Literature

मानवी जीवनाचे ध्येय

मानवी जीवनाचे ध्येय कोणते व ते आपल्या दैनंदिन जीवनांतून कसे प्राप्त होईल ? याचे विवरण आज करणार आहे.

आपणास इतर सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष्य करिता येईल किंवा इतर सर्व सोडून देता येईल, परंतु आत्मोद्धार मात्र टाळता येणार नाही.’ जो पावेतों इंद्रिय कार्यक्षम आहेत, देह सुदृढ आहे, विचारशक्ति शाबूत आहे, कार्यक्षमता आहे, तो पावेतोच आत्मोद्धारार्थं झटणे हे मानवाचे कर्तव्य होय.

“आत्मश्रेयसि तावदेव विदुषा कार्यः प्रयत्नो महान्।” आत्मोद्धारच या जीवनाचे मुख्य ध्येय आहे. असे असतांना विशिष्ट वय होऊ दे, असें म्हणण्यांत काहीच अर्थ नाही. गेलेले आयुष्य फुकट होय. म्हातारपणी कोणतीच गोष्ट होत नाही. कारण त्यावेळी विषयांत एकसारखें गुंतल्यामुळे व तापत्रयरूपी पाण्याने जडत्व आल्यामुळे अंत:करण दुर्बळ झालेले असते. ही अवस्था आत्मोद्धारासाठी योग्य नाही. एखाद्यास म्हातारपणीच आत्मोद्धाराची स्फूर्ति आली तर? त्याचीहि प्रगति होवो. परंतु आत्मोद्धारासाठीच हा मानव जन्म असल्याने शरीर व मन यांची वाढ होत असतानाच- तारुण्यांतच- आत्म्याच्या विचाराचा व आत्मोद्धाराचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. पूर्वी परम भगवद्भक्त व महाज्ञानी असलेल्या प्रल्हादाने आपल्या सवंगडयांना हीच गोष्ट सांगितली होती. “पूर्वे वयसि यः शांतः स शांत इति कथ्यते।” उत्तम शांति मिळविण्याची वेळ म्हणजे बाल्यावस्थाच होय.

सर्व प्राणिमात्रांचे जीव निरनिराळे दिसत असले तरी, ते सर्व सुखाकडेच धाव घेत असतात. सुख मिळविण्याच्या उद्देशानेच सर्व प्रवृत्ति, प्रयत्नांची पराकाष्ठा होत असते. सुखासाठी निरंतर प्रयत्न व खटपटी चालू असतात. परंतु तें सुख कोठे आहे? आणि कोणते?

बाहेर दिसणारे पदार्थ सुख असे समजून ते मिळविण्यासाठी खटपट करणारा जीव सगळीकडे सारखाच. कारण अशी प्रवृत्ति पशुपक्ष्यांमध्ये, स्वर्ग नरकांत सुद्धा सारखीच दिसते. म्हणूनच विषय सुखाचा अनुभव सर्वांना सारखाच. म्हणून त्या सुखासाठीच मानव जन्माचा उपयोग करणे योग्य नाही. विषयसुख हेच खरे सुख आहे का? त्यापेक्षा दुसरे कोणतेच शाश्वत सुख नाही काय? विषयाशी संबंधित नसलेले व विषयसुखापासून मिळणाऱ्या सुखापेक्षा श्रेष्ठ असे शाश्वत सुख दुसरे नाही काय? असल्यास ते कसे मिळवावयाचें? असा सूक्ष्म विचार करून शाश्वत परम सुख मिळविण्यासाठी व बुद्धि-शक्ति यांचा उपयोग करण्यासाठींच आपणास नरदेहप्राप्ति झाली आहे हे विसरू नये. परम सुखरूपी आत्म्याचे ज्ञान म्हणजेच परमात्मपद हे समजून घेऊन, परमात्म्याचे ध्यान करून, त्यांतच जीवनसाफल्य प्राप्त करून घेणे हे मानवाचे मुख्य कर्तव्य आहे.

