Literature

मोक्षाचा अति खडतर मार्ग

वर उडी घेणाऱ्याला खालचे गुरुत्वाकर्षण असतेच. विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्याशिवाय वरच्या वर्गात जसें जाऊं देत नाहीत; त्यांच्याकरिता जसे परीक्षक सरकारकडून नेमलेले असतात; त्याप्रमाणे निःस्पृह साधकांची परीक्षा घेऊन त्यांना कसाला लावण्याकरितां परमेश्वराने तसेच मोठमोठे परीक्षक नेमले आहेत. त्या सर्वांच्या कठीण परीक्षेत उतरूनच निःस्पृहानी इथे पहिला नंबर मिळवायचा असतो. प्रवृत्तिमार्गातल्या अभिमानी देव-सैनिकांची फळी फोडूनच निःस्पृहांना पुढे जावयाचे असते, यांच्या व्यूहातून बाहेर पडावयाचे असतें. जग चालविणारे अधिकारी व जगाला निर्माण करणाऱ्या देवदेवता सर्व थोड्या फार अंशानें प्रवृत्तिमार्गाचा अभिमान बाळगणाऱ्या आहेत, हें उघड आहे. हे निवृत्तिमार्गीयांना बंडखोर लेखतात आणि आपले सामर्थ्य असेल नसेल तितके वेंचू म्हणून अस्तन्या चढवूनच येतात! यांची कोंडी फोडून निःस्पृहाला जावयाचे असते, हे त्यानी ध्यानात ठेवावें. तेजस्वी मनुष्य आपल्या तेजाने सर्वांना गप्प बसवितो हे वेगळे; पण त्याचा द्वेष आंतून सर्वांनाच असतो. आणि हा केव्हा घसरून पडेल आणि याच्या उरावर केव्हा बसुन मागच्या सर्वांचे उट्टं काढू म्हणून सर्व टपलेले असतात.

जगाचें साम्राज्य मिळविणाऱ्या तेजस्वी माणसापेक्षा आत्मीय मोक्षसाम्राज्य मिळविणारा कितीतरी पटीनें तेजस्वी असावा लागतो. तसेच त्याच्या ठिकाणी वीर्य, धैर्य, शौर्य आणि चिकाटी असावी लागते. बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति । (सप्तशति) निःस्पृहांच्या प्रतिपक्षाच्या सैन्याचे नेतृत्व महामायेनेंच आपल्याकडे घेतलेले असते. प्रवृत्तिमार्गाची शक्ति म्हणजेच तें हिचे रूप कामक्रोधादि सर्व विकार हिचे सैनिक आहेत. अति दुष्ट म्हणून यांची ख्याती आहे. आपल्या ” तेजस्वितेची आणि विवेकाची घमेंड बाळगून प्रौढी मिळविण्या करितां प्रवृत्तिमार्ग डावलून जातोस काय ? शास्त्रीय प्रवृत्ति मार्गाला डावलून जाणाऱ्या तुला शेवटी त्याचीहि प्राप्ति न होऊ देतां निषिद्ध मार्गालाच खेचून ब्रह्मराक्षस, पिशाचादि योनीत घालून हजारों शेकडों वर्षे विकारांच्या आगीत नाहीं पचविलें तर नांव बदलू! हा नरदेहहि येऊ न देता त्या पापानें कृमिकीटकांच्या जन्मापासून तुला वर वर यावयाला नाहीं लावलें तर बघ ! असें म्हणून कामादि वीर आपल्या मिशांना पीळ भरीत मधे उभे असतात. यांच्या छातीवर पाय देत मोक्षाचा मार्ग निःस्पृहांना चालून जावयाचा असतो, हें विसरून भागावयाचे नाहीं. परमार्थाच्या आखाड्यांत उतरल्याबरोबर जो प्रथम सलामी द्यावयाला येतो, तोच हा सर्वांत मोठा पहिलवान काम प्रधान मलनिवर्हणन्यायाने याला प्रथम चीत केले म्हणजे मग इतरांची काळजी करण्याचे कारण नाहीं. असे म्हटले तरी क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, दंभ, असूया यांचेहि सामर्थ्य काही कमी नाही. या सर्वांना चीत करूनच खऱ्या निःस्पृहाला परमार्थी अथवा मोक्षार्थी व्हावयाचे असते.

