Literature

भाद्रपद शुद्ध पंचमी

जेव्हा कांही कल्पना स्फुरत नाहीत, मी या आत्मस्मृतीचेही भान रहात नाही व निर्विकल्प तसेच
निराभासस्वरूप स्वयंप्रकाशरूपाने निरावरण होऊन आपल्या एकमात्र निरवधि आनंदाने अखंड प्रकाशित
राहिले तरच स्वरूपाचा साक्षात्कार झाला असे समजावे.

तरंगाचा अभाव झाल्यावर समुद्र ज्याप्रमाणे निश्चल रहातो त्याप्रमाणेच वृत्तिशून्य ' अहं ' ही स्वरूपस्मृती,
स्वयं निश्चल असा ज्ञानानंदाचा अगाध समुद्रच होते आणि आपल्या पूर्व सत्यस्वरूंपात एकजीव होऊन शांत
होते, निर्विकल्प होते, स्वतः ब्रह्मरूप होते.

अखंड दर्पणांत दिसणाऱ्या प्रतिबिंबासारख्या एका अखंड आत्मस्मृतीत माया अविद्याद्वारे ईश, जीव,
पिंड, ब्रह्मांड आदि प्रपंच सत्यस्वरूपाच्या अज्ञानाचे कारणच दर्शवीत असते. समोर पदार्थ नसले तर दिसणारे
प्रतिबिंबसुध्दा नष्ट होऊन शेवटी जसा एकमेव आरसाच शिल्लक राहतो तसेच ' अहं ' आत्मस्मृतीच्या समोर
ज्ञात होणारी अविद्या, माया, जीव, ईश, पिंड, ब्रह्मांड आदि अज्ञानजन्य कार्यकारण-उपाधी निर्विकल्प चित्
स्वरूपाच्या तीव्र धारणेने नष्ट झाल्यावर दिव्य, निर्विकार, निर्गुण, निराकार, एकमेव सच्चिदानंदस्वरूप
आपल्या लक्षणांचीच अखंड प्रकाशित होते, यालाच ' ब्रह्मसाक्षात्कार किंवा आत्मसाक्षात्कार ' म्हणतात.

*श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img