Literature

विश्व मिथ्यत्व विचार

‘एतज्ज्ञेयं नित्यमेवात्मसंस्थं ।

नातः परं वेवितव्यं हि किंचित् ।’ (श्वेता. १-१२)

‘आपल्या मीपणाच्या विस्मृतीत झळकत असलेल्या परमात्म्याचे आनंदस्वरूप जाणून घेतले पाहिजे. ह्याशिवाय इतर दुसरे आणखी काहीहि जाणून घेण्यासारखे नाही.’

I ह्या विश्वात नवजीवन उत्कर्षासाठी म्हणून जर कांही असेल तर ती केवळ आशाच होय. ह्या आशेमुळेच सर्व मनुष्ये यंत्रासारखी अव्याहत कार्यतत्पर आहेत. ह्या आशेच्या गतीच्या अनुरोधाने सर्व प्राणी न चुकता तिच्या पाऊलावर पाऊल टाकीत असतात. अशाप्रकारे ही आशाच सर्व प्राण्यांना चालविणारी जीवनशक्ति असली तरी, ही आशा केवळ सुखाच्या कल्पनेनेच परिपूर्ण आहे. प्राण्यांच्या शरीरांत असणान्या रक्तप्रवाहामुळेच ह्या आशेमध्ये गुरफटलेल्या प्रत्येक जीवाच्या सर्व कर्मांतून सुखाची भावनाच पूर्णपणे ओथंबून वाहात असते. स्वतःच्या मुक्तीमुळे पांगळ्याप्रमाणे एका बाजूस बसल्या जागीच स्थिर झाल्यासारखी आणि स्वतःच्या बंधनामुळे शोभायमान झालेली सुखाची आशा ही एक जणु कांही आश्चर्यकारक बेडीच आहे. हे सर्व जग विचित्र शृंखलेने जखडले जात असल्यामुळे सुखाच्या ध्येयाने त्याच्या प्राप्तीसाठी अव्याहत धावपळ करीत असलेले विश्व ही एक प्रयोगशाळाच होय. ह्यात असलेल्या पदार्थापासून सुखाची सुंदरशी कल्पनाच सर्व प्राणी करतात. प्राप्त होण्यासारख्या सुखाची कल्पना बाह्य पदार्थाच्या संयोगाने इंद्रियांना होणाऱ्या निव्वळ अनुभवामुळेच प्रत्येकाच्या अंतःकरणात निर्माण झाली तरी खऱ्या सुखशांतीच्या प्राप्तीसाठी हा उपाय तितका योग्य नसून अपुराच आहे. हा कांही काळ टिकणारा आणि शेवटी दुःख देऊन विजेसारखा लुप्त होणारा असल्याकारणानेच ह्या इंद्रियजन्य संस्काररूपी सुखाचेच उगमस्थान भ्रामक असून त्याचा त्याग करणे हेच शेवटी खन्या सुखप्राप्तीसाठी योग्य व इष्ट आहे. खारट पाणी पिणाऱ्याची तहान कधीच शमत नाही, भागत नाही, त्याप्रमाणेच हे विषयसुख !

अग्नीत तूप किंवा इतर हविष्य द्रव्य टाकिले असता ज्याप्रमाणे अग्नीची ज्वाला अधिकच भडकत जाते त्याप्रमाणे विषयानुभवाने विषयवासना शमन न होता अधिकच वाढत जात असते. ‘वासनावृद्धितः कार्य कार्यबुद्ध्या च वासना’ ह्याप्रकारे ही गाडी पुढे चालूच रहाते. वासनावृद्धीमुळे जीव तिच्या पूर्तीसाठी विषयाचा अनुभव असतो. अशा प्रकारे होणारा विषयोपभोग त्याची विषयवासनाच जास्त वाढवितो. अशा ह्या फेऱ्यात सापडलेला त्यामधून मुक्त होणे फारच कठीण !

आकार असणारी गोष्ट सीमा, मर्यादा, उत्पत्ति, व नाशयुक्त असल्याने ती ‘अल्प’ आहे. जन्मलेल्याला मृत्यूहि अटळच. ‘यत् दृष्टं तत् नष्टम ।’ हा एक सिध्दांत आहे. जे उत्पन्न होते ते संपते असेच म्हणावे लागत असल्याने, निर्माण झालेल्यास नाश असल्याकारणाने झालेले जे कांही आहे ते कार्यच होय. कार्य उत्पत्ति-नाश ह्यांनी बनले आहे. ‘जे मर्त्य ते अल्प’ म्हटले जाते, तेव्हा सर्वच कार्य अल्प म्हणावे लागते. जे अल्प आहे ते मर्त्य म्हणजेच नाश होणारे आहे व जे मर्त्य आहे. ते अल्प आहे असे म्हणण्यासहि हरकत नाही.

