Literature

‘विरंग जाऊं नेदी क्षण’

एकंदरीत समर्थांनी सांगितल्याप्रमाणें ‘विरंग जाऊं नेदी क्षण ।‘ एक क्षण सुद्धा फुकट जाऊ नये. “Idle mind is Satan’s workshop’ हे लक्षांत ठेवावें. मन असे धारकीं न धरता सोडलें कीं, तें विषयांकडे गेलेच म्हणून समजावें. हे तत्व ज्ञान आणि त्याची धारणा कठीण काम वाटले तर देव अथवा गुरु यांच्या सेवेत अहर्निश रावावें, मुखानें अखंड नामस्मरण चालू ठेवावें. सदा देवकाजी झिजें देह ज्याचा सदा रामनाम वदे नित्य वाचा। स्वधर्मे चि चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा (मनोबोध ४८) एकंदरींत मनाला घाणेरड्या कल्पना करायला वेळच मिळू नये असे करावें. सर्व साधनें मन निर्विषय करून आत्मलाभ करून घेण्याकरिता आहेत हे ध्यानांत ठेवावें. संविषयं मनो बन्धाय निर्विषयं मुक्तये भवति ।‘ ( मंडल उ. ब्राह्मण) विषयभावनेनें युक्त मन बंधकारक आणि निर्विषय मन मोक्षकारक जाणावे. निरस्तविषयासगं संनिरुद्धं मनो हृदि । यदा यात्युन्मनीभावं तदा तत्परमं पदम् ॥ (ब्रह्म बिंदु उ. ४) विषयाची भावना नाहींशी होऊन असङ्ग भावनेनें आनंदरूपाच्या ज्ञानमात्रतेंत मनाला विलीन करून कसलाहि विचार करावयाला ते त्या स्थितीत उरले नाही आणि वृत्तिशून्य स्थिति बाणली म्हणजे परमपद गांठलें असे समजावें. एक आत्मा, दोन माया, अनेक अविद्या हे ओळखून असावें. बहुकालाचा झालेला अभ्यास घालवायाचा झाला तर अशारीतीने सतत अभ्यास दीर्घकालपर्यंतच चालू ठेवला पाहिजे. पुढे पुढे मन ताब्यांत येते. चोहीकडे पसरलेल्या काटेरी झाडांतून एक निमुळती

पायवाट असल्याप्रमाणे विषयप्रधान लौकिक, ऐहिक जीवनांतला परमार्थमार्ग आहे. इथे फार दूरदृष्टीनें, इकडे तिकडे तोल जाऊं न देतां मोठ्या दक्षतेनें वागावे लागते.

रात्री दहा वाजता झोपून सकाळी तीन वाजतां उठावें. उठल्याबरोबर आपल्यासगट विश्व सर्व निर्गुण, निराकार, निश्चल, निर्विकल्प, एक आनंदघनरूप आहे असे ध्यावें. ऋषिमुनी तीन वाजतां स्नानाला जातात, आपण झोपू नये. नाहीं झालें तर चार वाजता उठून स्वरूपाचें ध्यान करून निर्गुण अथवा सगुण ( अधिकाराप्रमाणे) प्रातः स्मरण करून शौचविधि आटोपून स्नान करावें. सर्वांनाच स्नानासाठी थंड पाणी सांगितले आहे. त्यांतल्या त्यांत निःस्पृहाकरितां ते अत्यंत आवश्यक आहे. थंड पाण्याचे स्नान आरोग्यकर, बलवर्धक, शांतिदायक, पावित्र्य निर्माण करणारें, वीर्यस्थापक असतें. ब्रह्मचारी आणि यती यांनी ओल्या पंचानेंच अंग पुसावें. ‘प्रातरुत्थाय यो विप्रः प्रातःस्नायी भवेत्सदा । समस्तजन्मजं पापं त्रिभिर्वर्षेव्यपोहति ।‘ प्रातः स्नानानें तीन वर्षांत जन्मजन्मांतराचे समस्त पातक जातें असें दक्षस्मृतीत आहे. संध्या, जप, अभ्यास पडल्याप्रमाणें बाह्यपूजा अथवा मानसिक पूजा करावी. सूर्यनमस्कार तरुण साधकानें १०८ तरी घालावेत. प्रकृतिमानाप्रमाणे कमीजास्त करावेत. तारुण्यांत व्यायाम पाहिजे. त्याने शरीर कसदार, जोमदार होतें, नाहींतर ढिलें पडते आणि साधनाचा उत्साह उरत नाही, आसने करावीत. सूर्यनमस्कार, त्रिचाकल्पयुक्त ब्राह्मणानें घालण्यांत फार फायदा आहे. ब्राह्मणेतर साधकाला संध्या, वेदोक्त मंत्र नाहीत, त्यानें नामस्मरण, ध्यान, पूजा, नामयुक्त नमस्कारांनी घालावेत. नमस्कारांत सर्व साधते.