दारेषणा, वित्तेषणा, पुत्रेषणा, देहवासना, शास्त्रावासना लोकवासना असे हे मोठमोठे घाट चढून जाऊनच मग वैराग्याच्या खऱ्या सपाटीवर पाऊल पडतें, हें निःस्पृहांनी ध्यानात बाळगा वयाला पाहिजे. हे सर्वच रडतोंडीचे घाट आहेत. निःस्पृहांचा मोक्षमार्ग प्रथम माणसांच्या वस्तीतून व नंतर स्मशानांतून जातो. हें स्मशान भूत, पिशाच्च, डाकिण्या, शाकिण्या आदिकांनी नुसतें गजबजून राहिलेले असते. याच्यापुढे देवांच्या वस्तीतून निःस्पृह पुढे जातो. इथें अप्सरा, रंभा मेनका असतात. अस्खलित ब्रह्मचर्यानं हे तीन टप्पे ओलांडल्यानंतर निःस्पृहांना खरा मोक्षाचा मार्ग लागतो, हेंहि पण निःस्पृहांनी लक्षांत ठेवावयाला पाहिजे.. या मार्गातून जात असता तिथे तिथे देहाचें अस्वास्थ्य, शोक, दुःखाची भावना, भय, रोगाच्या कल्पना, शंका संशय, प्रज्ञामांदय, कुतर्क, विपर्यय, दुराग्रह, इत्यादि कुत्री पाठीमागे लागतातच. यांचा जबडा फार मोठा असतो. एकानेंहि तोड टाकले तरी पुरें ! साधक लुळा व्हायला दुसरा कुत्रा नको ! त्या त्या ठिकाणी (Red Signal) धोक्याच्या सूचनांच्या पाट्या लावून ठेवून हवालदिल झालेल्या साधकाच्या योगक्षेमाची सोय व्हावी म्हणून तिथे तिथे आश्रम करून राहिलेल्या महात्म्यांची भेट सहारा वाळवंटांतल्या (Oasis) उद्यानाप्रमाणें थकवा घालवून पुनः जोमानें पुढे जावयाला या परमार्थ मार्गाच्या फारच उपयोगी पडते. फाटलेल्यांना इथे वस्त्र मिळतें. क्षुधा तृषार्ताना अमृतोपम अन्नपाणी मिळते. रोग्यांना औषधोपचार होतो. इथले उपचार घेऊन प्रवासी सर्व साधनानिशीं नव्या रूपानें पुनः पुढ चालू लागतो. पुढच्या मार्गाचीहि इथे माहिती मिळते. इथली मंडळी वळणापर्यंत येऊन वाटेला लावून परत येतात. ही एक ईश्वराची या मार्गात मोठी दया आहे.

मार्ग सोडून आडवळणांत काहीं मोठया भपक्याची मोठ मोठी घरें या मार्गातून चालले असतांना दिसतात. मात्र ओढाळ इंद्रियरूपी दुष्टांच्या या मोठमोठया हवेल्या आहेत. आपल्या शोभेनें व वैभवाने साधकाचे चित्त आपल्याकडे ओडून घेण्या इतक्या आकर्षक आणि सुंदर त्या असतात. तिकडे चुकून गेलेल्या साधकांना लुबाडून, त्या संपत्तीवरच यांना पाहून पुन्हा अधिक साधकांनी आपल्याकडे यावे म्हणून सुंदर सुंदर हवेल्या या वाटमाऱ्यानी उभारलेल्या असतात. महात्म्यांनी सांगितलेले विसरून अथवा तिकडे दुर्लक्ष करून एकदा का इकडे साधक आला की, तिथें काही मिळण्याऐवजी असलेलेहि घालवून वशीकरणामुळे त्या इंद्रियदुष्टांच्या हाताखाली शेवटपर्यंत राबत रहावे लागते. तिथून सुटका होतच नाही. मग असे भ्रष्ट खऱ्या साधकाला आपण फसल्यासारखेच फसविण्याकरिता इंद्रिय वाटमाऱ्याच्या चिथावणीवरून मार्गाच्या कडेकडेने फिरत असतात. तसे हे भ्रष्ट फार मायावी असतात. यांचे बोलणे चालणे, यांची ठेवण फार मोहक असते. यांकडे मात्र साधकांनी दुकूनहि पाहू नये.

या इंद्रियांच्या हस्तकांतून स्त्री-साधकांना भुलविण्याकरितां म्हणून काही पुरुष आणि पुरुष-साधकांना भुलविण्याकरिता म्हणून काही स्त्रिया असे दोन प्रकार असतात. माणसे, ब्रह्मराक्षस, शाकिण्या, डाकिया, भूतपिशाच्च, अप्सरा इत्यादि इत्यादि निःस्पृह साधकांना भुलवितात, असे प्रयत्न करून करून तेंच यांचे एक तप झालेले असते. आणि त्या मानाने त्यांना सिद्धीहि लाभलेली असते; नाही असे नाही. यांचे मुग्ध करून टाकणारे हावभाव, ‘बेमालूमरीतीने आपल्या जाळयांत गुंतविण्याचें तें नाटकी प्रेम, तें मृदुमधुर मोह पाडणारे बोलणे, भपकेदार पोशाख, शरीराची आकर्षक ठेवण आणि इतर यांच्या शक्तियुक्तीचे प्रयोग एकीकडे आणि ओढ लावून वशीकरणाचे चाललेले इंद्रियांचे बलवान् प्रयोग दुसरीकडे- असे होऊन मूलतःच विषयी, चपळ असणाऱ्या फितुर विकारी मनाला आवरता आवरतां सामान्य साधकाच्या नाकी नऊ येतात. सारखे वारीत असतांनाहि निसटून मन पुनः पुन्हा तिकडेच धांव घेतें; त्यांचेच ध्यान करीत सुटते. ही एक परीक्षाच असते. हीच संधि साधून दुष्ट देवदेवता आणि त्यांचे दुष्ट आराधक मांत्रिक या भुल भुलावणीला शक्यतों हातभार लावतातच. इंद्रिय-प्रेरक देवताहि त्यांना होकार देतातच.

