Literature

मार्गशीर्ष शुद्ध पंचमी

जे सुख प्राप्त करून घेण्यासाठी मन प्रसंगवशात् उद्विग्न होते ते खरे सुख नव्हे. विषयसुखात खऱ्या सुखाची कोणतीही लक्षणे आढळत नाहीत. कारण विषयसुख हे दुःखकारकच ! मनुष्य अगोदर विषयसुखासाठी धडपडतो व ते प्राप्त झाल्यावर कष्टी होऊन तो सुखाभास लवकर नष्टही होतो. सर्व बाजूंनी दुःखप्रद अशा भ्रमात्मक सुखाचा नाश करण्यासाठी विवेकाकडेच धाव घ्यावी लागेल. अशाप्रकारे विवेकवश होऊन मनुष्याने खऱ्या सुखाकडे दृष्टी ठेवल्यास श्रुतीही मार्गदर्शन करतील.

जे सुख सर्वात श्रेष्ठ, बंधनरहित असे आहे तेच खरे सुख होय. या सुखात दुसरा कोणताही पर्याय असू शकत नाही. सुख म्हणजे सुखच. ज्यांत द्वैत नाही तेच परिपूर्ण सुख होय. ‘ दृश्यसुख हे अल्प सुख होय ‘ असे श्रुति म्हणते. ज्यामध्ये वेगळेपणा असतो ते खरे सुख नव्हेच. ते विषयसुखच होय. त्याच्या प्राप्तीसाठी मनास निरनिराळे विचार करावे लागतात. तसेच विचारानुरूप प्रयत्न व कर्मेही निरनिराळी करावी लागतात. कर्माचा परिणाम निरनिराळ्या मनोवासनेत होतो. एकंदरीत त्यामुळे मनुष्य मात्र खऱ्या सुखापासून दुरवर जातो.

*श्री प.पू सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img