
सत्यस्वरूपाचे अखंड दर्शन केले पाहिजे.

अंतःप्रपंचामध्ये परमात्मा तरंगामध्ये किंवा बुडबुड्याप्रमाणे एकानंतर दुसरी उत्पन्न होणारी विविधवृत्ती
आणि त्याचप्रमाणे त्यास जाणणारा ' अहं ' या स्मृतिसंवेदनात लपलेला असतो. या दोन्ही आवरणांना
बाजूला सारले पाहिजे.

ज्याप्रमाणे सोनार अलंकाराच्या आकारातून दृष्टी दूर करून हटवून सोन्यातच दृष्टी ठेवतो किंवा विवेकी
मनुष्य तरंग, बुडबुडे व फेस ह्यावरून दृष्टी हटवून निश्चल जलाकडे पहातो त्याप्रमाणे यथार्थदृष्टीने चंचल
कल्पनांना हटवून ' अहं ' रूप आत्मसंवेदनातून पृथक् करून, आपल्या नित्यज्ञानरूपतेने प्रकाशित करणाऱ्या
त्याच्या लक्ष्यभूत नित्यनिर्विकल्प, नित्य निर्विकार सच्चिदानंद परमात्मस्वरूपाची धारणा नित्य वाढवीत
राहिली पाहिजे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img