Literature

श्री सद्‌‌गुरुस्तवनःनाम प्रकरणम्‌‌ प्रथमम्‌

(श्री सद्‌‌गुरुस्तुति नामक पाहिले प्रकरण)

सर्वातिशय आनन्दी यस्य देहो स्वयं प्रभः ।
सर्वमंङगलरुपी यः सद्‌‌गुरुं तं भजामहे ।।1।।
अर्थ— ज्यांचा देह अतिशय आनंददायक, स्वयं प्रकाशी (तेजस्वी) असून जे पूर्णप्रकारे पावनकारक, मंगलदायक आहेत अश्या सद्‌‌गुरुंचे मी स्मरण करतो. ।।1।।

संसारवारिधेः पारं नेतुं सेतुर्यं उन्नतः।
तमाश्रयेम नित्यं हि चिदान्नदं गुरुं परम्‌‌।।2।।
अर्थ— संसाररुपी सागर तरुन जाण्यासाठी जे उत्कृष्ट सेतुच आहेत, अश्या परमआनंददायक सद्‌‌गुरुचा मी सतत आश्रय घेतो. ।।2।।

गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णूर्गुरुदेव सदाशिवः।
गुरुविष्टो गुरुर्बन्धुर्गुरुर्माता गुरुः पिता।।3।।
अर्थ— गुरु हेच माता पिता आणि बन्धु आहेत, गुरु हेच ब्रह्मा विष्णु आणि महेश आहेत. (गुरु हे इष्ट इच्छित असे योग्य आहेत)।।3।।

क्षुधितानां सुदिव्यान्नं तृषिनानां सुजीवनम्‌‌।
मुमूर्षूणां सुपीयूषं यस्तं गुरुं भजामहे ।।4।।
अर्थ— भुकेलेल्यांचे सुग्रास अन्न, तान्हेल्यांसाठी उत्तम जल, मोक्षेच्छा असणार्‌यांचे अमृत, अश्या गुरुंचे मी स्तवन करतो. ।।4।।

तृष्णावर्ते भ्राम्यमाणान्‌‌ दीनान्यो भवसागरात्‌‌।
निजानन्दविभौ नित्यं स्थापयेत्तं गुरुं नमः ।।5।।
अर्थ— सुखाच्या इच्छेने व्याकुल होवून जे भवसागरांत गटांगळया खात असतात, दिशाहीन असे भटकत असतात, त्या लोकांना आत्मानंदामध्ये स्थिर करुन दिशा— दर्शन करविणारे जे सद्‌‌गुरु, त्यांना मी नमन करतो. ।।5।।

संसार दावतप्तानां स्वबोधामृत वृष्टिभिः।
संजीवयति नमामस्तं चिदानन्दघनं गुरुम्‌‌ ।।6।।
अर्थ— संसाररुपी दावानलामध्ये होरपळून निघणार्‌या जीवांवर, स्वबोधामृतरुपी आत्मज्ञानाची शीतल वर्षा करणार्‌या, चिदानन्दघन अर्थात्‌‌ अखण्ड आनंदाचे मेघ च अश्या सद् ‌ गुरुनां मी वंदन करतो. ।।6।।

येन दत्तो निजानन्दो मुमुक्षूणां विमुक्तये।
य आनन्दसुधासिन्धुर्ब्रह्म तं सद्‌‌‌गुरुं मुमः।।7।।
अर्थ— ज्यांनी मोक्षाची इच्छा करणार्‌यांना, ह्या जीवनमरणाच्या बंधनापासून सुटका करुन घेण्यासाठी आत्मानन्द प्रदान केला आहे. अश्या आनंदमय अमृताचा समुद्रच, ब्रह्मरुप सद्‌‌गुरुंना मी वंदन करतो. ।।7।।

कामरावणरामो यो हनुमान्‌ब्रह्मचर्यपः।
समर्थ सर्वदृष्ट्या यो नुमस्तं गुरुसत्तमम्‌‌।।8।।
अर्थ— कामरुपी रावणाचा नाश करणार्‌या जणुं श्रीरामच, तसेच ब्रह्मश्चर्याचे पालन करुन सर्व दृष्टीने समर्थ असे जणू हनुमानच, अश्या सद्‌‌गुरुनां मी वंदन करतो. ।।8।।

