Literature

माघ वद्य अष्टमी

जगताला संतचरित्राचा अतिशय उपयोग होतो. त्यापासून आत्मोन्नतीचा धोपटमार्ग दृग्गोचर होतो. संतचरित्रापासून उत्कृष्ट जीवनलक्षणे व मानवी उच्च ध्येय कोणते हे ठरविणे सोपे जाते. मोठ्यांची चरित्रे सांगणे वा ऐकणे कशासाठी ? तर त्यात विशिष्ठ संदेश असल्याने आपले जीवन उन्नत करण्याचा मार्ग सापडतो व उत्साह, धैर्यही प्राप्त होते.

संताच्या उपासनेने त्यांच्यातील विशिष्ट शक्ती आपल्यात अविर्भूत होऊ शकते व त्यामुळे आपल्या जीवनाचे सार्थक होऊ शकते. आपण आपल्या सुखासाठीच सुखप्राप्ती करून घेत असतो. आपले प्रयत्नही स्वार्थासाठी असतात. कोणताही मूढ मनुष्य प्रयोजनाशिवाय कोणतेच कार्य करीत नसतो ही गोष्ट खरी आहे. उत्सव करणे इत्यादी सर्व गोष्टी आपल्यासाठी आहेत. संतांना पुजा, नैवेद्याची आवश्यकता नसते व त्यापासून त्यांना काहीच लाभ नसतो. स्वयंप्रकाशी असणाऱ्यास दिव्याची गरज नसते.त्याप्रमाणे त्यांना धूप-दीपाची गरज नसते, आहाराचीही गरज नसते. ते ब्रह्मानंदस्वरूपात नित्यतृप्त असतात. मग त्यांना नैवेद्य कशाला ? कोणतीच अपेक्षा न ठेवताच सज्जनांची सेवा केल्यास संतृप्ती मिळवुन स्वल्पसेवेने संतुष्ट होऊन ते आपल्यावर कृपा करतात. त्यांच्या आराधनेने ज्ञान, वैराग्य, भक्ति व विभुति महत्त्व हे सर्व आपणास कळते. त्यांची सेवा आपल्या उध्दारासाठी तर आहेच पण जीवनसाफल्यासाठीही आहे, त्यांच्या उध्दारासाठी नव्हे. त्यांचे भजन करणारे त्यांच्या सारखेच होतात. म्हणूनच आपण श्रीसमर्थांचा हा उत्सव करीत असतो.

*श्रीसद्गुरू समर्थ रामदासस्वामी महाराज की जय !*

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img