Literature

श्री रामेश्वर स्तोत्रम्‌

पूर्वपीठिका:-

श्रीमत् परमपूज्य स्वामीजी श्रीरामेश्वर क्षेत्री गेले असतां केलेले हे स्तोत्र आहे.

दयासिंधुं देवं भवदलनदक्षं श्रुतिनतं।
महाभक्तैर्नित्यं जयजय जयेति स्तुतमजम्।।
स्वभक्तानां मुक्त्यैर्र्धृतसगुणरुपं परशिवं।
भजेSहं रामेशं सुरमुनिगणैः सेवितपदम्।।१।।

श्री रामेश्वर देवाचेंं मी स्तवन करतो (यांत विशेष असे काहींच नाहीं. कारण) मोठे मोठे देव व तपोघन त्यांची सेवा करण्यांंत धन्यता मानितात. (देवांचा महिमाच असा आहे) देव दयेचे सागर आहेत. संसारताप नष्ट करण्याचे बाबतीत त्यांचा हातखंडा आहे. श्रुतिमाऊलींचा सुद्धा असाच अभिप्राय आहे. आपल्या भक्तांना भवचक्रांंतून सोडविण्यासाठी, “अरूप होते ते रुपासी आले.” परमकल्याणमय अशा श्रीरामेश्वर देवांचा, भक्तश्रेष्ठ सदैव जयजयकार करितात.

जगत्कत्र्र्या धात्र्या ह्यतुलनिजशक्त्या विलसितं।
गणेशस्कंदाभ्यां सकलपरिवारेणसहितम्।।
हनूमद्रामाभ्यां निखिलकपियूथैः परिवृतं।
भजेSहं रामेशं सुरमुनिगणैः सेवितपदम्।।२।।

स्वतःच्या अतुलनीय आत्मशक्तीला भिन्नरूप देऊन तिच्या करवींं या जगताची उत्पत्ती व संरक्षण (आपण अलिप्त राहून) करतात; भोवताली परिवारही त्यांच्या वैभवाला साजेसाच आहे. गणपति व कार्तिक स्वामी ही तर देवांची मुलेंंच. तेव्हा त्यांचा सर्व परिवार तेथे असणारच. त्याबरोबर श्रीरामचंद्र व हनुमान हेहि आपल्या वानरसेनेसह तेथे आहेत. (मोठ्यांचे सर्वच मोठे) एवंगुण विशिष्ट अशा श्रीरामेश्वरास मी वंदन करतो.

कलौ प्रायः पापाः परधनवधूसक्तमनसः।
जनिष्यन्ति ज्ञात्वा दशमुखविदारेण गुरुणा।।
क्षयार्थं दुष्टानां निजशुभकरस्थापितविभुं।
भजेSहं रामेशं सुरमुनिगणैः सेवितपदम्।।३।।

श्रीरामेश्वर देवांचे आवाहन व प्रतिष्ठापना करणारी व्यक्तीसुद्धा सामान्य नव्हती. फार दूरवरचा विचार करूनच ही स्थापना झाली आहे. कलियुगात परधन-परदारारत लोक होणार व दुष्ट वृत्तींची वाढ होणार ही कल्पना असल्यामुळे, दशमुख रावणाला एकाच बाणानेंं लोळवणाऱ्या श्रीरामचंद्राच्या समर्थ हातानेंंच याठिकाणी देवांची स्थापना झाली आहे. देवा ! आपण विभू आहांंत. तरीहि सामान्य असा मी तुम्हास वंदन करतो.

स्वभक्तानामिष्टं ह्यमितकरुणार्देण मनसा।
वितन्वन्नास्तेयः सकलभुवि राराजितपदः।।
नयत्तुल्यं किंचित्परमिति च यस्मात्तमभयं।
भजेSहं रामेशं सुरमुनिगणैः सेवितपदम्।।४।।

सकल त्रिभुवनात जिची अखंड आराधना केली जाते अशी ही एकच देवता आहे. तिचे मानससरोवर करुणापूर्ण आहे. भक्तांनी आपल्या इष्ट कामना व्यक्त करण्याचा अवकाश, पुनः कामनाच उत्पन्न होणार नाही इतके ते देतात. “अशा तुज न जो भजे मनुज धिक् तयाचें जिणे !!”.

न चेशानो जीवः स्थिरचर विभानं नच मनः।
न माया नोSविद्या भवति न च यस्मिंस्तमजरम्।।
सुशान्तं चिन्मात्रं निरतिशयसौख्यं निजमहो।
भजेSहं रामेशं सुरमुनिगणैः सेवितपदम्।।५।।

जीव ईशानाची बरोबरी करील काय? आणि मनाची धाव कितीहि असली तरी ते स्थावर जंगमास गवसणी घालूं शकणार नाहीं. जरारहित अशा श्री रामेश्वराच्या ठिकाणी माया किंवा अविद्येचा संभवच नाहीं; देवाचे चिन्मात्र स्वरूप सदैव शांती आणि निरतिशय सौख्य देणारे आहे. देवा आमुचे तुला वंदन असो.

।।इति श्रीमत् परमहंसपरिव्राजकाचार्य सद्गुरु भगवता श्रीधरस्वामिना विरचितं श्रीरामेश्वरस्तोत्रं संपूर्णम्।।

रचना : वैशाख १८६६
स्थळ : श्री रामेश्वर क्षेत्रम्

home-last-sec-img