शिवं भवति यस्मान्नः शङकरो यश्च सर्वतः।
यतो मुक्तावयं स्यामस्तं नमामो गुरुं सदा ।।9।।
अर्थ— ज्यांच्यामुळे आमचे सतत मंगलच होते, जे सदा शुभकर्ताच असे आहेत आणि ज्यांच्यामुळे आम्ही सदा मुक्तिचा आनंदच प्राप्त करतो, त्या सद्‌‌गुरुंना मी वन्दन करतो ।।9।।

देहद्रोण्योपविष्ठांनां संसाराब्धितितीर्षुणाम्‌‌।
ध्रुववद्यो दिशेन्मार्गं तं गुरुं सततं नुमः ।।10।।
अर्थ— देहरुपी कुंडांत अडकलेल्यांना, तसेच संसारसागरांतून तरुन जाण्यास जे निश्चित पावन दिशादर्शक आहेत, त्या गुरुंना मी वंदन करतो।।10।।

माया नारेति सम्प्रोक्ता तस्या आयतनं बृहत्‌‌।
तेन नारायणं यस्तं प्रणमामो गुरुं हृदा।।11।।
अर्थ— मायारुपी जलामध्ये पहुडलेला आणि सीमाहीन असे व्यापकत्व ज्यांचे आहे, म्हणून त्यांस नारायण असे म्हणतात. त्या परमेश्वराचे मी वन्दन करतो. ।।11।।

भवाब्धिरेव मोहाब्धिस्तत्पारयितु मञजसा।
यत्कृपापोतवन्नित्यं शरण्यं तं गुरुं नुमः ।।12।।
अर्थ— संसार सागर म्हणजेच मोहरुपी समुद्र पार करण्यास जो आपल्या नित्य कृपादृष्टिरुपी जहाजाने अचूक तारणकर्ता आहे त्या सद्‌गंरुस मी वंदन करतो.।।12।।

पतन्बिन्दुश्च सिन्धौ स्यात्सिन्धुरेव यथा तथा।
यत्पदे पतिताः शिष्या ब्रह्मैव तं गुरुं नुमः।।13।।
अर्थ— ज्या प्रमाणे समुद्रांत पडल्यानंन्तर जलबिन्दु त्यातच विलीन होवून जातो, त्याप्रमाणे गुरुचरणी आश्रय घेतल्या नंतर शिष्य हा गुरुप्रमाणे ब्रह्मरुपच होतो. ।।13।।

शिष्यसंतापचन्द्रो यः शिष्याज्ञानतमो रविः।
भवकर्पूरवदाहो यस्तं गुरुं सततं नमः ।।14।।
अर्थ— शिष्याच्या संतप्त मनास चन्द्राप्रमाणे शीतलता देणारे, शिष्याच्या अज्ञानरुपी अंधःकाराचा ज्ञानरुपी सूर्याने नाश करणारा, भवसागररुपी बंधनाला कर्पूरा प्रमाणे सर्वांगाने नष्ट करणार्‌या गुरु ला मी वंदन करतो. ।।14।।

काममत्तेभ सिंहो यो मोहाहिगरुडस्तथा।
शिष्यास्यपूर्णचन्द्राब्धिस्तं गुर्रु सततं नमः ।।15।।
अर्थ— कामरुपी हत्तीच्या समोर सिंहच की काय आणि मोहरुपी महासर्पाला गरुडाप्रमाणे भासणारे आणि शिष्याच्या मुखचन्द्राला पाहून ज्ञान प्रदान करण्याच्या इच्छेने उंचबळून भर्ती येणारा समुद्रच की काय, अश्या सद्‌‌गुरुला मी वंदन करतो।।15।।

