Literature

श्रीरामोविजयतेराम

श्रीरामः श्रीकरः श्रीदः श्रीसेव्यः श्रीनिकेतनः।
राक्षसान्तकरो धीरो भक्तभाग्यविवर्धनः ।। 1 ।।
श्रीराम श्री (वैभव) सम्पन्न करविणारा, श्रीदः म्हणजे भाग्य, सामर्थ्य देणारा, श्रीसेव्यः म्हणजे श्रीयुक्त झाल्यावर जो सेव्य म्हणजे सेवा करण्यास, स्मरण करण्यास अगदी योग्य असा, श्रीनिकेतनः म्हणजे वैभव सम्पन्नतेचे खरे अधिष्ठान, आगर, निवास आणि राक्षसांचा नाश करणारा धीर, धैर्यशाली भक्तांचे भाग्यवर्धन करणारा कल्याणकारी श्रीराम सर्वत्र अणुरेणुत भरलेला असून झळकत असतो. ।।1।।

मरेति व्यस्तंयन्नाम जपन्‌ व्याधोऽभवदृषिः ।
जन्मदुःखनुदं काव्यं दिव्यं व्यरचयन्महत्‌।। 2 ।।
मरा—मरा असे उलट नाम रटत—रटत एक व्याध म्हणजे पारधी महान्‌ ऋषि झाला. जन्माला येणे हेच दुःखाचे मूळ कारण त्याचा समुळ नाश करणारे असे महान दिव्य महाकाव्य ”श्रीमद्‌वाल्मीकीय रामायण” हयाचा रचनाकार झााला.।।2।।

यदा यदा भवेद्‌ग्लानिर्धर्मस्य स तदा तदा ।
राक्षसान्तकरो रामो सम्भवत्यात्ममायया ।। 3 ।।
अर्थ— जेव्हां—जेव्हां धर्माचा नाश होवूं लागतो, तेव्हां तेव्हां (धर्म नाशक) राक्षसांचा निःपात (निर्दालन) करण्यासाठी श्रीराम आपल्या लीला विग्रहानें (स्वात्ममायया) अवतार धारण करतात. ।।3।।

महामोहकरी माया यत्प्रसादाद्विनश्यति ।
जघन्या अपि पूज्याश्च पावना बहवोऽभवन्‌।। 4 ।।
अत्यंत मोहक अशी मायावी भ्रामक आकर्षणें ज्याच्या कृपाप्रसादाने हरण केली जातात त्या प्रभूरामचन्द्रा मुळे कित्येक हीन तिरस्करणीय पापी जनसुध्दां पवित्र व पूज्य झाले आहेत. (उदा. —वाल्याकोळयाचा वाल्मीकी ऋषी झाला आणि पापी रावणाचा रामबाणा मुळे उध्दार झाला.)।।4।।

यस्य प्रसादतो जातो हनूमान्‌ महतो महान्‌।
जन्ममृत्युजरादुःखान्मुक्तोऽद्यापि विराजते ।। 5 ।।
आज ही ज्याच्या कृपाप्रसादाने श्री हनुमान हा वानरश्रेणितील असून ही पूजनीय झाला आहे आणि जन्म—मृत्यु—जरा म्हणजे वृध्दत्व ह्‌यापासून मुक्त होवून विराजमान झाला आहे.।।5।।

यस्मात्परतरन्नास्ति यस्य नाम महद्यशः ।
रामं लोकाभिरामं तं व्रजामः शरणं मुदा ।। 6 ।।
ज्याच्याहून श्रेष्ठ दूसरे कोणीच नाही, जो महान्‌ यशस्वी आहे, अश्या सर्वलोकांस आनंदप्रदायक प्रभू रामचंद्राला मी आनंदाने शरण जातो नमन करतो. ।।6।।

मैतयिति नः सर्वान्‌ संसारात्तारयिष्यति ।

श्री राम जयरामेति जयजयेति जपाद्‌ध्रुवम्‌।। 7 ।।
आपणा सर्वांना ”मी आणि माझे” ह्‌या आसक्तिरुपी संसारातून हा ”श्रीराम जय राम जय जय राम” असा मंत्र निश्चित जप केल्यास तारेल.।।7।।

