Literature

श्री विश्वनाथस्तोत्रम्‌

(वसन्ततिलकावृत्तम)

यस्मात्परं न किल चापरमस्ति किंचिद्
ज्यायान्न कोSपि हि तथैव भवेत्कनीयान।।
निष्कम्प एक इति योSव्ययसौख्यसिन्धु-
स्तं विश्वनाथममलं मुनिवन्द्यमीडे।।१।।

ज्याच्याहून खरोखरच कांही श्रेष्ठ नाहीं व कनिष्ठहि नाही, कोणी मोठे नाही व कोणी लहान नाही, जो निस्तरंग एकमेव अव्यय सौख्यसिंधु आहे त्या मुनिवंद्य विमल श्रीविश्वनाथाची मी स्तुती करतों.

रज्वां यथा भ्रमविभासितसर्पभाव:
यस्मिंस्तथैव बत विश्वविभेदभानम्।।
योSज्ञाननाशनविधौ प्रथितस्तोSरि-
स्तं विश्वनाथममलं मुनिवन्द्यमीडे।।२।।

ज्याप्रमाणे दोरीमध्ये भ्रमाने सर्पाचा अभाव दिसतो, त्याचप्रमाणे या विश्वाच्या विविध भेदभानाचा आभासहि केवळ भ्रममात्रच आहे. जो अंधाराचा नाश करणाऱ्या सूर्याप्रमाणे अज्ञाननाशक या नावाने प्रसिद्ध आहे त्या मुनिवंद्य विशुद्ध श्रीविश्वनाथाची मी स्तुती करतो.

यावन्न भक्तिरखिलेश्वरपादपद्मे
संसारसौख्यमिह यत्किल शुक्तिरौप्यम्।।
यद्भक्तिरेव भवरोगनुदा सुधैव
तं विश्वनाथममलं मुनिवन्द्यमीडे।।३।।

जोपर्यंत श्री सर्वेश्वराच्या दिव्य चरणकमलांच्या ठिकाणी पूर्ण भक्ति होत नाही तोपर्यंत शिंपल्याप्रमाणे वाटणाऱ्या चांदीच्या आभासाप्रमाणेच ह्या संसारात मायावशतेने सुखाची प्रतीति होत असते. ज्याची भक्ति भवरोग नष्ट करणारे अमृत आहे त्या मुनिवंद्य परमशुद्ध श्रीविश्वनाथाची मी स्तुती करतो.

यः काममत्तगजगंडविभेदसिंह:
यो विघ्नसर्पभवभीतीनुदो गुरुत्मान्।।
यो दुर्विषह्यभवतापजदु:खचन्द्र:
तं विश्वनाथममलं मुनिवन्द्यमीडे।।४।।

जो कामरूप मत्त हत्तीचें मस्तक विदीर्ण करणारा सिंह आहे, जो विघ्नरूप सर्पापासून उत्त्पन्न होणाऱ्या भयाचा नाश करणारा गरुड आहे, जो संसाराच्या दुःसह तापापासून उत्त्पन्न होणारे दुःख शांत करणारा चंद्र आहे, त्या मुनिवंद्य अतिशुद्ध श्रीविश्वनाथाची मी स्तुती करतो.

वैराग्यभक्तिनवपल्लवकृद्वसन्त:
योभोगवासनावनप्रविदाहदाव:।।
योSधर्मरावणविनाशनहेतुराम:
तं विश्वनाथममलं मुनिवन्द्यमीडे।।५।।

जो वैराग्य आणि भक्तीला नवपल्लवित करणारा वसंत आहे, जो भोगवासनारुपी वनाला दग्ध करणारा दावानल आहे, जो अधर्मरुप रावणाच्या विनाशाला कारण होणारा श्रीराम आहे, त्या मुनिवंद्य नितांत शुद्ध श्रीविश्वनाथाची मी स्तुती करतो.

स्वानन्यभक्तभववारिधिकुम्भजो यः
यो भक्तचञ्चलमनोभ्रमराब्जकल्पः।।
यो भक्तसञ्चितघनप्रविभेदवातः
तं विश्वनाथममलं मुनिवन्द्यमीडे।।६।।

जो आपल्या अनन्य भक्तांच्या संसारसागराला शुष्क करणारा अगस्ति महामुनि आहे, जो आपल्या भक्तांच्या चंचल मनोरुप भ्रमराला मुग्ध करणारे कमलपुष्प आहे, जो भक्तांच्या संचित कर्मरूपी ढगांना पळविणारा प्रचंड झंझावात आहे, त्या मुनिवंद्य महान विशुद्ध श्रीविश्वनाथाची मी स्तुती करतो.