मग ध्यानाला बसावें. मध्ये कांहीं उपनिषदादिकांचें श्रवण असल्यास जावें; नाहीं तर १२ वाजेपर्यंत ध्यानांत काळ घालवावा. निर्गुण अथवा सगुण ध्यान, तेवढे नाहींच टिकलें तर सोऽहंअसा त्याचा अर्थ ध्यानात घेऊन जप करावा. गुरुसेवेचें साधन असल्यास थोडक्यात थोडं ध्यान करून देवसेवेचें अथवा गुरुसेवेचें काम करावें. बारा वाजता माध्यान्हा स्नान, माध्यान्ह संध्या, ब्रह्मयज्ञ मधुकरी, नैवेद्य, भोजन, दुपारी ग्रंथावलोकन अथवा स्वाध्याय म्हणून थोडें उपनिषत् आदि काही सांगवून ध्यावें. सायंकाळी पुन्हां स्नान, सायान्हिक, उपाहार. ध्यानपूर्वक विश्रांति ध्यान जसे जसें अधिकाधिक वेळ टिकेल, त्याप्रमाण इतर कमी करीत जावें आणि होईल तो अधिक वेळ निर्विकल्प स्थितीत घालवावा. युक्ताहारविहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु । युक्तस्वप्नाववोधस्य योगो भवति दुःखहा ॥‘ (भ.गी. ६-१७). आखीव नियमित आचरण असावें. ठराविक वेळी अनुक म्हणजे अमुक व्हावें. नेमका ठरल्या वेळी आहार घ्यावा. देहाच्या क्रिया व्यायामादि नियमित वेळी ठराविक असाव्यात. नियमित वेळी झोपावे. ठरल्या वेळी उठावें. जागरण करूं नये, त्याने उष्णता वाढते. ठराविक वेळी ध्यानाला बसावें. उष्ण आहार (चहा, कॉफी इत्यादि), मादक उष्ण पेये घेऊ नयेत. सकाळी व रात्री शक्य झाल्यास दूध प्यावें; नाही तर उष-पान करीत जावें. केवळ गायीच्या दुधावर राहिल्यास त्या ब्रह्मचारी योग्यास एक वर्षानंतर योगसिद्धी लाभते, असे योगोपनिषदाचे सांगणे आहे. दुर्जनदर्शन दुर्जनसहवास, दुष्टशब्दश्रवण इत्यादि होऊ नयेत. आपल्या भूमिकेविरुद्ध, अभ्यासाविरुद्ध चित्तविक्षेपकारक असणाऱ्या सर्वांचाच त्याग करावा. मन दिवसेंदिवस शुद्ध होत चालले आहे किंवा नाहीं, याचा आढावा काढीत असावें. तें आत्मस्थितीत अधिकाधिक वेळ राहू लागले आहे किंवा नाही, सुधारणा किती होत चालली आहे. इकडे लक्ष पुरवावें. संबंध जन्मभर व्रतस्थ रहाण्याचा हा निवृत्तिमार्ग आहे.

home-last-sec-img