Literature

वाल्मीकि नारद संवाद

तपःस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदां वरम् ।

नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिर्मुनिपुंगवम् ॥ (वा. रा. बा. कां.स. १-१ )

श्रीवाल्मीकि रामायणाचा हा सर्वप्रथम श्लोक आहे. श्री वाल्मीकि नारद संवादाला येथूनच प्रारंभ झाला. श्रीरामाचे विभूतिमत्व आणि आदर्शव निदर्शनास आणून देणाऱ्या यापुढील लोकांचा विचार करूं, वाल्मीकि नारदाला विचारतात :

को न्वस्मिन् सांप्रतं लोके गुणवान् कश्च वीर्यवान् ।

धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः ॥ (बा. रा.बा.कां.स. १-२)

चारित्रेण च को युक्तः सर्वभूतेषु को हितः ।

विद्वान्कः कः समर्थश्च कश्चैकः प्रियदर्शनः ॥ आत्मवान् को जितक्रोधो द्युतिमान कोऽनसूयकः ।

कस्य बिभ्यति देवाश्च जातरोषस्य संयुगे ।। (वा.रा.बा.कां. स. १-३,४)

अखिल विश्वांत गुणाढ्य, पराक्रमशाली, धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यसंध, सत्य संकल्प, सच्चरित, सर्वभूतहितैषी असा आज कोण आहे ? विद्वान असून समर्थ, समर्थ असून विश्वमोहक, विश्वमोहक असून जितेंद्रिय असा आत्मनिष्ठ आज कोण आहे ? कोणी आज क्रोधाला जिंकलें आहे? जगांत आज अत्यंत तेजस्वी असा कोण आहे? कोण असा आज रागद्वेषशून्य सर्वसम म्हणवून घेतो ? दुष्टदमनाकरितां कोपानें ठाण देऊन उभा राहिला असतां देवदेवतांचीसुद्धां पांचावर धारण बसवणारा असा कोण महावीर्यशाली आज आहे ?

नारद उत्तर देतातः

इक्वाकुवंशप्रभवो रामो नाम जनैः श्रुतः । नियतात्मा महावीर्यो द्युतिमान् धृतिमान्वशी ॥बुद्धिमान् नीतिमान् वाग्मी श्रीमान् शत्रुनिबर्हणः || ( वा. रा. बा. कां. स. १-९)

असा एक इक्वाकुवंशॊद्भत्र श्रीराम मात्र आहे. इंद्रियमनांवर याचा पूर्णं ताबा आहे. अद्भुत पराक्रम याच्या ठिकाणी आहे. याच्या सामर्थ्याला जोड नाहीं. महान् तेजस्वी ! महान् धैर्यशाली ! महान् लोकप्रिय ! अति बुद्धिमान ! उत्कृष्ट नीतिमान् ! अगाध वक्ता ! अपार धनाढ्य ! सकलशत्रुविनाशक असा अलोट शक्तिमान् !

विपुलांसो महाबाहुः कंबुग्रीवो महाहनुः महोरस्को महेष्वासो गूढजत्रुरिंदमः ।। आजानुबाहुः सुशिराः सुललाटः सुविक्रमः । समः समविभक्तांगः स्निग्धवर्णः प्रतापवान् । पीनवक्षा विशालाक्षो लक्ष्मीवान शुभलक्षणः ॥( वा. रा. बा. कां. स. १)

उंच खांदे, आजानुबाहु, शंखाकृती कंठ, आकर्षक कपोल, मनोहर हनुवटी, विशाल असे भरीब वक्षस्थल, त्याच्या हातांतलें तें दीर्घ धनुष्य, त्याची ती भव्य तशी सुंदर आकृति ही सकळ लक्षणे त्याच्या अलौकिक पराक्रमाची साक्ष देतात, निरवधि पौरुषाची ग्वाही पटवितात. त्याचा शिरोभाग, लाट सारेच शरीराचे अवयव त्याचे दिव्य विभूतिमत्व प्रगट दर्शवितात. याच्या पराक्रमाच्या अत्युग्र विवेकाचें शांत व अति गंभीर तेजहि त्याच्या मुखावर झळकतांना दिसते. दर्शनमात्रे कर्तुमाकर्तुमन्यथाकर्तुं समर्थ असा साक्षात् परमेश्वरच भूभारहरण करण्याकरितां स्वतः अवतरला आहे अशी सर्वांची भावना होते. त्याचे सर्व अवयव प्रभुत्वसूचक आहेत. सर्वांनाहि तो प्रत्यक्ष थोर आधार वाटतो. त्याच्या ब्रह्मस्वरूपाचा परमानंद दर्शनानेंच इतरांच्या मनांत बिंबतो, त्याचा तो गोड स्वर, त्याची बोलण्याची पद्धत, चालण्याची ढब, पाहण्याची दृष्टि, सर्वच त्याच्याविषयीं एक दिव्य भावना निर्माण करतात. त्याच्या धवल हासानें मुग्ध न झालेला प्राणीच नाही. याचे सर्वच कांही अवर्णनीय आहे. एकंदरीत हा अखिल कल्याण-गुणगणरत्नाकरच आहे यांत संशय नाहीं. अखिल नक्षत्रांनी जसा चंद्र तसा अखिल सज्जनसमूहांनी हा श्रीराम अति शोभायमान वाटतो. याचे वसिष्ठादि मंत्रिमंडळ प्रभावळीप्रमाणे

याची शोभा वाढविते. ब्राह्मणांवर त्याची अतिशय भक्ति असून वसिष्ठापासून याला लियात झाली आहे. मृदुमधुर अशा प्रेमळ भाषणाने हा सर्वांचेच चित्त रिझवतो, सर्वांचाच गौरव राखतो, सर्वांनाच आनंद उत्पन्न करतो. याचे सर्व अवयव प्रमाणे कठीण असले तरी तितकेच ते कमनीय व कोमल आहेत. शास्त्रीय आचरणाची व धर्माची राम म्हणजे एक ओतीव मूर्तीच आहे, सर्व शास्त्रीय शुभलक्षणांची एक नूसच आहे.

home-last-sec-img