Literature

श्री गुरवे नमः

आज श्रीदत्त जन्मोत्सवानिमित्त मला पूर्वी सूचित केल्याप्रमाणे ‘श्रीगुरु’ हा प्रवचनाचा विषय आहे.

श्रीदत्तात्रेयांना आपण गुरु असे म्हणतो. श्रीगुरुची आराधना आपणा सर्वांच्या परिचयाची आहे. त्यासंबंधीचा एक श्लोक असा आहे –

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ||

‘सद्गुरु चतुर्मुख ब्रह्मा, तेच साक्षात् विष्णु, तेच साक्षात् सदाशिव, इतकेच नव्हे तर त्रिमूर्तीचे मूळ स्वरूप जे परब्रह्म तेहि गुरूच. अशा गुरुरूप परब्रह्मास नमस्कार असो’ हाच ह्या श्लोकाचा अर्थ. दत्तावताराचे रहस्यच ह्या श्लोकात सांगितले आहे. गुरु शिवस्वरूप कसा ? हरिस्वरूप कसा ? ब्रह्मस्वरूप कसा ? त्रिमूत्रिस्वरूप समजावयाचे ? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठीच दत्तावतार झाला आहे. गुरूकडे पहाण्याची दृष्टी कशी असावयास हवी ? हेहि ह्या श्लोकात सांगितले आहेच व त्याचेच स्पष्टीकरण श्रीदत्तात्रेयाने आपल्या अवतारलीलांद्वारे प्रगट केले आहे.

श्रीदत्तात्रेय त्रिमूर्तीचा अवतार होत हे सर्वश्रुत आहे, ह्यात कोणासहि संदेह वाटणार नाही. त्यांची मूर्ति किंवा चित्र पाहताक्षणीच आपल्या शंकेचे निरसन होते. कारण त्यास तीन तोंडे आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश्वराचा अवतार दत्तच होत; हे त्यामुळे ध्यानी येते. श्रीदत्तांच्या ध्यानश्लोकांतच त्यांचे पुढीलप्रमाणे वर्णन आहे. दोन हातांत माला व कमंडलू, दोन हातांत डमरू व त्रिशूल व दोन हातांत मंगलदायी शंख व चक्र आहेत. अशा प्रकारे सहा हात असणाऱ्या व अत्रिमुनींना वरदानस्वरूप असणाऱ्या श्रीदत्तात्रेयांना माझा नमस्कार असो.

दत्तावतार चरित्रात व त्यांच्या दिव्यलीलेत मायामानुषविग्रहात सद्गुरूंची आराधना कशी करावी हेच सांगितले आहे. सद्गुरुस्वरूप नीटपणे लक्षांत येण्यासाठी श्रीदत्तात्रेयांचे दर्शन आवश्यक आहे. वात्सल्यमूर्ति असणारे सद्गुरु त्रिमूर्तिरूप असून आपल्या भक्तांना काय देऊ शकतात ? हे समजावून सांगण्याचे कार्यच दत्तावतारात आहे.

आपण पहात असलेले हे जग सृष्टि, स्थिती, लवानी युक्त आहे. सृष्टि स्थिती अथवा लय हे कांही समजून येत नाहीत. अशा ह्या जगाचे ब्रह्मा, विष्णु, महेश सर्वाधिकारी आहेत. त्यांच्यापेक्षा वरचढ असा इतर कोणीहि नाही. सर्वसाधारणतः सर्व लोक त्रिमूर्तीची आराधना करणारे आढळतात. त्यात कांही वैष्णव असतील, कांही शैव असतील तर काही ब्रह्माची आराधना करणारे असतील. एकंदरीत त्रिमूर्तीशिवाय इतर कोणत्याहि देवतेची आराधना करणारे नाहीत. गणपती, देवी, वगैरेंची उपासना रूढीत असली तरी तेथेहि हीच दृष्टी आढळते. कारण त्वं ब्रह्मा त्वं विष्णुः त्वं रुद्रः’ इत्यादि मंत्रातून त्रिमूर्तीचेच अस्तित्व आढळून येते. श्रुतीतहि ‘तूंच ब्रह्मा, तूंच विष्णू, तूंच रुद्र’ असे त्रिमूर्तीचे वर्णन केले आहे. गुरुपरंपरेत ह्या त्रिमूर्ती व नरदेहधारी सद्गुरु ह्यांच्यात भेद मानिला जात नाही. कारण गुरूच त्रिमूर्ती होत. ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः’ ह्या श्लोकात हाच भाव आहे. तात्पर्य, कोणी कोणतीही उपासना वा गुरूसेवा केली तरी त्या उपास्यदेवता व गुरु त्रिमूर्तीहून भिन्न नाहीत. श्रुति, स्मृति, पुराणे ह्यांतही हीच गोष्ट सांगितली आहे. श्रीदत्तात्रेयांनी हेच तत्त्व आपल्या अवताराद्वारे प्रत्यक्षपणे दाखविले आहे. हेच दत्तावताराचे वैशिष्ट्य होय.

