Literature

मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी

या दृश्य जगातील पदार्थ आपणांस प्राप्त करावयाचे आहेत काय ? तसे असल्यास त्यांचे दृश्यस्वरूप घालवून सत्य स्वरूप शिल्लक ठेवा. जगातील पदार्थामध्ये जे सुख आहे असे आपण समजतो ते सुख नव्हेच. खरे सुख वेगळेच आहे. जे सुख कधीही कोणत्याही कारणांनी कमी अधिक होत नाही तेच खरे सुख होय. पण ते कसे मिळवायचे ? हेच मार्मिकतेने समजवून घेण्यासाठी सद्गुरूस शरण गेले पाहिजे. आर्यपध्दतीनुसार पवित्र वस्तुंसह त्यांना शरणागत झाले पाहिजे. *’उत्तिष्ठत, जागृत’* अज्ञानरूपी झोपेमुळे आपणांस जगरूपी स्वप्न दिसते. त्यांतील सुखद कल्पनेनुसार कल्पिलेले पदार्थ उत्पन्न करून त्यांचा अनुभव आपण घेतो. परंतु ते खरे नव्हे. जागृत व ज्ञानी यांची कृपा प्राप्त करून घेऊन एकदा याबाबतीत आपली उन्नती करून घेण्यासाठी गुरूभक्तीच केली पाहिजे. गुरू हा मोक्षदाताच होय. *’मोक्षदस्तु परं तत्त्वं तज्ज्ञात्वा परमश्रुते |’* अनेक गुरूंच्यामध्ये मोक्षदाता गुरूच श्रेष्ठ होय. तत्त्व जाणून तत्त्वस्वरूप जो होतो तोच सद्गुरू व तोच तात्विक सत्यस्वरूपसुख देऊ शकतो. तत्त्वं गृणातीति गुरूः |’ तत्त्वांचे स्पष्टीकरण करून सांगणारा तोच गुरू होय; अशी गुरू या शब्दाची उत्पत्ति आहे व श्रुतीचाहि तोच अभिप्राय आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज*

home-last-sec-img