प्रत्येक मनुष्यमात्र शाश्वत सुखासाठी सारखी धडपड करीत असतो. परंतु सुखासाठी मिळणारे वैषविक अनुभव आपल्यास समाधान मिळू देत नाहीत. हे जाणून अनुभवी साधकाने “तमात्मस्थं येऽनुपश्यति धीराः तेषां सुखं शाश्वतं नेतरेपाम् ।।” आपल्यातच असलेल्या परमात्म्याला आपण जाणू शकलों हेच शाश्वत सुख होय, असे म्हटले आहे. यावरून सर्व ठिकाणी सर्व प्राणिमात्रांत वसत असलेले हे आत्मतत्त्व आहे हे उघड होते. त्यालाच आपण परमात्मा किंवा ब्रह्मतत्त्व असेंहि म्हणतो, त्याच्या ध्यान-ज्ञानाने आपल्या जन्माचे सार्थक होणार आहे. म्हणजेच अखंड तृप्ति प्राप्त होईल, विषयाच्या मागे लागून मिळणारे सुख हे अशाश्वत सुख होय. कारण “पृथिव्यां यद् व्रिहियवं हिरण्यं पशवः स्त्रियाः नालमेतस्य तृप्त्यर्थमिति मत्वा शमं व्रजेत् ।।” जगांतील धन, धान्य, पशु, स्त्रिया इत्यादि सर्व भोग्यवस्तु एखाद्यास दिल्या तरी त्यास शाश्वत सुख प्राप्त होत नाही असा अनुभव आहे. त्यामुळे तो कृतकृत्यहि होत नाही. विषयापासून शाश्वत सुख मिळत नाही हे जाणून त्याचा त्याग करून मनःशांति मिळविणे यांतच कृतकृत्यता आहे; असें भगवान मनूंनी सांगितले आहे.

सर्वसाधारण मनुष्य-प्रवृत्ति विषयांचा उपभोग घेऊन मग शाश्वत सुखासाठी प्रयत्न करण्याची असते. पण “न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति। हविषा कृष्णवमेव भूय एवाभिवर्धते ।।” विषयसुखाची तृप्ति भोगाने होत नसून ती इच्छा वाढतच जाते. त्यामुळे शांति मिळत नाही. अग्नीत तूप ओतल्याने तो भडकतो, विझत नाही. त्याप्रमाणे जसजसा विषयाचा उपभोग घ्याल तसतशी इच्छाशक्ति त्याकडेच वाढत जावून मनःशांति प्राप्त होणे कठीण होते. विषयसुखांतून मनःशान्ति मिळविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मीठ विरघळविलेल्या पाण्याने आपली तहान भागविण्यासारखे होय. एकंदरीत या उदाहणावरून विषयसुखाने मनःशांति प्राप्त होत नाही हे सिद्ध होते. विषयसुख हे अपूर्ण आहे. विषयामुळे सुखाचा भास होत असतो हे उघड असल्याने त्याच्यामुळे तृप्ति कशी मिळणार!! भास तो भासच !! असें असता भोगाच्या मागे लागून सुखप्राप्ति करण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ होय. म्हणून शाश्वत तृप्ति मिळविण्यासाठी पूर्ण अविनाशी, अचल असें सुख प्राप्त करून घेणे अवश्य आहे. परमात्म्याने सर्व वस्तूंची निर्मिती करून सुखच्छाया पसरविली आहे व हे त्याने मानवाचे मन शाश्वत सुखाकडे आकर्षित होण्यासाठीच केले असले पाहिजे. याचे मर्म जाणून विचार करण्यासाठीच या नरजन्माची प्राप्ति आहे. नरजन्माचा मुख्य उद्देश शाश्वत सुख हाच आहे. लहानपणापासून बुद्धीचा विकास होत असल्याने त्या वेळेपासुन परमात्म प्राप्तिसाठी प्रयत्न करणे आपले कर्तव्य होय आणि तेंव्हापासूनच विषयसुखाकडे दुर्लक्ष्य करणे योग्य होईल. कारण मनुष्याचा हा बहुमोल काल व्यर्थ घालविणे अयोग्य आहे. विषय सुख हे “दुरून डोंगर साजरा” याप्रमाणे आहे. डोंगर जवळ जाऊन पाहिल्यास ओबडधोबड दिसतो तद्वतच विषयाचे आहे. याकरिता निजस्थिति जाणणे हे नरजन्मांतील एक कर्तव्य आहे.

विषयसुखाचा अनुभव या मानवास मिळू नये अशीच जर परमेश्वराची इच्छा असती तर जगनिर्मितीचे कार्य झाले असते काय? असा एक प्रश्न पुढे येतो. याचे उत्तर देणे कठीण नसून सोपे आहे. परमेश्वराने आपले महत्व दाखविण्यासाठी जगनिर्मिति केली आहे हे स्पष्ट आहे व त्यामुळे त्याचे अस्तित्व, प्रभाव, सामर्थ्य ही आपणांस अनुभवास येतात. या जगतांतील मानवास सुखांतच ठेवावयाचे असते तर त्याने दुःख निर्माण केले नसते. सर्वसुखदायी कामधेनु, कल्पवृक्ष, नंदनवन या सर्वांच्या निर्मितीचे सामर्थ्य परमेश्वराच्या ठायींच आहे. पण आपणांस या जगतांत काय दिसून येते? रंकापासून रावापावेतों सर्वजण दुःखी, शोकग्रस्त व चिंतामग्नच आहेत. यांतून आपली सुटका कशी होणार? असा एकमेव प्रश्न सर्व मानवजातीपुढे आ पसरून उभा आहे व हा विचार मानवबुद्धि कुंठीत करीत असतो. यावरून या जगतांत काहीतरी उणेपणा आहे हेहि लक्षात येते. एकंदरीत हे जग दुःखमयच, परंतु त्या दयाघन परमेश्वराचा संकेत निराळाच असावा असे वाटते. विषयसुखाची गरज नसलेले शाश्वत सुख व शाश्वत तृप्ति मिळविण्यासाठी त्या सुखाचा संबंध सोडविणे हाच त्या दयाधन प्रभूचा संकेत असावा. शाश्वतसुख व शाश्वत तृप्ति प्राप्त करून घेणे हे या मानव जन्माचे इति कर्तव्य होय.

