Literature

माघ वद्य द्वितीया

परमात्म्याच्या वात्सल्याचे निरातिशय प्रेम म्हणजे भक्ति. कोणत्याही कर्माची पूर्ती भक्तीशिवाय होत नाही. आत्मचैतन्यामुळेच सर्वज्ञान प्राप्त होत असते. ज्याचा राग, द्वेष पूर्ण गेला आहे. त्यालाच धर्म अधर्म विचारावा. परमेश्वराची कृपा ही अफाट, अथांग. भयंकर असणारा हा भवसागर तरून जाण्यासाठी सोलीव चैतन्याचा भववैद्य आहे. भवरोग्यांचा विषय हाच एक रोग आहे आणि त्या रोगापासून मुक्त करण्याचे सामर्थ्य, सामर्थ्यांनी युक्त असलेल्या समर्थांशिवाय कोणाला असणार ? आणि म्हणूनच *’ समर्थे समर्थ करावे | तरीच समर्थ म्हणवावें || ‘* म्हटले जाते.
परमार्थामध्ये विघ्ने फार. जितके मोठे ध्येय तितकी विघ्नेही फार. अशांना जो तोंड देतो तोच विश्ववंद्य होतो. भगवंताच्या चरणी लीन झाल्यावर तेजस्वी मनुष्य परमार्थात सर्व गुणांनी सौंदर्याने कर्तृत्वाने, अविष्काराने उत्कटपणे उजळून दिसतो. उत्कट महिमा तोच परमात्म्याचा महिमा. त्याच्या ज्ञानाची इतकी महती आहे की, त्याच्या भक्तीमुळे तो भक्त परमात्माच होतो . परमात्मा म्हणवून घेतो, तोच तो होतो, त्याच्याहून वेगळा असा शिल्लकच रहात नाही, एकरूप होतो, मिसळून जातो. ज्याची जशी उपासना तसा तो बनतो ‘ *झाले साधनाचे फळ* | ‘ म्हणून रघुनाथ हा श्रेष्ठ, थोर, विश्ववंद्य, त्याची भक्ती करणारेही श्रेष्ठ, थोर, विश्ववंद्यच. थोरांची कास धरली की ती थोरपणालाच नेते, असे श्रीसमर्थांनी स्वतः करून दाखविले आहे.

*श्रीसद्गुरूसमर्थ रामदासस्वामी महाराज की जय !!*

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img