गुरुतत्त्व अतिगहन आहे असे श्रुति स्मृति सांगतात. श्रीसमर्थानी आपल्या दासबोध ग्रंथांत ‘गुरुस्तवन’ ह्या नांवाचा एक समास रचिला आहे. त्याच्या सुरुवातीसच आतां सद्गुरु वर्णवेना । जेथे माया स्पर्शो शकेना । तें स्वरूप मज अज्ञाना । काय कळे ।।’ अशा प्रकारे श्रीसमर्थ ‘श्रीगुरुस्तवन करण्यास माझी मति कुंठित झाली आहे. असे म्हणून सद्गुरु स्तवनास सिद्ध झाले. परंतु ते वर्णन करणे शक्य नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले त्यावेळी ते स्तब्ध झाले. कारण त्या स्वरूपात माया निर्माण न झाल्याने त्यात जग दिसले नाही. मन, वाचा यांचाहि पत्ता लागला नाही. अशा ह्या गुरुस्वरूपाचे वर्णन कसे करावयाचे ? मनास ते अगम्य आहे, वाचाहि कुंठित झाली. ह्या साधनांनी दृश्यमान जगच वर्णिता येईल. पण हे जग नाशिवंत आहे; तर गुरुपद मात्र शाश्वत आहे. अशा शाश्वताचे अशाश्वत अशा दृष्टांतांनी वर्णन करणे कसे शक्य आहे ?

उपाधी कोणाला नाही ? हरि-हर-ब्रह्मा ह्यांच्यामागेहि उपाथी आहेत. सत्वगुणाभिमानी विष्णु जगाचा पालनकर्ता असून तेच त्यावे काम. ब्रह्मा रजोधर्माभिमानी म्हणून उत्पत्ति हेच त्यांचे काम आणि उत्पन्न झालेल्याचा नाश करणे हेच तमोगुणी शिवाचे काम आहे. एकंदरीत ह्या जगाचे आद्यंतनिर्वहन ही त्या तिघांची निरनिराळी कामे होत. पण जग असेतोपर्यंतच ह्यांचे अधिकार, जग नाही तर ह्यांचे अधिकारहि नाहीत. अशावेळी ब्रह्मा, विष्णु, महेश असे कोणास म्हणावे ? श्रीमद्भागवतात प्रलयाचे वर्णन आले आहे. आम्हा मानवांचे आयुष्य शंभर वर्षांचे आहे, तसेच ब्रह्मदेवाचे आयुष्यहि शंभर वर्षाचेच असल्याचे पुराणांतरी सांगितले आहे. परंतु वर्ष गणनेचे प्रमाण मात्र भिन्न भिन्न आहे.