जीवनांतील कष्ट नष्ट करून अचल, शाश्वत सुखप्राप्तीसाठी प्रत्येकाचा प्रयत्न आहे. परंतु सर्वाना आवश्यक वाटणारे व असलेले हे शाश्वत सुख मिळविण्याकरिता हा मृत्युलोक अपुरा पडतो. कारण यांतील प्रत्येक गोष्ट अशाश्वत आहे. हा मृत्युलोक परलोक प्राप्तीसाठीच आहे. तसेच तो शाश्वत परमसुख प्राप्त करून घेण्याचे एक साधनहि आहे. म्हणून या मृत्युलोकांतील भोग्य वस्तूंत सुख मानणे अयोग्य आहे. शाश्वत सुख हे भोग्य वस्तूंपासून प्राप्त होत नाही. तें भोग्य वस्तूंपेक्षां निराळंच आहे. या दृश्य वस्तूंतहि ते आहे. त्याची प्राप्ति करून न घेता इंद्रिय सुखासाठी जगणे म्हणजे जीवनाचा अपव्यय होय-आणि तसे वागणे हे मानव जन्माचे ध्येयहि नाही. कारण “दृष्ट्वेमान् लोकान् कर्मचितान् ब्राह्मणो निर्वेद मायात् ।” असे श्रुतिवचन असून कर्ममय असलेल्या मृत्युलोकास चांगल्या रितीने जाणून त्यांतून वैराग्य प्राप्त करून घ्यावे असा या वचनाचा भावार्थ आहे.

परमात्म्याने मानवास विशेष अशी बुद्धि, शक्ति दिली आहे. . इंद्रियापासून प्राप्त होणाऱ्या सर्व बाह्य सुखापेक्षा अलौकिक असे सुख कोणते आहे ते ओळखून ते मिळविण्यासाठी शक्ति व बुद्धीचा आपण उपयोग करावा. असे केल्याने चिरशांति म्हणजेच शाश्वत सुख प्राप्त होणार आहे. म्हातारपणापर्यंत किंवा शेवटचा श्वास जाईपर्यंत इंद्रिय सुखांतच मनुष्य गुरफटला तर खास शाश्वत सुखचिरशांति मिळणार नाही. आपणांस पुढे सुख प्राप्त व्हावे यासाठीच मानवाचे प्रयत्न चालू असतात. या वर्षी केलेल्या कष्टाचे-प्रयत्नाचे फळ पुढील वर्षी मिळावे असा त्याचा विचार असतो. ज्या दृष्टीने हिशोब करितां संपूर्ण जन्माचे प्रयत्न फलद्रूप होण्याचा काल म्हणजे अंतकाळ – मरणकाळ. परंतु मरणकालीन यातना पाहिल्या तर मानव जन्माचे सार्थक कोणते? असा प्रश्न उद्भवतो. मनुष्यजन्माचा मूळ उद्देश बाह्य सुख प्राप्ति हा नाही. बाह्य सुखाने कोणाला केंव्हाहि शांति किंवा सुख मिळाले नाही हे जाणून आपल्या बुद्धीचा योग्य उपयोग करावा.

मानवास पांच इंद्रिये आहेत- डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा. या पांच इंद्रियाद्वारेच मनुष्य विषयसुखाचा अनुभव घेत असतो. जगतातील प्राण्यांत पुष्कळ प्रकार असून त्यांना अनुरूप, अभिरुचीला अनुकूल अशी प्रीति, भोगदृष्टी ही वेगवेगळी दिसत असली तरी इंद्रियसुखाचे स्वरूप एकच. त्यांत उच्चनीच या कल्पनेला वावच नाही. कारण स्वर्ग किंवा नरक यांत प्राप्त होणारे सुखदुःख एकाच प्रकारचे असते. इंद्रियसुखासाठी संपूर्ण आयुष्य घालविले तर परमेश्वराने दिलेल्या बुद्धि व शक्ति यांना काय किंमत राहिली ? इहलोकांतील विषयसुख काय किंवा देवलोकातील दिव्य सुख काय? ती दोन्ही अपूर्ण व अशाश्वतच. ती मिळविण्यांत काय अर्थ आहे? विषयवासना सोडून मिळणारे सुख तेंच अचल, शाश्वत सुख होय. तें प्राप्त करून घेणे हे मानव जीवनातील साध्य होय, मन निर्विषयी करून अनंत सुखाचा लाभ बुद्धीनेच मिळविणे योग्य होय.