राम एव परम्ब्रम्ह राम एव परागतिः ।
मनः शान्तिकरोरामो मन्मथारि नमस्कृतः ।। 8।।
श्री रामप्रभु हेच ”परब्रम्ह” आहेत आणि श्रीराम हीच ”परमगति” आहेअर्थात्‌ परम अंतिम साध्य आहेत. मनाला शान्ति देणारे आणि मनास विचलित करण्यार्‌या दुष्ट विचारांचे निरसन करणारे हे ”रामनाम” ह्‌यास नमन आहे. ।।8।।

जयत्रययुतः श्रेष्ठो रामत्रययुतो मनुः ।
यत्र श्रीराममहिमा त्रिसत्यमिति वर्ण्यते ।। 9 ।।
तीन प्रकारचा जय प्राप्त करणारा (म्हणजे—(1)माया(2)मोह(3) अविद्या ह्‌यांवर नियंत्रण प्राप्त करुन जय मिळविणारा ) असा श्रेष्ठ मनु म्हणजे तपस्वी राजा श्रीराम हा ज्या ठिकाणी आपल्या सामर्थ्याने विराजित आहे, त्यास त्रिवार सत्य असेच म्हटले जाते. ।।9।।

रामः श्रीसीतया युक्तः सर्वैश्वर्यव्‌ इत्यपि ।
महत्वमस्यानन्तं यत्‌ तच्छ्रीरामपदे स्थितम्‌ ।। 10 ।।
श्रीराम हे श्रीसीतेसह सर्व ऐश्वर्य प्रदाता आहेत. जो श्रीरामपदावर प्रतिष्ठित झाला त्याचे महत्व अंतहीन आहे. त्यास अपार महत्व प्राप्त होते. ।।10।।

जय रामपदेनायं जयरूप इतीर्यते ।
यतोऽसौ जयरूपो हि जयार्हो जयदस्तथा ।। 11 ।।
”जय राम” ह्‌या पदाने ज्याचे स्वरुपच गाइले जाते आणि म्हणून हे जयाचे स्वरुप त्या योग्यच आहे आणि त्याच्या सतत जपाने उच्चारणाने ते जयच म्हणजे सफलताच प्रदान करते. ।।11।।

जयजयेति पदेऽर्थोऽयं द्योतते सर्वसिद्धिदः ।
य स्मिन्न माया नाविद्यां तस्मिन्मोहःकथं भवेत्‌।। 12 ।।
”जयजय” ह्‌या शब्दांमध्ये (वरील मंत्रांत) जो अर्थ स्पष्ट होतो त्यांत माया, अविद्या ह्‌यांचा पराभव प्रकाशित होतो तर मग तेथे मोह हा कोठून शिल्लक राहणार ? अर्थातच त्याचा पण पराभवच झाला. ।।12।।

रामत्रये दाशरथिश्चेशो ब्रह्मेति कथ्यते ।
मरूदात्मजसन्त्राता मोचयेन्मंदनादपि ।। 13 ।।
रामाचा त्रिवार उच्चार म्हणजे त्यांत (1) दाशरथी — दशरथाचा पुत्र (2) ईश (3) ब्रम्ह असा अर्थ आहे. आणि वायुपुत्र हनुमान तर केवळ त्यांची स्तुती (वंदना) केल्याने पण आपले तारण करतात. ।।13।।

श्री रामेति पदं पूर्वं जयरामेति वै ततः ।
रामोऽत्र द्विर्जयात्पश्चाद्वर्तते मनुराजके ।। 14 ।।
श्रीराम ह्‌या पदा पूर्वी जय जय राम असे पद येणे म्हणजे सर्वत्र त्याचा (ततः—सर्वत्र) जयघोष होणे. ह्‌याचाच अर्थ दोनदा जयजयकार केल्यावर राजाराम हेच वर्णन केले जाते. ”राम” पद म्हणजे दैदिप्यमान्‌ राजसमूहांत मनुराजांच्या वेशांत सुशोभित होते. (राजक्‌—दैदिप्यमान राजसमूह) ।।14।।

महासंसारव्यामोहान्मोचयत्याश्वयं मनुः ।
जपनीयः कीर्तनीयो मुदा सर्वैश्च सर्वदा ।। 15 ।।
ह्‌या विशाल संसारांतील भ्रामक अश्या विराट्‌ सागरांत गटांगळया खात असतांना हेच राजाराम मनुष्याला वाचवूं शकतात. सर्वांनी आनंदाने ह्‌याच रामनामाचा जप करावा. त्यांच्या लीला—विग्रहांचे गुणगान अर्थात्‌ कीर्तन सर्वदा करावें.।।15।।

