Literature

माघ वद्य अमावस्या

आनंदघन असे जे पूर्णस्वरूप तेच गुरूस्वरूप होय. ते आपल्याच श्रेष्ठत्वाने परिपूर्ण असते. यात विश्वकल्पनेचा अभाव असल्याने त्यामध्ये विश्वाचा कार्यकरण भाव नाही. संपुर्णपणे परिपूर्ण असलेल्या या वस्तूला सांगणे, विचारणे व पहाणे अशक्य आहे. हेच अनंतरूप, अपाररूप आहे असे श्रुतींनी सांगितले. जे पहाता येते, ते ऐकू येते, जे समजून घेता येते असे जे जग अत्यंत अल्प आहे, म्हणूनच ते क्षणभंगूर आहे. क्षणाक्षणांत त्यात बदल होत असल्याने त्यास निश्चित असे रूप नाही. ते आभासरूप असल्याने काही काळ सत्यस्वरूप भासत असले तरी ते ब्रह्मस्वरूप नव्हे. स्वतःसुखरूपी नसणारे हे जग सुखाभासी असले तरी आभासरूपच होय. स्वयंप्रकाशरूपी असलेले गुरूतत्त्वच खरे सुख असल्याने त्याविरूध्द असलेले हे जग सुखरूप कसे असणार ?

उत्पन्न झालेले हे जग ही एक वस्तु आहे अशी कल्पना केल्यास त्याचा निर्माणकर्ता ईश्वर आहे असे म्हटले तर त्या ईश्वरतत्त्वाच्याही पूर्वी व त्या तत्त्वपेक्षाही अद्वितीय अशी ब्रह्म किंवा गुरू ही सत्यवस्तु असल्याने इतर सर्व आभासरूप आहे हे उघड आहे.

सद्गुरूपद हे नित्य, निर्विकारी आहे. अविकारी, अविनाशी अशा रूपाला कोणतीच उपमा नसल्याने ते अनुपमेय होय. सर्वश्रेष्ठ स्थिती म्हणजेच गुरूपद होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img