कांहीं न करिताच मनुष्यजन्म नित्य-शाश्वत सुख मिळवून घेणार नाही. कारण तो एक साधन आहे. आपण जशी इच्छा करू तसें फळ मिळणार आहे. जन्मापासून आतापर्यंत इंद्रियसुखासाठीच धडपड केली. मन हे इंद्रियांच्या मागे लागलेले आहे. ज्याला बाह्यसुख म्हणतात तें इंद्रियामुळे समजले जाते व हेच शाश्वत सुख आहे अशी आपण समजूत करून घेतो. इंद्रिये व मन ही बहिर्मुख आहेत, त्यामुळे विषयसुख हेच स्वाभाविक सुख आहे अशी आपली समजूत असते. पण तो निव्वळ भ्रम आहे. कारण त्रिकालाबाधित सत्य तेंच शाश्वत सुख होय. म्हणून मानवी जीवनाचे ध्येय शाश्वत सुख-अचल सुख-नित्यसुख मिळविणे हेच आहे. मागील जन्मी इंद्रियांच्या आहारी जाऊन बाह्य सुखासाठी केलेल्या कर्माचे फळ म्हणजेच हा जन्म होय. जन्मतःच मानव कोणतेंहि कार्य हाती घेत नाही. पूर्व संस्काराच्या योगाने सुचणारी कामेच तो करितो. अशावेळी आपण पूर्वजन्मी काय केले होते हा प्रश्न उपस्थित होतो. आणि त्याचे उत्तर म्हणजेच या जन्मी केली जाणारी कर्मे. एकंदर कर्मवासनेच्या प्रेरणेनेच तो बाह्य सुखाचा अनुभव घेत असतो. पण, त्यामुळे मनास शांति मिळत नाही. शाश्वत-चिरशांति मिळविण्यासाठी हा जन्म किंवा जन्मपरंपरा टिकविणे योग्य नव्हे. जन्माला येऊन निरनिराळे अनुभव मिळविले तरीपण परमात्मसुख कसे आहे असा प्रश्न केल्यास आपण त्याला काय उत्तर देणार? मनुष्यत्वाला साजेल असेंच उत्तर देणे योग्य ठरणार आहे. आतापावेतों विषयसुख, देहसुख यांचीच आपणांस ओळख झाली आहे. तरीपण शाश्वत सुख कोणते हे शोधून काढण्याची शक्ति मनुष्याजवळ आहे व योग्यायोग्याचा विवेकहि आहे; सत्य समजून घेण्याचे सामर्थ्यहि त्याच्यात आहे. असे असल्यामुळे त्याचे इप्सित जें परमात्मसुख ते फार दूर नाही.

ज्या पदार्थाच्या उपभोगाने सुखप्राप्ति होत नाही व ती प्राप्ति झाल्यास टिकाऊ असू शकत नाही अशाच्यामागे लागण्यांत काय अर्थ आहे!! त्या पदार्थात चिरसुख असते तर त्याचा निराळाच अनुभव आला असता. परंतु उपभोगांतून सुखाऐवजी दुःखच प्राप्त होते असा अनुभव आहे. सर्वाचे इप्सित असलेले शाश्वत सुख निराळेच आहे. बाह्यसुखांतून मिळणारे समाधान अशाश्वत, अपूर्ण असें असल्याकारणाने भोगातीत सुखच शाश्वत सुख आहे हे स्पष्टपणे उघड होते व निर्विषय सुख म्हणजेच दिव्यसुख प्राप्त करून घेण्यासाठी हा मानवजन्म आहे हे सिद्ध होते.

या जन्माचा अंतकाळ केव्हां आहे हे कोणीहि सांगू शकणार नाहीं; याकरितां अंतकालापूर्वीच दिव्यसुख मिळवून जीवनाचे सार्थक केले पाहिजे. असें न केल्यास संपूर्ण आयुष्यभर श्रम करून त्यामुळे दुःखप्राप्तीच होणार. दिव्यसुखप्राप्तीसाठी साधना करण्यास निराळी वेळ आहे असे समजणे चुकीचे आहे. अचल निर्धाराने व विचाराने योग्य साधनाच्या योगाने नित्य-दिव्य-शाश्वत सुख मिळविणे योग्य आहे. उठता बसतां सहजस्थितीत अशा सुखाची प्राप्ति करून घेणे शक्य झाल्यास मृत्यूची भीति रहात नाही.