‘चतुर्युगसहस्राणि ब्रह्मणो दिनमुच्यते ।’ मानवी हजार चतुर्युगे म्हणजे ब्रह्माचा एक दिवस रात्रहि तशीच. ह्याप्रमाणे ब्रह्माचे शंभर वर्षांचे आयुष्य आहे. ह्यानंतर एक ब्रह्मप्रलय होतो. ह्या ब्रह्माचे संपूर्ण आयुष्य म्हणजे विष्णूची एक घटका. अशा रीतीने कालगणना करून शंभर वर्षे पुरी झाली म्हणजेच ते विष्णूचे आयुर्मान व त्यावेळी विष्णुप्रलय होतो. अशा प्रकारे शिवाचाहि प्रलय होत असतो. हा शिवप्रलयाचा काल शक्तीची अर्धघटका होय; असे वर्णन आहे. एकंदरीत निर्माण झालेल्या वस्तूस नाश टळत नाही. अशा दृष्टीने ह्या त्रिमूर्तीनाही आपापली कार्ये संपविण्याची वेळ येतेच. त्याचाच अर्थ त्यांनाही नाश आहे. आत्मदृष्ट्या त्यांना मरण नाही. कारण आत्म्याला मरण नाही. बाह्य दृश्यवस्तू ह्या सर्व नाशवंतच, तात्त्विक दृष्टीने त्रिमूर्ती अविनाशीच. पण त्यांचे ब्रह्मा, विष्णु, ईश्वर हे स्वरूप मात्र नष्ट होणारे आहे. त्यांची उपाधी नष्ट झाल्यावर ‘गुरु शब्दाने प्रतीत होणारी वस्तू मात्र शाश्वत आहे हे लक्षात आणूनच ‘गुरु हे ब्रह्मा, विष्णु, महेश व साक्षात परब्रह्म आहेत’ असे वर्णिले आहे. ह्यावरून निरूपाधिक ब्रह्मचैतन्यच ‘गुरु’ शब्दाने प्रतीत होत नाही काय ? ‘अक्षरं ब्रह्मपरम् ।’ हेच गुरूंचे स्वरूप. शब्दव्युत्पत्तीच्या दृष्टीनेहि दोन्ही एकच आहेत. ‘ब्रह्मत्वात् ब्रह्म । गौरवात् गुरुः ।’ विशेषणरहित व मोजमापरहित महान् ‘सवस्तु’ ह्यासच ‘ब्रह्म’ ‘गुरु’ अशा एकाच अर्थाचे दोन शब्द रूढ आहेत. ते इतक्या महत्त्वाचे असल्याने त्या वस्तूंचे यथार्थ ज्ञान अल्पज्ञ मानवाच्या अल्पबुद्धीला समजणे कठीण आहे. मन व वाणी. अनंत विशाल नसलेल्या सोपाधिक रूपास ओळखू शकतात. मनास गुरूच्या यथार्थ स्वरूपाची कल्पना अगम्य असल्याने थोडीबहुत कल्पना येण्यासाठी म्हणून ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः ।’ असे त्रिमूर्तीच्या साम्याचे वर्णन करून शेवटी ‘गुरुः साक्षात परब्रह्म ।’ गुरूच ब्रह्मचैतन्य होय असे ह्या श्लोकात सांगितले आहे. अर्थात परब्रह्मस्वरूपच गुरु असे असल्याने गुरूंची आराधना श्रेष्ठतर होय. त्यामुळे त्रिमूर्तीचीहि आराधना आपोआप होऊ शकते. हे तत्त्व उलगडून सांगण्यासाठीच श्रीदत्तात्रेयांचा अवतार आहे. इतकेच नव्हे तर उपाधिरहित विशिष्ट असे जे रूप ते गुरूच होत. गुरुतत्व किती गहन आहे ते पहा.

