Literature

श्रावण शुद्ध पंचमी

*' श्रुतिस्मृती ममेवाज्ञे वस्तु उल्लंघ्य वर्तते |*

*आज्ञाच्छेदी ममद्रोही न मे भक्तो न मत्प्रियः || '*

मानवाने सुखाने संसार करीत करीत कालक्रमणा करून परमपदप्राप्तीसाठी अनुकूल वातावरण
निर्मिण्यासाठी भगवंताने आपल्या आज्ञा श्रुतिस्मृतीरूपाने प्रगट केल्या आहेत. चार वर्ण, चार आश्रम, त्यांच्या
व्यवस्था या त्यानेच कल्पिल्या आहेत. त्याप्रमाणे वागणारा सुखी होतो व त्या आज्ञांचे उल्लंघन करणारा
भगवद्द्रोही होतो. असे लोक माझे भक्त असू शकत नाहीत व ते मला आवडतही नाहीत असे भगवंतांनी
स्वतःच सांगितले आहे.

वर्णाश्रम धर्माप्रमाणे वागणाऱ्यास भगवंताचे सहाय्य मिळते. विधिनिषेधात्मक नियमांचे पालन केल्यास
मानवाचा संसार सुखाचा होईल व परमेश्वाराची कृपाही होईलच होईल. भगवत्कृपा अगाध व अगम्य आहे.
त्यापेक्षा मोठे सुखसमाधान दुसरे कोणतेच नाही. इतर सुखे नाशिवंत असून मायेच्या आधीन असल्याने ती
दुःखास कारणीभूत होतात. परमात्म्याच्या कृपाप्रसादाने मानव पुनीत होतो व त्यामुळे त्याला चिरसुख प्राप्त
होते.

*' ददाति बुध्दियोगं तं येन मामुपयान्ति ते | '*
कोणत्या प्रकारे वागल्यास माझे स्वरूप प्राप्त होईल अशी सद्बुद्धी व सुज्ञान मी माझ्या भक्तांना देतो '
असे भगवंतानीच म्हटलेआहे. भगवान परम दयाळु, महादयाळु आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img