शिष्यदुःखाब्ध्यगस्तिस्तु भक्तहृत्पद्मषट्‌‌पदः।
शिष्यचकोरचन्द्रो यस्तं गुरुं सततं नुमः।।16।।
अर्थ— शिष्याच्या दुःखरुपी सागराला अगस्ति ऋषिप्रमाणे पिऊन समाप्त करणारा, भक्ताच्या हृदयरुप कमलावर भुंगाप्रमाणे गुंजन करणारा, शिष्यरुपी चकोर पक्ष्यास चंद्राप्रमाणे हवाहवासा वाटणारा , अश्या श्री गुरुला मी सततवंदन करतो. ।।16।।

वैराग्यस्य वसन्तो यो ज्ञानवर्षर्तुरेव हि।
तृप्तेः शरद्‌‌ऋतुर्यस्तं सद्‌‌गुरुं सततं नुमः।।17।।
अर्थ— वैराग्य भावनेवर वसंतरुप, ज्ञानरुपी वर्षाऋुतु आणि तृप्तीसाठी शदरऋुतु प्रमाणे (शांत उज्वल चांदण्याने शरदऋुतुतील चंद्र अत्यंत अल्हाददायक आनंदाचा वर्षाव करतो) त्या प्रमाणे ह्‌या सद्‌‌गुरुला मी सतत वंदन करतो. ।।17।।

ब्रह्मज्ञान सुरम्यं यन्मुक्तिसाधनपादपैः।
सगन्धमोक्षपुष्पैस्तद्‌ गुरुरुपेण राजते ।।18।।
अर्थ— मुक्तिकरिता साधन म्हणजे ब्रह्मज्ञान ! त्या सुरम्यज्ञानाचे हे वृक्षच असे गुरु आणि सुगंधित मोक्षरुपी पुष्पांनी बहरलेले हे वृक्षरुपी गुरु अत्यंत शोभायमान दिसतात. अश्या गुरुला मी वंदन करतो। ।।18।।

उपसाधनरुपा याः लताः संवेष्ट्‌‌य पादपान्‌‌।
पुष्पैः पर्णेश्च नित्यं हि बहुशोभां वितन्वते।।19।।
अर्थ— ज्या प्रमाणे वृक्षांना आपल्या फुलापानांनी वेष्टित करुन, ह्‌या लता त्यांची शोभा द्विगुणित करितात, त्या प्रमाणे उपसाधनांनी गुरु सुशोभित होतात. (गुरुवचन गुरुग्रंथ हे उपसाधन) ।।19।।

जीवन्मुक्तफलानाञच राशयोत्रामृतोपमाः।
इतस्ततश्च वर्तन्ते मुमुक्षूणांकृते सदा ।।20।।
अर्थ— अमृताप्रमाणे अत्यंत शुभफलदायक अश्या जीवनमुक्तीच्या फलांच्या राशि मोक्षाची इच्छा ठेवणारे, यथातथा विराजमान झालेल्या दिसतात. ।।20।।

अतीवसुन्दरोत्रैकः कासारो हृदयङगमः
वर्तते यस्य पानीयं भवरोगविनाशम्‌‌।।21।।
अर्थ— येथे अत्यंत हृदयंगम असे तळे शोभायमान झालेले आहे, ज्याचे नळ हे भवरोगाचे (जन्म मृत्यु च्या चक्रात फिरायचे) विनाशक आहे. ।।21।।

सुवासनासुकल्हारै राजितं यस्य दर्शनम्‌‌।
निष्कामताशिलाभिश्च नेत्रानन्दकरं महत्‌‌।।22।।
अर्थ— शुभवासना आणि हितकारी आशीर्वादांसहित ज्यांचे दर्शन आहे, निष्कामभाव हा शिलेप्रमाणे स्थित आणि पक्का आहे (ते वितरागी आहेत) असे गुरुजी आपल्या नेत्रांना अत्यंत आनंददायक वाटतात ।।22।।

ब्रह्मज्ञानं नामधेय यस्य कर्ण रसायनम्‌‌।
तेनोद्यानमिदं नित्यं तृप्यते शोभतेपि च ।।23।।
अर्थ— ज्या प्रमाणे कानांसाठी अमृत रसायनच असे ज्यांचे ज्ञानामृत वचन आहे, ज्याचे नाव ”ब्रह्मज्ञान” आहे, त्यामुळे हे उद्यान नित्य तृप्ती करुन फारच रमणीय असे वाटते. ।।23।।