गुरुस्वरूपाचे वर्णन नेति नेति श्रुतिब्रूते तस्य नेति नेतित्यादेशः प्रवचनेन प्रोवाच ।’ दृष्टीसमोर किंवा मनोबुद्धीच्या समोर कोणतेहि स्वरूप आल्यास ‘नेति नेति’ हे नव्हे, हे नके हा गुरुस्वरूप निर्णयासाठी सल्ला आहे. सद्गुरूंचे खरे स्वरूप पूर्णपणे लक्षात आल्यास त्याचे वर्णन वाचा करू शकत नाही. ती बंदच होते. योगवासिष्टांत श्रीरामप्रभु वसिष्ठांपासून ज्ञानमार्गाचा उपदेश मिळवते झाले अशी कथा आहे. त्या संदर्भात वसिष्ठांना ब्रह्माच्या स्वरूपाबद्दल श्रीरामांनी प्रश्न केला. त्यावेळी वसिष्ठमुनी स्तब्ध राहिले. त्यावेळी ‘मौन’ हेच श्रीरामप्रभूंच्या प्रश्नाचे उत्तर होते. ब्रह्मासंबंधी शेवटचे वाक्य म्हणजे मौनच आणि तेच गुरूंचे स्वरूप. ह्यासंबंधी ‘यतो वाचो निवर्तन्ते ।’ असे श्रुतिवचन आहे. त्या स्वरूपाचे वर्णन वाणी करू शकत नाही; त्यास शब्दजाल उपयोगी पडत नाही. वाणी उत्पन्न करणारे मनहि त्या स्वरूपाचे आकलन करू शकत नाही व दाखवूहि शकत नाही. म्हणून मौनानेच ते जाण पाहिजे. आपल्यामध्ये तसा अधिकार आहे अशी धारणा करून घेऊन आग्रहाने श्रुतिमातेस त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास श्रुति ‘नेति नेति’ असे म्हणते. जगात उत्पन्न झालेल्या सर्व वस्तू आपल्या डोळ्यासमोर आणून ब्रह्म किंवा गुरूंचे स्वरूप असे आहे. काय ? असा प्रश्न केल्यास ‘हें नव्हे, हे नव्हे’ हेच श्रुतीचे उत्तर आहे. ह्यासच ‘अतव्यावृत्तिलक्षण’ म्हणतात. श्रेष्ठ वस्तूंचे वर्णन करीत राहिल्यास त्या वस्तूचे श्रेष्ठत्व कमी होत जाते. कारण एखादी लहानशी वस्तू श्रेष्ठ वस्तूत सामावून जाते. संकुचित वाणी, बुद्धीला पटणाऱ्या वस्तूंचे वर्णन करू शकते. ह्या वर्णनातील वस्तूंचे गुणधर्म अत्यंत अल्प आहेत. अशा वस्तूंची व्याख्या करण्यात श्रेष्ठत्व कसे प्राप्त होणार ? म्हणून मौनमूलक अशी गुरूंची व्याख्या होते. मन, वाणी ही विरघळून त्या वस्तूत एकरूप होऊन गंभीर असे मौन उदभवते, त्यासच गुरुत्व किंवा गुरुस्वरूप म्हणता येईल. येथे महत्त्व, गांभीर्य किती आहे ? ह्याचा हिशेब तुम्हीच करू शकतां. अशा गुरूंचा आश्रय निरंतर घेणे आवश्यक आहे. ‘सर्वाधारायेदं गुरुम् ।’ गुरु ह्या शब्दामुळे असा अर्थ होतो कीं, गुरु हे सर्व दृश्य वस्तूंत श्रेष्ठ असे समजून त्यांची सेवा केली पाहिजे. गुरूंपेक्षा श्रेष्ठ अशी एकतरी वस्तू आहे काय ? जगातील कोणतीहि वस्तु गुरूंची बरोबरी करू शकणार नाही म्हणूनच ‘दृष्टान्तो नैव दृष्टः त्रिभुवनजठरे सगुरो ।’ असें आचार्य म्हणतात. ‘त्रिलोकांत शोधून शेवटी हताश होऊन ज्ञानदात्या सद्गुरूसाठी योग्य असा दृष्टांत मला सापडला नाही.’ असा ह्याचा अर्थ आहे.

I गुरु आराधना क्रम सोपा आहे असे आपण समजतो. गुर्वाज्ञापालन हे शिष्याचे मुख्य लक्षण होय. श्रीसमर्थांनीहि ‘सद्गुरुआज्ञापालन । हेचि सत्शिष्याचे लक्षण ।’ असे म्हटले आहे. भक्ताहून गुरु नेहमीच वेगळा असतो. पण तत्त्वांत भेद असू शकत नाही. हे व्यवस्थितपणे जाणल्यास भक्तहि तत्त्वस्वरूप होऊ शकतो. तत्त्वस्वरूपांत आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अद्वितीयता. जे एकमेव असून त्यांत निराळेपण असू शकत नाही तेंच अद्वितीयस्वरूप होय. त्या स्वरूपाप्रत जाणाराही अद्वितीयच होतो.

