Literature

श्रावण शुद्ध एकादशी

परमात्म्यविषयी दृष्टी ठेवून जगणाऱ्या लोकांना या जगांतील विषयांचे भय असत नाही. याविरूद्ध
वागणारे लोक आत्महिंसकच होत. म्हणून आपण आत्मघात करून न घेता आपला उद्धार करून घेतला
पाहिजे. *' आपणच आपले बांधव किंवा शत्रू आहोत. '* असे परमात्म्याने भगवद् गीतेत सांगितले आहे.
आपला उद्धार म्हणजेच विषयवासनेचा त्याग. त्यासाठी दोन आश्रमांचा उपयोग होतो. पहिला गृहस्थाश्रम व
दुसरा संन्यासाश्रम. सुक्ष्म निरीक्षणांनी व विचारांनी भोगाचा अनुभव घेऊन ते दुःखमय व निरूपयोगी आहेत

असे समजून उमजून परमात्म्याकडे वळणे आणि त्याची प्राप्ती करून घेणे यासाठीच गृहस्थाश्रम आहे.
विषयांत सुख नाही हे शुध्द विवेकाने समजून घेऊन त्यांचा संपर्कही होणार नाही अशी काळजी घेऊन
परमात्मसुखस्वरूप ओळखून घेणे हे संन्यासाश्रमाचे कर्तव्य होय. विटाळ करून घेऊन स्नान करण्यापेक्षा
विटाळ होणार नाही ही दक्षता घेणे हा *' बालसंन्यासमार्ग* ' होय. अशारितीने भोगाने व त्यागाने
परमात्मप्राप्ती शक्य आहे असे शास्त्रवचन आहे.

गृहस्थाश्रमांत अनुभवाद्वारे मन शुध्द करणे हा शास्त्राचा उद्देश आहे. केवळ विषयसुखासाठी गृहस्थाश्रम
नाही, विषय सुखातील दोष ओळखून त्याचा त्याग करणे हा त्याचा गर्भितार्थ आहे. हा प्रवृत्तीमार्ग असला
तरी पुढे निवृत्तीमार्गाकडे वळण्याची दृष्टी ठेऊनच हे सांगितले आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img