Literature

वर्णांची उपयुक्तता

वायुपुराणांतील लोकांत वर्णाश्रमाच्या उपयुक्ततेसंबंधी विचार आलेला आहे तो पाहूं:–

यदि ते ब्राह्मणा न स्युर्ज्ञानयोगवहास्सदा । उभयोर्लोकयोदैवि स्थितिर्न स्यात्समासतः ॥

यदि निःक्षत्रियो लोको जगस्त्यादधरोत्तरम् । रक्षणात् क्षत्रियैरेव जगद्भवति शाश्वतम् ॥

तथैव देवि वैश्याश्च लोकयात्राहिताः स्मृताः । अमृतानुपजीवन्ति प्रत्यक्षफलदा हि ते ।। शूद्राश्च यदि ते न स्युः कर्मकर्ता न विद्यते । त्रयः पूर्वे शुद्रमूलाः सर्वे कर्मकराः स्मृताः ॥

— ब्राह्मणांच्या ज्ञानविज्ञान-सामर्थ्याने समाजाला अभ्युदयनिःश्रेयसांची प्राप्ति होऊन त्यांच्या योगसामर्थ्याने समाजाचे रक्षण होत असल्यामुळे, अशा मार्गदर्शक ब्राह्मणांच्या अभावी सर्व समाजाची स्थिति ढांसळून जाते. क्षत्रिय नसले तर समाज अधरोतर गतीस प्राप्त होतो म्हणजे शासक वर्गाच्या अभावी वर्णाश्रमाचा क्रम बिघडतो. खालच्या जातीकडून वरच्या जातीवर अतिक्रम होतो. वरवरच्या जाती मलीन होतात. स्वतः आपण वागून वर्णाश्रम धर्माप्रमाणे प्रजेला बागविण्याची जबाबदारी शासक क्षत्रिय वर्गाकडेच असते. सत्वशील राजाकडून संरक्षण केल्या गेलेल्या प्रजेस शाश्वत स्वास्थ्य लाभते. व्यापारांत बुद्धिमान असे दानधर्मशील श्रीमान् वैश्य नसले तर राष्ट्राची जीवनयात्राच कष्टप्रद होते. वैयक्तिक कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय, जागतिक, कोणतेंहि जीवन घ्या, तें सुखासमाधानाचे व्हावयाचे असेल तर संपत्ति ही पाहिजेच. धर्मानेंच अर्थशास्त्र हें वैश्यांकडे आहे. त्यांच्या संपत्तीचें साहाय्य जगास आवश्यक असते. सुखमय राष्ट्राच्या समाधानी जीवनास या धनिक जातीची मदत आवश्यक असते. आपापल्या जीवनासाठी प्रत्येकजण श्रीमंत आणि धार्मिक लोकांचा आश्रय करीतच असतो. अशा दृष्टीनें धनिक वर्ग हा अनेक लोकांच्या जीवनाचा मार्ग होतो. याप्रमाणें हा व्यापारी वर्ग आश्रित लोकांना प्रत्यक्ष फलदायी होत असल्यामुळे, हा नसेल तर सर्व राष्ट्र दरिद्र-दुर्मुख होते, म्हणून या वर्गाची आवश्यकता असते. शूद्र नसले तर शेतकी व्यवसायच नाहीसा होईल. जीवनास अवश्य असे धान्य यांच्या श्रमानेंच राष्ट्रास मिळते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तिन्ही वर्गांनाहि यांची आवश्यकता आहे. यांच्याकडून मिळालेल्या अन्नाहारानें या तीन्ही वर्गांचे संगोपन होत असल्यामुळे जीवनाला हे मुख्य कारण होत. हा वर्ग श्रमजीवी आणि सेवापर होय. हा अर्थ ‘ कर्मकराः ‘ या शब्दानें अभिप्रेत होतो.

वर्णव्यवस्था ही हिन्दु धर्माचें एक प्रमुख अंग, हिंदी संस्कृतीचें हें एक प्रमुख तत्त्व व अखिल मानव जीवनांतलें पूर्वकर्मार्जित स्थान होय. अखिल समाजाच्या सुसंघटित जीवनाकरितां निसर्गतःच झालेला एक श्रमविभाग होय. हे चार वर्ण समाजाचे घटकावयवच होत. या सुसंघटित अवयवांनी सुशोभित असणारे हे विश्व, परमात्म्याचा सुंदर स्थूल देह होय, हें ‘पुरुषसूक्ता’च्या आधारें सिद्ध होते. विश्व हेंच विराट रूप म्हणून म्हटले जातें. ‘विविधत्वेन राजत इति विराट् – विविधरूपानें विराजमान असणारा तो विराट. अखिल नामरूपांचे हें सामुदायिक स्वरूप. थोडक्यांत यालाच विश्व म्हणतात. हा एक परमात्म्याचा दिव्य स्थूल देह होय. देहाच्या आकृतीप्रमाणे या विश्वाच्या अभिमानी देवाच्या देहाचीहि पना करावी लागते. अर्जुनाला या विराट् रूपाचे दर्शन होऊन जें संभाषण झालें तें एका विशिष्ट रूपानेंच झालें असले पाहिजे. एकाच वेळी विश्वांतल्या सर्व मुखांनी विशिष्ट कांही सांगणे व ऐकणे दोन्हीहि संभवनीय होत नाहीत. विश्वांतल्या अखिल रूपांच्या अभिमानी देवाचा, एक सर्व-संग्राहक देह असला पाहिजे. हें ” इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरम् । मम देहे गुडाकेश यच्चान्यद्द्रष्टु मिच्छसि ॥ ” ( भ. गीता ११-७) या लोकावरून स्पष्ट होते. या विराट् देहाच्या मुखापासून ब्राह्मण, बाहूपासून क्षत्रिय, मांड्यांपासून वैश्य व पाया पासून शुद अशा क्रमानें या चार वर्णांची उत्पत्ति झाली असे खालील श्रुति वचनांनी कळून येते.