युक्ति हेच सांगते. गुरु स्वतः अद्वितीय आहे. त्यास स्वतःच्या रूपाशिवाय इतर कोणतेहि रूप असत नाही. त्याच्या स्वरूपाखेरीज जी इतर सृष्टी आहे तिला माया, दुःख इत्यादि असते. त्यामुळे तिचे भजन केल्यास भक्तास ती काय देऊ शकेल ? ‘क्षुरस्यधारा निशिता दुरत्यया । दुर्गं पथस्तत्कवयो वदन्ति ।’ (कठ. उ.) वेळ व्यर्थ घालवू नये. आयुष्य अत्यंत अनिश्चित आहे. म्हणून अनेक जन्मात केल्या जाणाऱ्या साधनांनी खरे सुख मिळविले पाहिजे. म्हणजेच शक्य तो लवकर सद्गुरूस शरण जाऊन त्यांच्या मुखाने खरे सुख तत्त्व जाणून घेऊन कृतकृत्य झाले पाहिजे. ‘उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः ।’ तत्त्व जाणून तत्त्वस्वरूप जो होतो तोच सद्गुरु. तोच तुम्हांस तात्त्विक सत्यस्वरूप सुख देऊ शकतो.

ह्या जगातील पदार्थ आपणांस प्राप्त करावयाचे आहेत काय ? तसे असल्यास त्यांचे दृश्यस्वरूप घालवूत सत्यस्वरूप शिल्लक ठेवा. जगातील पदार्थांमध्ये जे सुख आहे असे आपण समजतो तें सुख नाहीच. खरे सुख वेगळेच आहे. जे सुख कधीहि, कोणत्याहि कारणाने कमी अधिक होत नाही तेच सत्य सुख होय. पण ते मिळवायचे कसे ? हेच मार्मिकपणे समजवून घेण्यासाठी सद्गुरूस शरण गेले पाहिजे. आर्यपद्धतीनुसार पवित्र वस्तूसह त्यांना शरणागत झाले पाहिजे. ‘उत्तिष्ठत । जाग्रत ।” अज्ञानरूपी झोपेमुळे आपणास जगरूपी स्वप्न दिसते. त्यातील सुखद कल्पनेनुसार कल्पिलेले पदार्थ उत्पन्न करून त्यांचा आपण अनुभव घेतो. परंतु तें खरे सुख नाही. जागृत व ज्ञानी ह्यांची कृपा प्राप्त करून घेऊन एकदां ह्या बाबतीत ‘कुर्याच्छ्रेयसे भूयसे नरः ।” ह्या उक्तिप्रमाणे आपली उन्नती करून घेण्यासाठी गुरुभक्तीच केली पाहिजे. कांही ठिकाणी गुरु शब्दाचा प्रयोग ह्याकरताच केलेला आढळतो. परंतु मुख्यत्वें गुरु हा मोक्षदाताच होय. ‘मोक्षवस्तु परं तत्त्वं यज्ज्ञात्वा परमश्नुते ।। अनेक गुरूंमध्ये मोक्षदाता गुरुच श्रेष्ठ होय. ‘तत्त्वं गृणातीति गुरुः ।’ तत्त्वाचे स्पष्टीकरण करून सांगणारा तोच गुरु, अशी गुरु शब्दाची व्युत्पत्ती आहे. श्रुतींचाहि तोच अभिप्राय आहे. ‘तद्विज्ञानार्थ स गुरुमे वाभिगच्छेत् । समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम् ।’ तत्परिज्ञानासाठी श्रोत्रीय, ब्रह्मनिष्ठ अशा गुरुस शरण गेले पाहिजे, असे म्हटले आहे. ‘तद्विज्ञानार्थं ।’ प्रति क्षणास बदलणान्या ह्या जगाचे यथार्थ स्वरूप कोणते ? रात्रंदिवस सुखासाठी धडपडणाऱ्या मानवाच्या पदरात दुःखच पडते. ह्याला कारण काय ? गुरुकृपेने काय प्राप्त होते ? अद्वितीय असा गुरु आपणास कशाची प्राप्ती करून देईल ? त्यांच्याजवळ देण्यास योग्य अशी जी सत्यवस्तु म्हणजेच स्वतःच सुखस्वरूप हेच नाही काय ? ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणूनच गुरु स्वतः भक्ताच्या रूपांतच एकरूप होतो. त्यानें भक्तास अद्वितीयत्व येते. गुरु स्वतःच्या सत्य स्वरूपाची जाणीव भक्तात उत्पन्न करतो आणि हे तत्त्वस्वरूप अद्वितीय असल्याने ते जाणणाराहि ब्रह्मस्वरूप होतो.