सर्व सौन्दर्य सारैका मातैवास्त्यत्र सौख्यदा।
परामर्शकरी सौम्या दैवीसम्पदलङकृता ।।24।।
अर्थ— (श्री गुरु) सर्व सौंदर्याचे सारच अशी सौख्य प्रदान करणारी माताच आहे असे वाटते. दैवी संपत्तीने अलंकृत अशी सौम्य आण सर्वप्रकारचा उपदेश देणारी अशी मार्गदर्शिकाच आहे. ।।24।।

बहुतृप्तिकरा नित्या, शान्तिनाम्नी मनोहरा।
दर्शनादेव साधुभ्यो ज्ञांनवैराग्यदा शुभा ।।25।।
अर्थ— सदा खूप तृप्ती प्रदान करणारी ”शान्ती” नामक मनोहर ज्ञान आणि वैराग्य उत्पन्न करुन (भव सागरांतील माया आणि मोह ह्‌यांपासून वाचवणारी) केवळ संत सज्जनांच्या दर्शनानेच शुभकारी अशी, गुरुमाऊली ची वाणी आहे.।।25।।

शरच्चद्रनिभः स्वच्छः प्रकाशोस्याश्च सर्वतः।
आनन्दयति सर्वेषां सुगन्धश्चाप्यनूपमः ।।26।।
अर्थ— शरद्‌‌ऋतुतील चन्द्र ज्याप्रमाणे सर्वत्र स्वच्छ प्रकाश वितरित करतो त्या प्रमाणे गुरुमाउलीची कृपामय वाणी सर्वत्र सुखमय सुगंधित अनुपमेय असा आनंद प्रसारित करते. ।।26।।

सर्वाः सत्कृतयो नित्यं रुपं धृत्वातिशोभनाः।
परिचरन्ति सर्वत्र मनःशुध्दिं वितन्वते ।।27।।
अर्थ— सर्व सत्कृती या अत्यंत सुशोभित रुप धारण करुन, नित्य मनःशुध्दिकारक सुविचार प्रसारित करितात. ।।27।।

भक्तिश्चात्मानुभूतिश्च तासु मुख्ये समादृते।
मुमुक्षूणां हितार्थाय यततेञ दिवानिशम्‌‌।।28
आत्मानात्मविवेकोत्र सतां मांलिहिते रतः।
नित्यानित्यविचारोपि तेन साकं प्रवर्तते।।29।।
अर्थ— भक्त आणि अनुभूति ह्‌‌या (मनःशुध्दि साठी) विशेष महत्वाच्या आहेत. त्या आत्म—अनात्म—विवेक करण्यांत सतत गुंतलेल्या असतात. रात्रंदिवस त्या मुमुक्षुंच्या हितासाठी प्रयत्न करीत असतात. नित्य शाश्वत्‌‌ आणि अनित्य अशाश्वत ह्‌याचा पण विचार ह्‌या बरोबरच होत असतो. (28—29)

दिव्यात्रस्था हरिद्‌‌वर्णा पावना बहुशर्मदा।
विरक्तिरिति विख्याता मुमुक्षाप्रसवैकभूः।।30।।
अर्थ— ह्या स्थळी अत्यंत तेजस्वी हरिद्‌‌वर्णा (हिरवा आणि सोनेरी रंगाची) पवित्र अत्यंत सुखदायक अशी विरक्ती नामक धरा (जमीन) मुमुक्षु (वितरागी, निर्मोही) रत्नानां प्रसवते.

अतीव शोभमाना सा समाधान तृणाङकुरैः।
आत्मानन्द विधात्री च मृदुस्पर्शा हितावहा.।।31।।
अर्थ— समाधानरुपी तृणांकुरांनी अतीव नटलेली अतीव सुखावह शुभफलदायी अशी आत्मानंद रुपी देवता विराजित असते. ।।31।।