अल्प अशा कार्यमात्रात सुख नाही असा श्रुतीचा अभिप्राय आहे. कार्य अल्प असल्याने त्याचे कारण पूर्ण असणे उघड आहे. कारण हेच कार्याचा आधार असल्यामुळे आधाराखेरीज त्यात एकरूप झालेले ध्येय स्वतःच्या सत्तेने कधीच राहू शकत नाही. पूर्ण असलेल्या कारणामुळेच होणारे कार्य हे अस्तित्वात असते त्यामुळेच त्याचा भास होतो. ह्याखेरीज त्या सुखरूप अशा कारणामुळेच ह्या सर्व कायामध्ये सुखाचा आभास दिसून येतो.

अल्प असणारे पूर्ण नसतेच. त्यामुळे अल्प असणारे कार्य कारणरूप असणारे ‘पूर्ण सुख’ होत नाही. कारण अनंत तर कार्य सांत. सांतच अल्प ! अल्पामध्ये अनंताचा समावेश होत नाही. अनंतसुखरूप असणारे कारण, अल्प असणाऱ्या कार्यात समाविष्टित असू शकत नाही, हाच ‘सिध्दांत’, अशाप्रकारे कार्य हे सुखरहितच, सुख नसलेले म्हणजे दुःखरूपीच होय. प्राप्त झालेल्या अल्प अशा कार्याद्वारे साधणारे प्रयोजन स्वतःमुळेच पूर्णत्वास पोहोचलेल्या अनंतरूप अशा त्याच्या कारणांस कधीच दाखवू शकत नाही. प्रयोजनाच्या अभावामुळे कार्याची उत्पत्ति होत नाही हेच सिद्ध होते. सत्यरूपी कारणाच्या ठिकाणी कार्याची भावना राखणे हे केवळ मिथ्याच होय.

‘ब्रह्म सत्यं जगत् मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः ।’ हे पारमार्थिक सत्य आहे. सत्य मिथ्या होत नाही. सत्यापासून मिथ्याची उत्पत्ति होत नाही व सत्यामध्ये मिथ्याही असू शकत नाही, असे असताना सत्यस्वरूप असलेल्या कारणामुळे निर्माण झालेल्या कार्याला कोणताच आधार दिसून येत नाही.

कार्य उत्पन्न होण्यापूर्वी व नष्ट झाल्यावर शिल्लक असत नाही. मध्यंतरीच्या काळात आढळणारे हे कार्य रञ्जुसर्पाप्रमाणे केवळ बोलण्याचा विषय होय. कालत्रयी असणांच्या कालामध्ये कार्याचा केवळ उल्लेखच होईल. ह्या उल्लेखामुळे मूळ वस्तूत कोणताही विकार होत नाही. ह्यास रञ्जुसर्पाचा एकमेव सिध्दांतच पुरेसा आहे. आरोपित केलेले हे मिथ्या ठरणारे असते. मिथ्या ठरलेले हे ‘बांझ महिलेस मुलगा झाला’ असे म्हटल्याप्रमाणे हास्यास्पद होईल. त्यामुळे वांझेच्या मुलाचे बोलणे ऐकून भीती उत्पन्न होत असेल तर हे जग स्वतःच निर्माण झाले आहे असे समजण्यास हरकत नाही. सदेव सोभ्येदमग्र आसीदेकमेवाद्वितीयम् ।’ (छां.उ.) हे सर्व प्रथम एकमेवाद्वितीयच. अशा ह्या वाक्याच्या दृष्टिकोनातून अद्वितीय असणाऱ्या सत्य स्वरूपात अनेकविध असे कार्य तद्विरुद्ध असल्याने ती केवळ कोरडी भ्रांतीच होय. मनोरथाला आधार नसल्याप्रमाणे ह्या भ्रांतिसिद्ध झालेल्या जगालाहि कोणताच आधार नाही. नसणाऱ्या गोष्टीचे अस्तित्व असण्याच्या गोष्टीचा अभाव हे कधीही होत नाही असा सत्य-मिथ्याचा निर्णय तत्त्वदर्शीकडून लागला आहे.

इति शम्!

home-last-sec-img