ब्राह्मणोस्य मुखमासीत् बाह्न राजन्यः कृतः । उरू तदस्य यद्वैश्यः पद्या शूद्रो अजायत

यांत एका देहाच्या अवयवाप्रमाणे हे सर्व वर्ण एकवाक्यतेनें राहून आपापली कार्ये सुरळीतपणे पार पाडीत, सुखसमाधानानें असले पाहिजेत असा श्रुतीचा आशय आहे हेंहि यांतून स्पष्ट होते. सर्वस्यास्य तु सर्गस्य गुप्त्यर्थं स महाद्युतिः ॥ मुखबाहूरूपजानां पृथक्कर्माण्यकल्पयत् । (मनु. १-८७) आपल्याकडून उत्पन्न झालेल्या सृष्टीच्या सुव्यवस्थ्यर्थ या भिन्न भिन्न वर्णांना तत्तदनुरूप पृथक् पृथक् धर्मकर्मे त्या जगन्नियंत्या परमेश्वराकडूनच निर्णित झाली, हें या ‘मनुस्मृती च्या श्लोकावरून स्पष्ट होते. वर्णधर्मकल्पना मानवजनित नव्हे हें यावरून कोणाच्याहि लक्षांत येण्यासारखे आहे. तशींच चारी वर्गांना, सर्व मानवांनाहि सर्वसामान्य असणारी धर्मकर्मे सांगितलेली आहेत. प्रथम या चार वर्णांचीं धर्मकर्मे बघू या.

अध्यापनमध्ययनं यजनं याजनं तथा ।दानं प्रतिग्रहं चैव ब्राह्मणानामकल्पयत् ॥ ( मनु. १-८८) 

दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च । ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् ॥ (भ.गी. १८-४२)

-स्वतः वेदाध्ययन करणे व दुसऱ्यांनाहि शिकविणें, स्वतः यज्ञ करणे व क्षत्रियादिकांकडून करविणें, त्याचप्रमाणे स्वतः दान करणें व स्वतः दुसन्या कडून दानाचा स्वीकार करणें या सहा कर्माखेरीज मनोनिग्रह, इंद्रियनिग्रह, तप, पावित्र्य, शान्ति, सरलता, वेदशास्त्रप्राविण्य, परमात्मसाक्षात्कार, कर्मोपासने विषयींची आसक्ति, भक्ति, विश्वास आणि आस्तिक्यबुद्धि इत्यादि ब्राह्मणांना सांगितलेली धर्मकर्मे होत.

प्रजानां रक्षणं दानं इज्याध्ययनमेव च ।विषयेष्यप्रसक्तिश्च क्षत्रियस्य समासतः ॥ (मनु. १-८९) 

शौर्य तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धेचाप्यपलायनम् ।

दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम् ॥

प्रजारक्षण, दान, यज्ञ, अध्ययन, विषयाच्या ठिकाणी अनासक्ति या खेरीज शौर्य, तेजस्विता, धैर्य, दक्षता, रणभूमीवरून पळ न काढणे म्हणजे

शत्रूस पाठ न दाखविणे, प्रभुत्व ही क्षत्रियांची स्वाभाविक धर्मकर्मे होत. पशूनां रक्षणं दानमिज्याध्ययनमेव च ।वाणिज्यं च कुसीदं च वैश्यस्य कृषिमेव च ॥

कृषिगोरक्षवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम् ॥ (मनु. १-९०)

–गोरक्षण, दान, यजन, अध्ययन, व्यापार, व्याजबट्टा, शेतकी वैश्यांची स्वाभाविक धर्मकर्मे होत.

एकमेव तु शूद्रस्य प्रभुः कर्म समादिशत् ।

एतेषामेव वर्णानां शुश्रूषा मनसूयया ॥ परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम् ।। (मनु. १-९१)

या त्रैवर्णिकांची असूयारहित सेवा करणें हें एकच कर्म देवानें शूद्रांना नेमून दिलें. “ विश्वस्य राजा ” असें ऋग्वेदहि ज्याला म्हणतो त्या परमात्म्याने चार वर्णांनाहि क्रमानुसार पृथक पृथक धर्मकर्मे नेमून दिली, हे त्याच्या शासकत्वाला अनुरूपच झालें. इतःपर मानव जातीची सर्वसामान्य धर्मकमें पाहू या.

home-last-sec-img