Literature

श्रावण शुद्ध अष्टमी

प्रारंभी शास्त्रोचित ब्रह्मचर्यपालन करून सन्मार्गाने वागून गृहस्थाश्रम संपवून वानप्रस्थाश्रम स्विकारणे
इत्यादी परमार्थासाठी युक्त असे प्रवृत्तिमार्ग आहेत. संन्यास मात्र निवृत्तीमार्गानेच परमार्थ साधण्यासाठी
आहे.

सर्व सृष्टी मिथ्या आहे. सृष्टीतील सर्व पदार्थ मिथ्या आहेत. त्यांच्या प्राप्तीसाठी केले जाणारे प्रयत्न व त्यांचा
अनुभव घेणारे मानवी शरीर मिथ्या, असार व अनित्य होय अशी पक्की समजूत करून घेऊन सर्व
सुखोपभोगाचा त्याग करून त्याबद्दल घृणा उत्पन्न होणे व त्या सर्वांना आश्रयभूत असलेला स्वयंप्रकाशी
परमात्मा एकमेवाद्वितीय आहे अशी पक्की खात्री बाळगून, त्यालाच शरण जाऊन सदासर्वदा त्याचीच
अनन्यभावाने आराधना करणे म्हणजेच संन्यास हेच भगवद्आराधनेचे शेवटचे स्वरूप होय.

वर्णाश्रमधर्माचे पालन, परिशुध्द जीवन, सत्यभाषण, सत्पात्रदान, परोपकार, धार्मिक विधिविधानांनी
भगवद् आराधना, नाम संकीर्तन इत्यादी सत्कर्मानी परमात्म्याची आराधना करून त्याच्या भक्तीस व
गुरूकृपेस पात्र झाले पाहिजे. या मार्गाने पुढे सरसावून श्रीमन्नरायणाचे यथार्थस्वरूप समजून घेतल्यास ते
गुरूकृपेस पात्र होतील व असे झाल्यास *' इतिकर्तव्यता समाप्ति '* असे सांगितल्याप्रमाणे मानवजन्मात
साध्य करून घेण्यास शक्य असलेले प्राप्त करून घेतल्यास कर्मयोगाची समाप्ती होईल व त्यामुळे सकलक्षेम
प्राप्त होईल.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img