जें सुख अनुभविल्याने त्याची तृष्णा वाढत नाही किंवा अतृप्ति वाटत नाही व जे कधीहि नष्ट होत नाही, ते शाश्वत सुख प्राप्त करून घेणे हे आपलें मुख्य ध्येय आहे. त्या सुखाच्या प्राप्तीशिवाय दुःख नाहीसे होणार नाही. याकरितां अचल, अत्यंतिक, अविनाशी असें सुख प्राप्त करून घेणे हा आपला मुख्य उद्देश असला पाहिजे. तेच आपल्या जीवनाचे ध्येय होय. ती आपली उन्नति व प्रगति असून त्यामुळे आपल्याकडून सनातन धर्माचे पालन होणार आहे. त्याला मोक्षहि म्हणता येईल. जें त्रिकालाबाधित आहे त्यालाच सत्य असें म्हणातात. त्या सत्याचा प्रचार म्हणजेच सनातन-धर्म-पालन. “सना आतनोतीति सनातनः” सत्यस्वरूप दाखवितो तोच सनातन धर्म. नरदेहाची प्राप्ति झालेल्याने कोणते सुख मिळवावे? ते सुख मिळविण्यासाठी कसें आचरण करावें? याचे उत्तर म्हणजेच सनातन धर्म होय. ह्या धर्माने विषयसुखासाठी जगावे असें कधीहि सांगितलं नसून त्याने वैराग्याचाच उपदेश केला आहे. जीवनामध्ये वैराग्य बाणवून विषयसुखापासून मन निवृत्त करावे असेंच त्याचे सांगणे आहे आणि त्याप्रमाणे वागणे हे आपले कर्तव्य होय. त्या कर्तव्याला अनुरूप अशी साधना दृढनिश्चयी मनाने केली पाहिजे. त्यामुळे सर्व अशाश्वत सुखवासना समूळ नष्ट होऊन मन स्वच्छ होईल आणि मग तो मनुष्य अमृतमय झाला असे म्हणावयास हरकत नाही. त्यालाच ब्रह्मप्राप्ति होईल. सर्व भोग्य पदार्थापासून प्राप्त होणाऱ्या सुखापेक्षा लाखोपट सुख म्हणजेच ब्रह्म. “यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा यस्य हृदि स्थिताः। अथ मर्त्यो ऽमृतो भवत्यत्र ब्रह्मश्रनुते ॥” असें श्रुतींनी सांगितले आहे. त्या महत् सुखासाठी प्रयत्न करावा हेच श्रुति-स्मृतींनी प्रतिपादिले आहे. या आपल्या सनातन धर्मात शाश्वत सुख प्राप्त करून घेणे व ते समजून घेणें हे सांगितले असून जणू काय मानव जीवनाच्या उत्कर्षाचे रहस्यच प्रतिपादिले आहे.

सनातन धर्म मनुष्यनिर्मित नाही तो परमेश्वरनिर्मित आहे. “धारणाद्धर्म इस्याहुः धर्मो धारयते प्रजाः॥” ज्यापासून आपले धारण-पोषण होते त्यालाच धर्म असे म्हणतात. अशा दृष्टीने विचार केल्यास आनंदरूपी परमात्माच धर्माचे मूळ आहे असें आढळून येईल. आनंदातूनच जीव जन्मास येतात. “आनंदादेव खल्विमानि भूतानि जायन्ते।” जगणेहि आनंदानेच. आनंद नसेल तर श्वासोच्छ्वास करणेहि शक्य नाही. “आनंदेन जातानि जीवन्ति” सर्व जीव आनंदप्राप्ति करून घेऊन शेवटी त्यांतच लीन होतात. “आनंद प्रयन्स्पभिसंविशंति” जगाचे मूळहि आनंदच. जगाची उत्पत्ति, स्थिति व लय झाल्यानंतरहि अविच्छिन्न असा आनंदच उरतो व तो प्राप्त करून घेणे हेच आपले ध्येय होय. त्याचा अनुभव प्राप्त करण्यासाठी शुद्ध जीवनाचे प्रयत्न करणे हाच मानवी जीवनाचा मुख्य धर्म होय. त्यालाच सनातन धर्म अशी संज्ञा आहे. तो मानवनिर्मित नाही, असें वेदांत प्रतिपादिले आहे.

