Literature

श्रावण वद्य चतुर्थी

निष्कपटी व प्रामाणिक ही हिंदू ओळखण्याची दोन अत्यंत महान लक्षणे होत. त्यांना अनैतिक व्यवहार
पुर्णपणे निषिध्द आहे. त्यांचे जीवन अकृत्रिम असणे आवश्यक आहे. तो धार्मिक, प्रसन्न, न्यायप्रिय,
सत्यप्रतिज्ञ, देवभक्त व गुरूभक्त असावा. पतिव्रत्य व एकपत्नीत्व या शीलाचा प्रकाश त्याने सर्वत्र पसरविला
पाहिजे. हिंदुसंस्कृतीचे वर्ण व आश्रम ही मुख्य अंगे आहेत हे ध्यानांत धरावे. आपापल्या वर्णाश्रमधर्माचे
अनुष्ठान करणाराच हिंदु होय.

विश्वातील सर्व देशांत हिंदूस्थानाबद्दल समादरणीयता व सस्पृहता असण्याचे कारण हिंदुस्थानाची
बौध्दिक, नैतिक व आध्यात्मिक संपत्तीच होय.ही गोष्ट ह्रदयात सदैव बाळगली पाहिजे. अमृत पितांच ते
एकदम शरीरांस संपूर्णपणे आरोग्य प्राप्त करून देते त्याचप्रमाणे अध्यात्मज्ञान होताच शरीरात सर्व सद्गुण
एकदम वास करू लागतात. ही आत्मनिष्ठाच हिंदुसंस्कृतीचे मुळ होय, ही गोष्ट कोणत्याही हिंदुने विसरता

कामा नये. वेद व उपनिषदे हिंदुसंस्कृतीचे आधारस्तंभ होत हेही ध्यानात धरले पाहिजे. सद्बुध्दी, सदाचरण,
विश्वबंधुत्व, सत्य, अध्यात्मनिष्ठा, समत्व, परस्परांत प्रेममय वागणुक, दया, दानधर्म, उच्च विचारसरणी, उत्कृष्ट
निती आदी सद्गुणांच्यामुळे हिंदुनी अखिल जगतात प्रथमस्थान प्राप्त केले आहे हे ध्यानी धरून प्रत्येक हिंदुने
त्यानुसार वागले पाहिजे. आपल्या सत्कीर्तीला कलंकित करणारे आचरण आपला प्राण घेतला तरी खरा
हिंदु स्वप्नातही करणार नाही. प्राणापेक्षा सत्कीर्तीवर जास्त प्रेम करणे हे हिंदुचे प्रधानलक्षण होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img