Literature

वैशाख वद्य दशमी

परमात्मा अघटीतघटना सामर्थ्यवान आहे. सर्वसामान्य व्यवहारात एखाद्या मोठ्या वस्तूत लहान वस्तू सामावू शकते. पण लहान वस्तूत मोठी वस्तू सामावू शकत नाही. पण परमात्म्याच्या कृतीत हे नियम, निर्बंध नाहीत. आपले डोळे लहान असून त्यातील बाहुली त्यापेक्षाही खूपच लहान आहे. डोळ्यात बाहुलीस प्राधान्य असून तिच्यात पदार्थाच्या आकार रूपाचे ग्रहण करण्याची शक्ती आहे. ती छोटीशी बाहुली आपल्यापेक्षा आकाराने मोठे असलेले कोणतेही दृष्य ग्रहण करू शकते. इतकेच काय पण तिच्या आवाक्यात येणारे कितीही मोठे दृष्य ती सहज आकलन करू शकते. हा किती मोठा चमत्कार ! आपण सर्व बाह्य वस्तू तर पाहतोच व त्याचा परिणाम शरीरातील मनावरही होतो. एकाचा परिणाम दुसऱ्यावर होतो. म्हणजेच त्या दोघांचा संबंध घनिष्ट असला पाहिजे. असा संबंध प्रत्यक्ष दिसत नसला तरी तो परमेश्वरीशक्तीचाच प्रभाव आहे. परमात्मशक्तीचा प्रभाव कल्पनातीत असून तो आपल्या बुध्दीस व तर्कास अनाकलनीय आहे. ते स्थान मानवास अनाकलनीय असले तरी तेथेही परमेश्वर आहेच. परमात्मशक्तीचा तर्क करणे मानवीबुध्दीस असाध्य आहे. पण जी गोष्ट आपल्या शक्ति-बुध्दीस आकलनीय नाही, तिचे अस्तित्वच नाही असे म्हणणे चुकीचे आहे. अशा म्हणण्याने आपले अज्ञानच प्रगट होते. पण परमात्म्याच्या अस्तित्वांत कोणतीच बाधा येत नाही.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img