श्रुतिमातेने शिष्यांची लक्षणे सांगितली आहेत. सुरुवातीस त्याने सद्गुरुस शरण गेले पाहिजे. नम्रता व श्रद्धायुक्त अंतःकरणाने गुरूची अद्वितीय सेवा करून गुरूंचा अनुग्रह मिळविला पाहिजे. श्रद्धाभक्तियुक्त सेवेनें तृप्त झाल्यावर गुरुमुखातून आशीर्वाद बाहेर पडतो, त्यालाच अनुग्रह म्हणतात. तो अनुग्रह क्रमाक्रमानें सेवा करणाऱ्या शिष्यासच प्राप्त होतो. पराकाष्ठा हे लक्ष ठेवून त्यागमय सेवा करण्याची बुद्धी बाळगणान्यासव ‘परिज्ञान’ प्राप्त होते. धौम्य व धर्म यांच्या उदाहरणाने ह्याचे स्पष्टिकरण होते. सेवेने संतुष्ट झालेल्या माणसास प्रश्न केल्यास ‘कल्याण होवो’ हेव उत्तर मिळते. ‘मयि ते तेषु चाप्यहम् ।’ सूर्य सर्वाना प्रकाश देतो परंतु सूर्यकांत मात्र त्याचा परिणाम दाखवितो. ‘शिष्यप्रज्ञेव केवला।” गुरुकृपा प्राप्त करून घेण्याचे सामर्थ्य शिष्यातच असू शकते. शिष्याच्या अंतःकरणातील तळमळ त्याच्या वागण्यावरून ओळखून मुमुक्षूची तृषा शांत होण्यासाठी अमृतवाणीचा एकच गुरु शब्द पुरेसा असतो. परंतु त्यासाठी शिष्याजवळ पुष्कळ तपश्चर्या असावी लागते; शांति असावी लागते; चांचल्य व विषयवासना असू नये. तत्त्वजिज्ञासा हवी; मन निश्चल असावे. ममत्वबुद्धी सोडून तत्त्वरूपाकडेच ज्यांची बुद्धी असते अशालाच ‘शांत’ म्हणता येईल.

ब्रह्मनिष्ठ कोणास म्हणावे ? जो विषयराशीकडे आकर्षित होत नाही; त्रिभुवनाचे राज्य पायाशी लोळण घालीत आले तरी त्यासाठी मन थोडेहि विकारी होत नाही; जागतिक वैभवाचे शिखर गांठले तरी ज्याच्या वागण्यात कांहीच फरक होत नाही; असा जो कोणी, त्यालाच ब्रह्मनिष्ठ म्हणता येईल. तो स्वस्वरूपात दंग असतो तो ब्रह्मच होय. ‘आनन्दो ब्रह्मेति व्यजानात् ।’ सुखदुःख, रागद्वेष, ह्यांत भेद न मानणारा तोच गुरु होय. गुरुस्वरूपाची आराधनासुद्धा अशा दृष्टीनेच केली पाहिजे. सद्गुरु म्हणजे निर्दिष्ट अभेद वस्तू. माशांना पाण्याचा आश्रय असतो. तद्वत राजा-रंक, ज्ञानी अज्ञानी, स्त्री-पुरुष ह्यांना सद्गुरु आश्रयदाता असतो. त्याच्या प्रीतिसंपादनास निमित्ताची आवश्यकता नाही. ‘अहेतुना ज्ञानपितारयन्तः ।’ पतितांच्या उद्धारासाठीच सद्गुरु अवतार आहे. तात्पर्य, मंगलरूप, अतिपवित्र असे जे चैतन्य तेच गुरुरूप धारण करते असे समजावे. गुर्वाराधनेनें सर्वाची आराधना होऊ शकते. ह्या रहस्योद्घाटनासाठी दत्तावतार आहे. त्यास ‘अवधूत’ असेहि म्हणतात. ह्या अवधूत शब्दाच्या प्रत्येक अक्षरात विविक्षित अर्थ भारलेला आहे.