मी चौकस बुद्धीने विचारले असता एका विघ्नदेवतेनें मला सांगितलेले आठवतें. आम्ही भ्रष्टविण्याच्या उद्देशानें जख्ख म्हातान्यालाहि चेतना आणून त्यापुरता तरणाबांड बनवितों; म्हणजे नष्ट झालेली इंद्रियशक्तीहि निर्माण करतो. त्याला असह्य होईल इतकी इंद्रियाला चेतना आणतो. कुठेहि लपून असला तरी नेमक्या वेळेला त्याला खेचल्यासारखे जाणून निषिद्ध कर्म करा वयास लावतों. यांतून आमच्या शक्तीपेक्षांहि त्याची शक्ति तत्त्वनिष्ठेमुळे अत्यधिक वाढली असल्यास मात्र आमचे काही चालत नाही. शेवटपर्यंत आमचे प्रयत्न मात्र चाललेच असतात. आमचे चालो अथवा न चालो, प्रयत्न करण्याचे आम्ही शेवटपर्यंत सोडीत नाहीं.‘ ‘ बलिष्ठ गुरु असून, त्याची त्यानें सेवा करून कृपा मिळविली असल्यासहि तो गुरु धावून येऊन आमची हकालपट्टी करतो,’ असेंहि तिने शेवटी सांगितले. यांच्या अशा जबरदस्तीनेच

काही साधक अवश होऊन दीपपतंगन्यायानें पारमार्थिक जीवनाला मुकतात तसे पाहू गेले तर कसल्याहि भोगादिकांची इच्छा होणार नाही, असे त्यांचे तें गलिच्छ रूप आहे. एकंदरीत या दुष्ट मायावी विघ्नदेवतांना जिंकण्याचे सामर्थ्य आल्याखेरीज परमार्थसुखाचा लाभ होत नाही. सारखी ओढाताण चालूच असते. अशा प्रसंगी साधकांनी कसोशीनें निर्धाराने दृढ प्रखर प्रयत्न करून आपल्या तत्त्वदृष्टीच्या गांभीर्याने आणि आत्मनिष्ठेच्या शांतीनें लाजवून इंद्रियांना आणि त्यांच्या हस्तकांना खाली माना घालून निराश होऊन मनगटे चावीत परत जाण्याचा प्रसंग ओढवून द्यावयाला पाहिजे. निस्पृहांच्या अंगचे पाणी त्यांना दाखवायला पाहिजे. हरलो आणि चुकलोंम्हणून त्यांचे नाक घासवून घेऊन पुढे कोणत्याहि साधकांकडे ते दुकूनहि पहाणार नाहीत अशी त्यांची खोड मोडून त्या सर्वांना दहशत बसवावयाला पाहिजे. यांचे काटेरी रान तोडून परमार्थमार्गावर सुंदर आश्रम निर्माण करावयाला पाहिजेत.

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः । इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्पर: वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता || (भ.गी. २-६० ६१) ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते । आन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥ (भ. गो. ५-२२) बुद्धिमान् साधक पुढचे भविष्य ओळखून आपला यांत नाशच आहे म्हणून मनाला आवरतो. एवढया अशा या ओढाळ इंद्रियांना आणि यांना सामील असलेल्या चंचल मनालाहि दाद न देता आपले हित साधण्याच्या अढळ दृष्टीने कोणाचेहि चालू न देता त्या सर्वांचीच ओढ तोडून खोड मोडून खरोखरच योग्य अधिकारी साधक-भगवान् म्हणतात- तत्स्वरूपभूत अशा माझ्याकडेच धांव घेतो, मत्परायण होतो, स्वरूपनिष्ठच असतो.खरें सांगावयाचे झाल्यास इंद्रियांच्या ओढीला जो बळी पडत नाही, त्यालाच आपल्या हिताची खरी दृष्टि आली. परमार्थाचें त्यालाच एक महत्त्व समजले. त्यालाच आत्मानंदाचे निरतिशयत्व पटलें त्याचीच एक बुद्धि स्वरूपनिष्ठेंत स्थिर राहिली, असें समजावें. हा एक आत्मनिष्ठेचा कस आहे. ही एक खऱ्या साधकाची परीक्षा आहे

home-last-sec-img