दृश्य अशा वस्तु या केव्हातरी उत्पन्न झाल्या असून त्यांचा केव्हातरी नाशहि होणार हे नक्की. उत्पत्ति व नाश ज्या वस्तूंना आहे त्या अपूर्णच. त्यांना श्रुतींनी ‘अल्प’ अशी संज्ञा दिली आहे. अशा अल्प व अपूर्ण दृश्य वस्तूंचा समुदाय म्हणजेच हे जग. जगाला उत्पत्ति व नाश चुकला नाही. दृश्य वस्तूंची निर्मिति करूनहि स्वतः परमात्म्यास मात्र उत्पत्ति नाही. जगोत्पत्तीपूर्वी त्याचे अस्तित्व असूनहि तो जगरूप नसल्याने त्याला नाशहि नाही. ज्याला उत्पत्ति व नाश ही दोन्ही नाहीत तो परिपूर्ण होय. त्या परिपूर्णास श्रुतींनी ‘भूमा’ असे संबोधिले आहे. परिपूर्णता म्हणजेच निजसुख-शाश्वत सुख होय. त्यांतच अनंत तृप्ति आहे. “या वै भूमा । तत्मुखं। तदमृतं । नाल्पे सुखमस्ति ।” या जगांतील वस्तूंपासून सुखप्राप्ति होत नाही. जे पूर्ण तेंच सुखस्वरूप व तेंच अमृत होय त्यालाच आपण परमात्मा म्हणतो. त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे योग्य होय. त्यायोगे मानव जन्माचे सार्थक होईल. जगांतील सुखापासून तुम्हांस कधींहि तृप्ति मिळणार नाही व त्यामुळे तुम्ही कृतकृत्यहि होणार नाही. अविनाशी असा आनंद मिळविल्याशिवाय देहत्याग केल्यास तुम्ही काहीहि साधिलं नाहीं असेंच होईल.

नरजन्माचे संपूर्णपणे सार्थक करावयाचे असल्यास आपण कशासाठी जन्मलों हे समजून घेऊन ते साध्य करून घेणे हे आपले श्रेष्ठ असें कर्तव्य आहे. ते या जन्मींच साध्य करून घेणे योग्य होय. त्यासाठी परमात्म्याने आपल्या जीवनात काही प्रेरणा उत्पन्न केल्या आहेत. त्या प्रेरणा शुद्धरीतीने वापरणे हाच सनातन धर्म होय. त्या प्रेरणांचा कसा उपयोग करावा याचे विवरण वेदांत दिले आहे व त्यापासून अपाय होणार नाही असेंहि वेदांचे म्हणणे आहे. या सनातन धर्माच्या स्वरूपाचे दिग्दर्शन वेदांत केले आहे. यावरूनच सनातन धर्मास वैदिक धर्म असें म्हणतात. त्यांत दिलेल्या विधिनिषेधांचा उद्देश योग्य मार्गदर्शनाने विषयवासना घालवून मृत्यूपूर्वी निजसुख मिळवून देणे हा आहे. यासाठी कर्म, उपासना व ज्ञान असे तीन विधि सनातन धर्माने सांगितले आहेत.

कर्म, उपासना व ज्ञान ह्या तिन्हीपैकी कर्म तात्पुरत्या सुखासाठी आहे व वेदांतहि तसा उल्लेख आहे. यशाने देव संतुष्ट होतात. त्यांच्या कृपेनें पाऊस पडतो आणि त्यायोगें पशु, धान्य वगैरेंचे उत्पादन व पोषण होते. वर्णाश्रमांत सांगितलेल्या कर्मानी सुस्थिति प्राप्त करून देवता संतुष्ट करणे हा समंजसपणाचा मार्ग होय. या शिवाय जन साधारणाचे जीवन व्यवहारामध्ये सुगम, सरळ व प्रगतिपर असले पाहिजे हाहि उद्देश यांत आहे.

या चराचर विश्वाचा निर्माता असलेल्या विश्वसम्राटाने निरनिराळया सृष्टिक्रियेसाठी निरनिराळा अधिकारी वर्ग निर्माण केला आहे. राजाची भेट घेण्यापूर्वी त्याच्या हुजऱ्यास खुश करावे लागते तसेंच परमात्म्याच्या भेटीपूर्वी निरनिराळया देवता तृप्त कराव्या लागतात. त्यामुळे व्यवहारी जीवनांतहि सुख मिळते व आपले व इतरांचेहि कल्याण होते. म्हणूनच स्वपरहित साधण्यासाठी कर्ममार्गाने आचरण केले पाहिजे. त्यानेच आपले जीवन धर्ममय होईल. कर्म केल्याशिवाय कोणीहि जाणे शक्य नाही. “नहि कश्चित् क्षणमपि जातु चिष्टत्यकर्मकृत” (भगवद्गीता) असे असल्यामुळे कर्म करणे अनिवार्य आहे. म्हणून चांगल्या उद्देशाने कर्म करून त्याचे योग्य रीतीने पालन केल्याने त्या कर्मामुळे परमात्मा तृप्त होईल.

दुसरा विधि म्हणजे उपासना. या जगाच्या उत्पत्तीचे कारण परमात्मा आहे. “कर्तुं, अकर्तुं, अन्यथा कर्तुम् ।”-करणें, न करणे व निरनिराळया रूपांनी करणे या सर्व गोष्टीस परमात्माच समर्थ आहे. जग हे अपूर्ण आहे त्यामुळे कोणाच्या तरी आश्रयाखेरीज स्वसामर्थ्याने हे जग चालणे-जगणे शक्य नाही. दुःखनिवृत्तीकरिता व इष्ट प्राप्तीकरितां बलवान अशा कोणाचे तरी सहाय्य असणे अत्यंत आवश्यक आहे. या जागतिक व्यवहारांत बलिष्ठाच्या प्राप्तीसाठी आवश्यक असणारा अनुभव आपणांस परमात्म्यापर्यंत नेऊ शकेल. यासाठी जो समर्थ आहे त्याचेच साह्य घेणे योग्य होय.

