Literature

भारतीय कोण

चीन देशांत जन्म घेऊन पूर्वापार चालत आलेल्या तिथल्या संस्कृति प्रमाणे वागणाऱ्याला चिनी म्हटल्याप्रमाणेच जपानी, अफगाण, अरब, इंग्लिश जर्मन, फ्रेंच, अमेरिकन म्हणून म्हणण्यांत येते. त्या त्या देशांत जन्म घेऊन तिथल्या तिथल्या संस्कृतिप्रमाणे वागणाऱ्यांना द्योतक अशी नांवें प्राप्त झाल्या प्रमाणेच या भारतांत जन्म घेऊन इथल्या आर्य संस्कृतिप्रमाणें वागणाऱ्याला भारतीय म्हणून म्हणतात. या भारत देशालाच आर्यावर्त, हिन्दुस्थान अशीहि पण नांवे असल्यामुळे येथल्यांना आर्य, हिन्दु असेंहि म्हणतात. ऋग्वेदादिक आर्यांचे धर्मग्रंथ आहेत. आर्य संस्कृतीचा हाच एक पाया आहे. ऋग्वेदादि वाड्मय अति प्राचीन आहे, त्यांतसुध्दां भारत या शब्दाचा उल्लेख आहे. ‘The Rigwedas are the Hindu sacred writings which are probably the oldest literary compositions in the world.’ (Wall’s Sexa nd Sex worship, p. 8) विश्वांतल्या अखिल वाङ्मयांत अतिप्राचीनतम असे जर कोणतें वाय असेल तर ते हिंदूंचे ऋग्वेदादि अतिपवित्र धर्मग्रंथ होत, असे पाश्चात्य पंडित सुद्धां घंटाघोषाने जगास कळवीत आहेत. यांतसुध्दां’ भारत’ हा शब्दप्रयोग दिसून येतो. य इमे रोदासि उभे अहामींद्रमतुष्ठवम् । विश्वामित्रस्य रक्षति ब्रह्मेदं भारतं जनम् ॥ (ऋ. ३-५३-१२) आकाश व भूमी यांच्यामध्यें अंतरिक्षांत असणाऱ्या इंद्राला मी संतुष्ट केले आहे, त्याची प्रार्थना केली आहे. विश्वामित्राचे ब्रह्मात्मक उपास्य दैवत भारतीय लोकांचे संरक्षण करते असा या मंत्राचा अर्थ आहे. महात्मे देवांची प्रार्थना करून लोकांचे संरक्षण करतात हें या मंत्रावरून स्पष्ट होते. भासि वा भायां वा रतः भारतः । स्वप्रकाश आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रत असणारा भारत. भारूपं परं ब्रह्म तस्य स्वयं प्रकाशत्वात् । तस्मिन भारूपे ब्रह्मणी रतः सक्तः भारतः। ब्रह्म स्वयंप्रकाश असल्यामुळे त्यास भारूप म्हणून म्हटले जाते. भारूप परब्रह्मांत जो अखंड रत असतो (आसक्त असतो) त्यालाच भारत म्हणून म्हटले जाते. भारूप आत्मा सर्वगतः तस्मिन् भारूपे आत्मनि रतः भारतः । स्वयंज्योति आत्मरूप सर्वगत आहे. त्या आत्मत्वाच्या ठिकाणी रत असणाऱ्याला भारत म्हणून नांव आहे. मा ब्रह्मविद्या तस्यामेव रमत इति भारतः । ‘ भा’ म्हणजे ब्रह्मविद्या, त्या ब्रह्मविद्येच्या ठिकाणींच रममाण होणारा भारत होय. आ नो यज्ञं भारती तू यमेत्विळा मनुष्वदिह चेतयन्ती । तिस्रो देवीबर्हिरेदं स्यानं सरस्वती स्वपसः सदन्तु (ऋ.) एतु नो यज्ञं भारती, क्षिप्रं भरत आदित्यस्तस्य भा इळा च मनुष्यवदिह चेतयमानाः तिस्रो देव्यो बर्हिरिदं सुखं सरस्वती च सुकर्मणा आसीदस्तु || (निरुक्त २-८-१३) मनुष्याप्रमाणे आमच्या ठिकाण ममत्व ठेऊन तुम्ही तीन देवता आमच्या यज्ञाला लवकर या, असा याचा भावार्थ आहे. या मंत्रांत भारती शब्द आला आहे. या भारती पदाचा अर्थ निरुक्तांत खालीलप्रमाणें केला आहे. भरत आदित्यः तस्य भा स्वभूता दीप्तिः भारती। भरत झणजे सूर्य आणि त्याची प्रभा ही भारती असा यास्कांनी अर्थ केला आहे. श्रुति सूर्याविषयी काय सांगते तें पाहू. सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्र्व (ऋ. १-११५ १) सर्वस्य प्रेरकः परमात्मा जगतो जंगमस्य तस्थुषः स्थावरस्य चात्मा स्वरूपभूतः । ( सायणः) हा सूर्यमंडलांतरवर्ति सर्वप्रेरक परमात्माच या स्थिरचर विश्वाचे आत्मरूप. तैत्तिरिय उपनिषदाच्या भृगुवलीत स यश्चायं पुरुषे यश्चासावादित्ये स एकः ॥ (३-४) एक परमात्माच या देहांत आणि त्या सूर्यमंडळांत व्यापून आहे या दोन वचनांनी श्रुयुक्त उपासनेचा क्रम अवगत होतो, भारतीयांच्या उपासनेची पध्दत समजून येते व स्वप्रकाश आत्मस्वरूपति रत असणाराच भारत या तत्त्वाला पुष्टि मिळते. श्रीमद्भगवद्गीतेत तर भारत शब्दाचा प्रयोग पुष्कळ ठिकाणी आला आहे. ‘ पश्याश्चर्याणि भारत’ | ‘सत्त्वं भवति भारत’ | ‘व्यक्तमध्यानि भारत’ । ‘ तन्निय ध्नाति भारत।’ इत्यादि.

श्रीमद्भागवताच्या पंचम स्कंदाच्या चतुर्थाध्यायांतील प्रमाणावरून भगवान ऋषभदेवाचा जेष्ठ पुत्र भरत याच्या कालापासून याचे नांव प्राप्त झाले व तेव्हापासून या देशाला भारतवर्ष हे नांव आले असे मानले तरी वरील भारत या शब्दाच्या अर्थाला पुष्टिच येते. “History repeats itself ” इतिहासाची पुनरावृत्ति होत असते या न्यायानें ऋषभपुत्र भरताने या देशाची पूर्वील आत्मनिष्टा उजळली असा याचा अर्थ होतो. आणि भरत हे दोघेहि आत्मनिष्ट होते. यथा राजा तथा प्रजा या नात्याने भरताच्या उपदेशानें पुन्हां सकल राष्ट्र आत्मनिष्ट झाले हे यामुळे उदूघोषित होते. भारत या शब्दाचा आत्मनिष्ट असा अर्थ एवंच वेदकालापासून आला असून हे भारतवर्षाचे व तंत्रस्य राजाप्रजाजनांचे एक स्वरूप लक्षण आहे असा या सर्व विवेचनावरून निष्कर्ष निघतो. वैशिष्टयद्योतक हा भारत शब्द आहे आणि गौरवार्थी व जाणीव या अर्थी याचा उपयोग पूर्वी होत होता है श्रीभगवद्गीताच्या ‘भारत’ या अनेक ठिकाणी आलेल्या संबोधनावरून आढळून येतें.

home-last-sec-img