Literature

मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया

 विषय क्षणभंगुर म्हणजेच लवकर नष्ट होणारे आहेत. कधी दिसतील, कधी त्यांचा भास होईल तर कधी मुग्ध करतील. त्यामुळे मानव विवेकभ्रष्ट होऊन तो त्या विषयांतच गुरफटून जाण्याची शक्यता असते. पण विषय मात्र त्याच्या स्वाधीन असत नाहीत. त्यांना कशाचीही पर्वा नसते. निसर्गप्रवाहात सापडून ते वाटेल तिकडे जात असतात. त्यांच्यात मग्न झालेला मानव मात्र त्यांच्यामागे धावत असतो आणि त्यामुळे तो अधिक दुःखी होतो. आशा भंग झाल्यावर रडकुंडीस येतो व अशारितीने तो दुःखात बुडुन जातो. अशा या दुःखदायी विषयांच्यामागे लागण्यात काय अर्थ आहे ? इंद्रियाधीन झालेल्या मनुष्यास विषयांत सुखाभास होतो. पण त्या भासाची कल्पना विषयांना नाही. 

     सुखमय अशा परमात्म्याने आपल्या अल्पांशापासून हे जग निर्मिले आहे व जगाचा अत्यल्पांश म्हणजे विषय होय. या विषयात होणारा सुखाभास हाही मूळ परमात्म्यामुळेच होतो. विषयांतील सुखाभास ह्रदयंगम वाटतो, मग परमात्म्याची सुखमयता किती आनंददायी असेल ? आपला विवेक परमात्म्याच्या दिशेनेच असावा. विषयाच्या जाळ्यात गुरफटलेल्या मनाला त्यामधून काढून परमात्म्याकडे वळविणे योग्य होय. विवेक ज्या सुखाकडे वळेल तिकडेच मन धावत असते. असे असल्याने सुखासाठी विवेकी मनुष्याने मुळ सुखधामाकडे कां जाऊ नये ? 

  *श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज*

home-last-sec-img