परमात्म्याला ‘ब्रह्म’ असेंहि नाव आहे. “ब्रह्मत्वात् ब्रह्म।” तो आनंद, ती शक्ति, तो कारुण्यनिधि, ते सामर्थ्य हे सर्व म्हणजेच परमात्मरूप. जग निर्मात्याच्या अनुग्रहाशिवाय आपले कोणतेंहि काम होऊ शकणार नाही. म्हणून त्याचा अनुग्रह प्राप्त करून घेण्यासाठीच उपासनाकांड आहे. पहाणे, बोलणे इत्यादि देहधर्म त्याच्याच कृपेनें चालू आहेत. त्याची कृपा नसेल तर श्वासोच्छ्वास करणेहि अशक्य व बोलणेहि बंद. त्याने दिलेल्या तेजामुळे डोळयांना पहाण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. या गोष्टींचा सारासार विचार न करितां मी माझ्याच ताकदीने सर्व काही प्राप्त करून घेईन अशा गर्वाने वागल्यास ज्याप्रमाणे अंधळा सहज खड्डयांत पडतो त्याप्रमाणे तो दुःखाच्या दरीत कोसळेल. परमात्म्याने उत्पन्न केलेल्या जगतातील मानव हा एक सूक्ष्म भाग होय. म्हणून पूर्ण स्वरूप असलेल्या परमात्म्यास विसरणे योग्य नाही. त्याच्याच कृपेनें इहलोकी सुख मिळवून मरणोत्तर शाश्वत सुख मिळू शकते. याकरिता त्याची कृपा प्राप्त होण्यासाठी अत्यंतिक आदराने त्याची सेवा करणे म्हणजेच उपासना.

आपले निश्चित ध्येय ठरवून ते प्राप्त करण्यासाठी मनोधैर्याने निज-शाश्वत-सुखासाठी का प्रयत्न करूं नये? या दृष्टीने वागणे हाच तिसरा विधि, ज्ञानकांड होय. याचा मुख्य भाग परमात्म्याचे स्वरूप व जो ते जाणतो तो ज्ञानी. अशा ज्ञात्याला स्वतःमध्ये व परमात्म्यात भिन्नता वाटत नाही. परमात्म्याने उत्पन्न केलेलें जग हे परमात्मस्वरूप होय. जगत् व परमात्मा यांचा कार्य-कारण संबंध आहे अशादृष्टीने विचार केल्यास जग व परमात्मा यांत भेद वाटत नाही.

लाट म्हणजे पाणी हे जसें खरे आहे तद्वत् जग म्हणजेच परमात्मा असे म्हणणे चुकीचे होणार नाही. जीवास पूर्णत्व आल्यास पूर्णस्वरूप असलेल्या परमात्म्याशी तो एकरूप होईल. आपण ज्याचें ध्यान करितो त्याच स्वरूपांत मन तादात्म्य पावते. देहाचे ध्यान केल्यास मनहि देहरूप होते. अनात्म असलेला देह ध्यानबलाने ‘मी’ या शब्दास पात्र झाल्यास ‘मी’च आत्मा आहे असे का होऊ नये ? अशा तऱ्हेने ज्ञानाच्या योगाने परमात्म्याची प्राप्ति करून घेणे हे मनुष्यत्वाचे मुख्य ध्येय आहे. सुरुवातीला ‘मी’ असा भास झाला, तो परमात्म्याच्या कृपेनेच ‘मी’ हे सर्वनाम आहे. ‘कोण ?’ असा प्रश्न केल्यास ‘मी’ असे उत्तर येतें. मी म्हणजेच आत्मा. एकमेकांचा परिचय नांवाने करणे हा जगव्यवहार आहे. कारण नांवाचा संबंध व्यक्तीशी येतो, परमात्मा चराचर सृष्टीत व्यापला आहे. असेच श्रुति सांगतात, “सोऽहं” ‘मी’ असाच परमेश्वराचा पहिला संकल्प आहे. त्याचे अनेकत्व निरनिराळ्या रूपातून प्रकट होते रूप नाही तर अनेकत्वहि नाही.