सुसौम्यवृत्तयः सर्वौः कुरङम्वाश्च समन्ततः।
स्वाद्यन्त्यो विचरन्तीह सुकोमलतृणाङकुरान्‌‌।।32।।
अर्थ— सुसौम्य वृत्ती अर्थात्‌‌ सत्वगुणी अशा हरिणशावकांचे येथे अर्थात्‌‌ मुमुक्षु जनांचे आपल्या (स्वाद्यन्त अर्थात स्व+आदि+अंत ह्‌या वेदान्त) विचारांमध्ये बागडणे चालु असते. ।।32।।

किमप्यपूर्व सौन्दर्य मयूरा निजनर्तनैः।
विचरन्तीह ये प्रोक्ता सद्‌‌भावा मोक्षमार्गिणाम्‌‌।।33।।
अर्थ— मोक्षमार्गी अर्थात वितरागी वेदान्त अभ्यासू जनांचे सुविचाररुप मयूर येथे अत्यंत अपूर्व सौंदर्याने नटून नर्तन करीत असतात. ।।33।।

श्रुतयः कोकिलारुपैर्गायन्ति बहुसुस्वरम्‌‌।
तत्वमसीति वाक्यं तत्स्मारयन्त्येवमेव हि ।।34।।
अर्थ— श्रुति अर्थात वेदशास्त्ररुपी कोकिळा अति मधुर स्वरामध्यें गायन करीत असतात. त्यांत ”तत्‌‌ त्वं असि” ह्‌‌या मधुर वाक्याचे त्या सतत स्मरण करवीत असतात. त्याचे स्मारक भजन आळवीत असतात.।।34।।

सत्सङकल्प शुकानां यदागतानाञय स्वागतम्‌‌।
हर्षो विवर्धयन्नास्ते मृदुकर्णामृतं मधु ।।35।।
अर्थ— येथे येणार्‌‌या सत्‌‌संकल्परुपी शुकांचे (पोपटाचे) अर्थात वेदज्ञानेच्छुजनांचे त्या कोकिळा आपल्या सुमधुर कर्णामृताच्या कुकजनाने अत्यंत हर्ष व उल्हासाने त्यांचे स्वागत करीत असतात. ।।35।।

षड्‌‌गुणैश्वर्यसम्पन्नश्चेश्वरी ह्यस्य चालकः।
येनैव सर्वसौकर्य प्राप्नुवन्ति मुमुक्षुवः।।36।।
अर्थ— षड्‌‌गुणांनी युक्त (यश श्री ज्ञान वैराग्य सामर्थ्य औदार्य) ह्यांनी युक्त असा परमेश्वरच ह्यांना चालक आहे. (येनैव—त्याच्या मुळेच भगवत्‌‌ कृपा लेशात वा इति. नारद भक्ति सूत्र) सर्व मुमुक्षूजन आपले कार्य सुलभ रीतिने करितात. ।।36।।

शमदमावुभावत्र सूद्यानद्वारि तिष्टतः।
ययो प्रसादतोन्तः स्यात्प्रवेशः सुमुमुक्षुणाम्‌‌।।37।।
अर्थ— ह्या अत्यंत पवित्र अश्या उद्यानच्या दारामध्ये ”शम” आणि ”दम” हे दोन नियंत्रक उभे असतात. ह्यांच्या संतुष्टीकरणा नन्तरच आंत ह्या उद्यानांत प्रवेश मिळतो. ।।37।।

श्रध्दाकार्यलयस्यान्तर्भवेत्‌‌ प्रथमदर्शनम्‌‌।
म्ुामुक्षुरत्र गत्वैव पुरः सरति तत्ववित्‌‌ ।।38।।
अर्थ— श्रध्दा ठेवण्या विषयी निःशंक झाल्यावरच प्रथम दर्शनी स्थिर बुध्दि होवून तत्वज्ञानी पुढे पाऊल टाकतो. त्याला भक्ति प्राप्तीचा प्रसाद प्राप्त होवूनच पुढे प्रवेश मिळतो. ।।38।।

अत्र कार्यालये सुप्यग्‌ तितिक्षैका परीक्षिका।
तस्याः परीक्षणादूर्ध्व भगिनीवोपरतिर्हि सा ।।39।।
अर्थ— ह्या कार्यालयांत तितिक्षा नावाची एक परिक्षीका आहे. त्या परिक्षीके नन्तर तिचीच एक भगिनी ”उपरति” ही आहे. ।।39।।