‘अक्षरत्वात् वरेण्यत्वात् धूत संसारबन्धनात् तत्त्वमस्यादिलक्ष्यत्वात् अवधूत इतीर्यते ||

गुरुपेक्षा श्रेष्ठ असे ह्या जगात इतर कांहिही नाही. ‘न गुरोरधिकम् न गुरोरधिकम् ।’ असे म्हटले आहे. इहपर सौख्यासाठी, प्रगतीसाठी गुरुची आराधना मुख्यत्वे आवश्यक आहे. तीमुळे सर्व देवता तृप्त होतात. सद्गुरु तत्त्वमस्यादि लक्षणयुक्त आहेत हे सुचविण्यासाठीच ‘दत्त’ हा अवतार आहे.

गुरूविषयी शंका धरू नये. ज्यांनी गुरुपद मिळविले आहे ते गुरुपदास योग्यच असतात. कारण ब्रह्मस्वरूपी विराजमान झालेलेच गुरु होत. अशा गुरूंचीच आपण खात्रीपूर्वक निवड केली पाहिजे. पाणी नेहमी गाळूनच प्यावे लागते. गीता आदि प्रमाण ग्रंथांतून स्थितप्रज्ञांची लक्षणे सांगितली आहेत. ज्यांच्यामध्ये ती लक्षणे आढळतात त्यांनाच गुरु म्हणता येईल. सांसारिक कल्पना किंवा वैषयिक लोभ अशांना स्पर्शाहि करू शकत नाही. तो अखंड सतूचित् सुखरसांचाच आस्वाद घेणारा असतो. ज्यांच्या ठायी उदात्तता असते तो गुरुत्वाप्रत पोहोंचतो. श्रुति मात्र ‘तूच परतत्व आहेस; परंतु तू भ्रमाच्या भोवऱ्यात सापडला आहेस’ असे म्हणते, मूलतः जीव अमूढ असतो पण मायेमुळे तो मूढ बनतो. मात्र त्याचे यथार्थ स्वरूप ब्रह्मच होय. ते अद्वितीय आणि आनंदमय असून ह्या जगतांतील दुःखाशी त्याचा संबंध नाही. हे जग माया, अज्ञान ह्यांच्या आधारावर अवलंबून असलेले दिसते व ते अज्ञान, गुरु नाहीसे करू शकतो. अशा गुरूंच्या ठिकाणी जड भावना, मलीन भावना चिकटवू नका. त्यास त्रिगुणांचा स्पर्शहि नसतो. ‘तत्त्वमसि’ म्हणजे ते ब्रह्मच अविनाशी, आनंदस्वरूप असे स्वस्वरूप आहे असे श्रुतिमाता ज्यांचे वर्णन करते तेच गुरुस्वरूप होय.

ब्रह्मा, विष्णु, महेश आदींची आराधना सोडावी काय ? अशी शंका निर्माण झाल्यास त्यांच्या ठायी गुरुरूप समजून आराधना केल्यास तुम्हास तुमच्या जीवनाचे लक्ष्य असलेला मोक्ष प्राप्त होईल. त्यांची ईश्वरभावनेनें आराधना केल्यास कर्मफल मिळेल. परंतु ईश्वराच्या हातात तराजू आहे. तो न्यायी आहे. त्याची गुरुरूपामध्ये सेवा केल्यास आपणास खचितच अभ्युदय निःश्रेयस ही प्राप्त होतील. गुरूंच्या ठिकाणी शारीरिक दृष्टीने न पाहता जो शरणागतास अभय देतो त्यास आपण शरण गेले पाहिजे. तुम्हां सर्वांस श्रीसद्गुरु दत्तात्रेयांचे आशीर्वाद लाभोत !!

सर्वे जनाः सुखिनो भवन्तु!

home-last-sec-img