Literature

श्रावण शुद्ध चतुर्थी

परमात्मा हा दीपस्वरूप आहे. दिव्याच्या प्रकाशाने वस्तु दिसतात. पण वस्तुमुळे दिव्याची जाणीव होत
नाही. या सृष्टीतील कोणत्याही बाह्य वस्तूंना स्वतःचा प्रकाश नसतो. परंतु मानवदेहामध्ये वास करीत
असलेला परमात्माच पुर्णप्रकाशी भगवंत होय व तो प्रकाश समजवून घेणे म्हणजेच भगवद् आराधना होय.
त्या परमात्म्याची आराधना करून भवसांगरातून तरून जाण्यासाठी मानवाने प्रयत्नशील असणे हेच विवेकी
मानवाच्या जन्माचे इतिकर्तव्य होय. त्याचमुळे तो अमर व नित्यमुक्त होईल.

शरीरातील परात्परवस्तुंचे पावित्र्य राखणे हीच खरी भगवद् आराधना होय. तसेच त्या परात्पर वस्तुंचे ज्ञान
करून घेणे ही सुध्दा भगवद् आराधनाच होय. या अंतरीक स्फुर्तीस समजवून घेण्यासाठी साधनरूप म्हणून
जप-तप, होम-हवन, मंत्रपठण, पुजा-अर्चने ही मुख्यत्वे असलेली भगवद् भक्तीची बाह्य साधने होत. *' तस्य
तपोदमः कर्मेति प्रतिष्ठा '* अशा स्थितींतच आपणास रहावयाचे असल्यास, ही निष्ठा वाढवायची असल्यास
काय केले पाहिजे ? असा प्रश्न येतो. धर्मास अविरोधी, स्वावलंबी, परिशुध्द असे जीवन जगणे, उत्तम गुणांचा
संचय करणे, देहाभिमान घालविण्यासाठी प्रयत्न करणे, सत्कर्माने परमात्म्यास प्रसन्न करून घेणे इत्यादि
कार्यक्रम अनुसरून आपले जीवन व्यतीत करणे म्हणजेच भगवद् आराधना करणे होय आणि हेच मानवी
जीवनाचे लक्ष्य होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img