यज्ञराक्षसभूताद्या पीडाऽनेन विनश्यति ।
रामो धनुर्धरो नित्यं संरक्षति पदे पदे ।। 16 ।।
यज्ञ म्हणजे शुभकार्यांकरिता सतत केली जाणारी प्रभूची दयायाचना आणि सतत प्रयत्न. त्यामार्गांत आडवे येणारे दुष्ट—विचारांचे खल म्हणजे राक्षस. त्यांच्या दुष्टप्रवृत्तिचा नाश करण्यासाठी श्रीरामाचें धनुष्य हे पदोपदी समर्थ आहे. अर्थात्‌ श्रीरामनाम जपाने त्यांचे निर्दालन होईल.

मदोन्मत्त नरैश्चापि न दुःख लभते कदा ।
जन्मसन्तापचंद्रोऽयं ज्ञानविज्ञानदो मनुः ।। 17 ।।
अत्यंत दुष्ट विचारांनी उन्मत्त झालेल्या माणसांपासून सुध्दा आपल्याला त्रास होणार नाहीं. जर आपण ह्‌या तपस्वी श्रीरामचंद्राचे सतत्‌ स्मरण केले तर ते चंद्राप्रमाणे शीतलता प्रदान करते. ज्यावेळेस आपल्याला संसारदुःख समोर दिसते तेंव्हा जन्माला येणे हेच खरे दुःखाचे मूळ आहे असे समजते. आणि परमात्म तत्वाचें ज्ञान झाले तर प्रभू रामचंद्रांच्या जीवनाचे मनन करता येते व मनास शीतलता आणि शान्ति मिळते. ।।17।।

यत्रकुत्रापिजप्योऽयं शुचिर्वाप्यशुचिस्तथा ।
जपतःशान्तिमाप्नोति प्रशस्तोऽस्मिन्‌कलौमतः ।। 18 ।।
ज्याही कोठल्याही ठिकाणी आणि कोणच्याही वेळी ह्‌या पवित्र नामाचा जप होईल, तेंव्हा ह्‌या कलियुगांतही ते शान्ति प्रदान करेल, हे नक्कीच आहे. ।।18।।

यज्ञानां जपयज्ञोऽस्मि भगवद्वाक्यमीदृशम्‌।
रामेणैव पुरादिष्टः षडङ्‌गादिविवर्जितः ।। 19 ।।
भगवान्‌ श्रीकृष्णांनी गीतेत सांगीतलेच आहे कीं यज्ञांमधील जपयज्ञ जो आहे त्यांत मी उपस्थित आहे. पूर्वी श्रीरामांनीच स्पष्ट केले आहे की षड्र—अंग—विवर्जित असा नुसता नामजपयज्ञ जरी केला तरी तो तारक आहे. ।।19।।

मरूत्सुतावताराय रामदासाय धीमते ।
श्रीरामवरयुक्तोऽयं सुलभोऽपि फलाधिकः ।। 20 ।।
वायुसुत हनुमानाचेच अवतार म्हटले जाणारे श्रीसमर्थ रामदास स्वामी हे केवळ रामनामाचे बळावरच येव्हडे यशस्वी झाले आणि प्रभुरामचंद्रांचे दर्शन घेण्याचे अधिकारी ठरले. आणि सुलभरीतिने त्यांनी यश कीर्ति सम्पादन केली. ।।20।।

त्रैलोक्यपावनी पुण्या मुक्तिदाराघवस्तुतिः ।
भद्रं तनोतु लोकेषु गंगेव किल सर्वदा ।।
ह्‌या प्रमाणे श्रीसमर्थ रामदासांची कृपा प्राप्त करुन भगवान श्रीरामप्रभूंच्या चरणकमलावरील भ्रमररुपी भगवान श्रीधरस्वामी विरचितं श्रीरामोविजयतेतरामस्तोत्रं संपूर्णम्‌।।

श्रीमत्‌ प.प.श्रीधरस्वामी महाराज, सज्जनगड यांच्या मूळ संस्कृत श्लोकांचा हा मराठी अनुवाद.
अनुवादकः सौ. नलिनी प्रभाकर पाटिल, इंदूर

home-last-sec-img