Literature

माघ वद्य सप्तमी

श्रीसमर्थाना कशाचीच कमतरता नव्हती. उलट पुष्कळशी अनुकूलताच होती. त्यांची देहयष्टीही सुदृढ होती. असे असतांना सर्व संगपरित्याग करून ते घराबाहेर का पडले ? लग्न मंडपातून ते कां पळून गेले ? ब्राह्मण्यं व वेदधर्माच्या रक्षणाचे प्रयत्न करण्याचे प्रयोजन काय ? हे सर्व जगत्कल्याणासाठीच ना ? जनतेस आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान व्हावे याकरता ना ? या सर्व कारणासाठीच श्रीसमर्थांनी आपल्या ऐहिक सुखावर तुळशीपत्र ठेवले, आपले संपूर्ण जीवनच जगदोद्वारासाठी खर्च केले म्हणूनच आपण त्यांचा उत्सव करतो. त्यांना पुजेची अपेक्षा नाही ! तसेच आपला गौरव व्हावा असेही वाटत नाही. हे सर्व आपणच त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकाराचे स्मरण म्हणून करीत असतो. पण यामुळे त्यांच्यावर उपकार करीत नसून आपलेच कल्याण साधित आहोत. त्यांनी केलेल्या आपल्यावरील उपकारांचे व त्यांच्या सद्गुणांचे आपण नेहमी मनन करून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच प्रयत्नशील असले पाहिजे. प्रेमानेच प्रेम वाढते. श्रीसमर्थांनी जगकल्याणासाठी सर्वस्वाचा त्याग करून अत्यंत कष्ट केले. आपण त्यांची सेवा प्रेमाश्रुंनी केली पाहिजे. त्यांचे चरित्र आपल्याला नेहमीच मार्गदर्शक ठरत आले आहे. *’ मना चंदनाचेपरी त्वां झिजावे | ‘* म्हणजेच ‘ हे मना, तूं धर्मपालनासाठी व सज्जनांच्या रक्षणासाठी चंदनासारखा देह झिजव ‘ हाच श्रीसमर्थ चरित्रांचा मुख्य आदर्श होय.

*श्रीसद्गुरू समर्थ रामदासस्वामी महाराज की जय !*

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img