शक्तीच्या योगानें कोणतेंहि कार्य होत असते. परमात्म्याच्या शक्तीने अनेकत्व, बहुत्व व विविधत्व धारण करण्याचा संकल्प केला. कार्यक्षमता व कार्यसिद्धि हे शक्तिमुळेच होते व ती शक्ति म्हणजेच परमात्मा. परमात्म्यामध्ये शक्ति असल्यामुळे तिचा अविर्भाव म्हणजेच जग. वास्तविकरीत्या शक्ति व शक्तिमान हे वेगळे नाही. मानवास बोलण्याची शक्ति आहे तो ज्यावेळी बोलत नाही त्यावेळी ती शक्ति त्यांच्यांतच एकरूप झालेली असते. सृष्टिकार्य चालू असता परमात्मा व शक्ति हे निरनिराळे दिसत असले तरी ज्यावेळी सृष्टिकार्य संपेल त्यावेळी परमात्मा आणि शक्ति ही एकच असतात. सृष्टि म्हणजे परमात्म्याचे प्रकट स्वरूप किंवा प्रादुर्भाव.

परमात्मा स्त्री-पुरुष रूपाने व्यक्त झाला आहे. स्वतःच त्याने ही दोन रूप धारण केली आहेत. स्त्री किंवा पुरुष प्रथम ‘मी’ म्हणतात. प्रत्येक व्यक्तींत असलेली ‘मी’पणाची संवेदना म्हणजेच परमात्म्याचे अभिन्न स्वरूप होय. गृहस्थाश्रमांतील होणाऱ्या संततीने या ‘मी’चाच विकास होत असतो. या रूपाने परमात्मा आपल्यामध्ये नखशिखांत व्यापला आहे. असे असल्या कारणाने आपण परमात्मा आहोत या कल्पनेत चूक ती कोणती? मानवसंतति ही मानव आहे हे ज्याप्रमाणे चुकीचे नाही त्याप्रमाणे परमेश्वर निर्मित मानव हा परमेश्वरच आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. परमात्मा हा शाश्वत-सुख-स्वरूप आहे म्हणून आपला निर्माता जो परमात्मा त्याची प्राप्ती होईपर्यंत आपणास शाश्वत सुख मिळू शकणार नाही.

शाश्वत-निज-सुख हे परमात्म्याशिवाय प्राप्त होत नाही. निजसुख मिळविणे म्हणजेच परमात्म-स्वरूप-प्राप्ति होय. हे भिन्नतेनें प्राप्त होणार की अभिन्नतेने ? ते भिन्नतेने प्राप्त करून घेणे शक्य आहे असे म्हटले तर परमात्म्याशिवाय सर्व दुःखरूपच असल्याने दुःखाने सुख प्राप्त केले असें होईल आणि हे तर तर्क विरुद्ध आहे. परमात्म्यापासून सुखप्राप्ति करून घेणे हे त्याच्याठायी असलेल्या ऐक्यबुद्धीनेच.

दुःख-निवृत्तिसाठी संसारसुखरूपी भ्रम सोडून आपल्या मनात परमात्म्याच्या स्वरूपाची जास्तीत जास्त धारणा होण्यासाठी धर्मनियमांचे पालन करा. असत्य सुखासाठी असलेले साधन योग्य नव्हे. सत्यसुखप्राप्तीसाठी केली जाणारी साधना महत्वाची होय. सत्य सुखासाठी केली जाणारी साधना ही नरजन्मासाठी योग्य आहे ती साधना करूनच आपले पूर्वज मुक्त झाले. तुम्ही त्यांचे अमृत पुत्र आहात. पूर्वजांनी केलेली साधना करून तुम्ही पण धन्य व्हा!!

आपला धर्म फक्त भारताचाच धर्म नसून तो विश्वधर्म आहे. विश्वजीवनाची संपूर्ण साधना म्हणजेच शाश्वत सुखप्राप्ति होय. हे निज-शाश्वत-सुख परमात्म्याच्या ध्यानानेंच प्राप्त होईल व तें सनातनधर्मी असणारासच प्राप्त होईल.

हा वेदांत म्हणजे सनातन धर्माचा उद्देश आहे. शाश्वत सुखाचे मूळ ओळखणारे सनातन धर्मीच. दुसऱ्या धर्माने असा उपदेश करणे म्हणजे सनातन धर्माचा संस्कार किंवा अनुकरण होय. या विश्वाला सुखरूपी प्रकाश देणाऱ्या परमात्म्याच्या विविध रूपांचे ज्ञान व त्याचे रहस्य सनातन धर्मातच आहे.

सनातन धर्म प्रतिपादन करणे हेच तुमचे ध्येय असावें. धर्माने वागावयाचें तें सुखासाठीच. निज-शाश्वत सुख लाभण्याने तृप्ति आणि जीवनसार्थक होईल.

थोडक्यामध्ये मानवी ध्येय काय? व तें कसें प्राप्त करावे ? या प्रश्नाचे उत्तर (१) सत्यसुखप्राप्ति व (२) सनातन धर्मपालन असेंच देता येईल.

हे भाषण आपणांस संपूर्णपणे समजले नसल्यास परमात्मा आपणांस समजवून देवो.!!

॥ श्रीरस्तु ॥

– श्रीधर संदेश (फाल्गुन १८८५)
सन १९६४

home-last-sec-img