सद्भक्तसद्हृदयपञ्जरग: शुको यः
ॐकारनि:स्वनविलुब्धकर: पिको यः।।
यो भक्तमंदिरकदंबचरो मयूर:
तं विश्वनाथममलं मुनिवन्द्यमीडे।।७।।

जो सदभक्तांच्या हृदयरुपी पिंजऱ्यात राहणारा मनोहर शुकपक्षी आहे, जो आपल्या श्रवणमनोहर ओंकार शब्दांनी विलुब्ध करणारा कोकिळ आहे, जो भक्तांच्या मंदीररूपी कदंब वृक्षावर विहार करणारा मयूरपक्षी आहे, त्या मुनिवंद्य निरवधि शुद्ध श्रीविश्वनाथाची मी स्तुती करतो.

यो भक्तकल्पितदकल्पतरु: प्रसिद्धः
यो भक्तचित्तगतकामधेनुति चोक्त्:।।
यो भक्तचिन्तितददिव्यममणिप्रकल्प:
तं विश्वनाथममलं मुनिवन्द्यमीडे।।८।।

जो भक्तकल्पित इच्छा पूर्ण करणारा प्रसिद्ध कल्पवृक्ष आहे, जो भक्तांची इच्छा पूर्ण करणारी जणू कामधेनू म्हणून ओळखला जातो, जो भक्तांची चिंता, दुःख यांचा नाश करणारा चिंतामणि म्हणून मानला गेला आहे त्या निरुपम शुद्ध श्रीविश्वनाथाची मी स्तुती करतो.

हेमैव यद्वदिह भूषणनाम धत्ते
ब्रह्मैव तद्वदिह शंकरनाम धत्ते।।
योभक्तभावतनुधृक् चिदखण्डरूप:
तं विश्वनाथममलं मुनिवन्द्यमीडे।।९।।

ज्याप्रमाणे सोनेच अलंकाराचे नाव धारण करते त्याप्रमाणेच ब्रह्म भूषणप्राय शंकराचे नाव धारण करीत आहे. जे अखंड चिद्रुपी भगवान भक्तांच्या भावनानुसार देह धारण करतात अशा मुनिवंद्य अद्वितीय शुद्ध श्रीविश्वनाथाची मी स्तुती करतो.

यन्नेति नेति वचनैर्निगमा वदन्ति
यज्जीवविश्वभवशोकभयातिदूरम्।।
सच्चित्सुखाद्वयमिदं मम शुद्धरूपम्
तं विश्वनाथममलं मुनिवन्द्यमीडे।।१०।।

ज्याचे स्वरूप दाखविण्यासाठी प्रवृत्त झालेली श्रुति ‘असे नाहीं’ ‘असे नाहीं’ इतकेच शेवटी सांगू शकली; जो जीव, विश्व, जन्म, शोक, भय इत्यादी पासून पूर्ण विरहित आहे, त्या मुनिवंद्य अतिशय शुद्ध श्रीविश्वनाथाची मी स्तुती करतो.

(अनुष्टुप)

काश्यां यथा विश्वनाथो राराजति विशेषत:।
अस्मिंस्तोत्रे तथैवायं विराजति विशेषत:।।११।।

ज्याप्रमाणे श्रीविश्वनाथ, विशेषतः काशीत विराजमान आहेत त्याप्रमाणे ते विशेषतः या स्तोत्रातही सदैव विराजमान आहेत.

काश्यामेव कृतं स्तोत्रं विश्वनाथस्य पावनम्।
पठेद्भ्यो मॊक्षदं नित्यं काशीव किल सर्वदा।।१२।।

विश्वनाथाचे हे पावन स्तोत्र काशी क्षेत्रातच केलेले आहे. ते काशीक्षेत्राप्रमाणेच पठण करणाऱ्याला सदैव मोक्ष देणारे आहे.

।।इति श्रीसमर्थरामदासानुगृहीत रामपदकञ्जभृङ्गायमान श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य भगवता श्रीश्रीधरस्वामिना विरचितं महाराष्ट्रभाषानुवादसहितं श्रीविश्वनाथस्तोत्रम् सम्पूर्णम्।।

home-last-sec-img