उपसर्प्य मुमुक्षुं तं प्रेम्णा मधुरया गिरा।
समाश्वास्य हितोक्त्यैव कारयेच्छान्ति दर्शनम्‌‌।।40।।
अर्थ— ह्या परिक्षिके मधुन पुढे सरकल्यानंतर मुमुक्षुला आपल्या पे्रमळ वाणीने हितकारी कल्याणकारी अश्या आपल्या वचनांनी आश्वासन देवून शान्ति देवता आपले दर्शन देते. ।।40।।

गुरुभक्तेः कुटीराणि सुरम्याणि समन्ततः।
मुमुक्षुणां कृते यत्र चिनानन्दायते मनः ।।41।।
अर्थ— त्याच्या आसमंतांत अत्यंत रम्य असे गुरुभक्तिरुपी आश्रम मुक्ति प्राप्तेच्छु (मुमुक्षु) जनांच्या मनाला शाश्वत आनन्द प्राप्त करवून देतात. ।।41।।

ब्र्रह्मानन्दप्रकाशोत्र सर्वत्र समवस्थितः।
येनात्र परिवर्तर्न्ते शरीराणि मुमुक्षुणाम्‌‌।।42।।
अर्थ— ब्रह्मानन्दाचा प्रकाश येथे सर्वत्र पसरलेला असतो. तो आनंद मुमुक्षू जनांच्या शरीरांत परिवर्तित होतो. ||42||

धन्या मुमुक्षुवो येत्र स्वेच्छयैव वसन्ति ते।
अनन्तानन्दसम्प्राप्तावर्हा भाग्यैकशालिनः।।43।।
अर्थ— ते मुमुक्षु जन धन्य आहेत की जे येथे स्वेच्छेने परिभ्रमण करतात. त्यांची अखण्ड आनंद प्राप्त करण्याची योग्यता असते. ते अत्यंत भाग्यशाली असतात.

गौरवत्वात्‌‌ गुरुश्चापि बृहत्वात्‌‌ ब्रह्मचेति वा।
अञचतिं काशते नित्यं किमप्यात्मेति श्रूयते।।44।।
अर्थ— गुरुत्वामुळे अर्थात्‌‌ मोठेपणामुळे जे आहे ते गुरु म्हटले जात. ब्रह्मत्वामुळे जे आहे ते ब्रह्म म्हटले जात. आणि सत्‌कार केले जाते (अंचति) सत्‌‌रुपाने असते, तसेच जे प्रकाशित होते ते ”आत्मतत्व” आहे. ।।44।।

सदानन्दघनं स्वच्छमवाङमानसगोचरम्‌‌।
वयं मुमुक्षवः सर्वे तत्साक्षात्कर्तुमुद्यताः ।।45।।
अर्थ— आम्ही सर्वे मुमुक्षुजन त्या निर्मल शाश्वत नित्य आनंदाच्या जे की वाणी आणि मन ह्‌यापासून अनिवर्चनीय आहे. त्याच्या आकलनकक्षे बाहेर आहोत. त्याचा साक्षात्कार करवून घेण्यास उद्युक्त आहोत. ।।45।।

ब्रह्मज्ञानं विरक्तिर्यद्‌‌ ब्रह्मानुभवकारणम्‌‌।
अस्माभिस्तद्विचेारोत्र क्र्रियते बालभाषया।।46।।
अर्थ— त्या ब्रह्मतत्वाचा अनुभव होण्यास ब्रह्मज्ञान आणि विरक्ति हे आवश्यक तत्व कारणीभूत आहेत. त्याचा आम्ही ह्‌या बाळ भाषेत (अपरिपक्व) भाषेत समजण्याचा दुर्बल प्रयत्न केला आहे.

इति श्रीसमर्थरामदासासानुगृहित श्रीरामपदपंङ्‌‌कजभृङगायमान श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवता श्री श्रीधरस्वामिना विरचिते मुमुक्षुसखः ग्रन्थे श्रीसद्‌‌गुरुस्तवः नाम प्रथम प्रकरणं सम्पूर्णम्‌‌।

home-last-sec-img