Literature

सद्यःकालीन दुःस्थिति

रोगाची साथ म्हणून जशी येते त्याप्रमाणे अलीकडे कामाची सांथ आली आहे असे वाटतें. सांथीप्रमाणेच तिचें उच्चाटण करण्याची औषधेहि प्रचारांत आणली पाहिजेत. याचे मुख्य कारण म्हणजे मुलीचा हद्दीच्या बाहेरचा प्रौढ विवाह ऋतुमती झाल्या नंतर मुलींना अविवाहित ठेवणें वरें नव्हे, तें धोक्याचेच आहे. वृषलीहे नांव देऊन पुढच्या धोक्याची सूचना पालकांना धर्म शास्त्राने देऊन ठेवली आहे. समाजाचा काही ठिकाणी जो अगदी विचका झाला आहे, तो या शारदा बिलाने, जर लौकर मुलीचे लग्न केले नाही तर काही अपवाद सोडून काम त्यांना न आवरतां त्या ‘पुमानित्येव भुञ्जते।‘

जात, गोत, तरुण, म्हातारा, सुंदर, कुरूप कसलाहि विचार न करता नुसत्या पुरुषत्वाचाच विचार करून कोणाशींहि रत होतात, असे सांगितले आहे. (मनु. ९-१४) मी सांगावें असे नाही. डोळसांना समाजात काय चालले आहे ते दिसतेच. समाजाची फार शोचनीय स्थिति आहे. माझ्या कानांवर आतापर्यंत आलेले झाले. इतःपर अशा गोष्टी घडुहि नयेत आणि माझ्या कानावर येऊहि नयेत म्हणून त्या दयामय धर्मप्रभु श्रीरामचरणी माझी प्रार्थना आहे. बिल १४ वर्षाच्या

वयाचा प्रतिबंध घालीत असले, तर पालकांकडून २५-३० वर्षा पर्यत हि लग्न केले जात नाहीं. मुलगी बी. ए., एम्. ए. व्हावी म्हणून काळ घालवितात. काहींना द्रव्याचे अनानुकूल्य असते. द्रव्याचे अनानुकूल्य आहे अशांना माझ्याकडे आल्यानंतर थोडाहि वेळ न घालवितां, पैसे नसले तरी कर्जाऊ घेऊन तत्काळ दिले आहेत. या बाबतीत माझे अंतःकरण अगदी होरपळून निघाले आहे. मुलांनाहि मुलगी बी. ए., एम्. ए. च असावी लागते. हुंड्याचीहि एक घातुक चाल आहेच.

थोडी सूट दिली की, शेवटल्या थराला जाऊन पोहोचणे हा समाजाचा एक स्वभाव आहे. परस्परावलंबी ऐहिक पारलौकिक हित समाजाला कायदे करून साधून देण्याची जबाबदारी राज्य धुरा वाहणाऱ्यांवर प्रजेच्या पित्याच्या नात्याने येऊन पड़ते हे सरकारनें खरोखरी ओळखले आहे काय ? ओळखले असेल तर अजून तिकडे त्याने आपले लक्ष विशेष पुरवावें. आधीच उल्हास’; त्यांतून फाल्गुनमासम्हटल्याप्रमाणे एकत्र शिक्षण, एकत्र नोकरी, त्यांतूनहि आगीत तेल ओतल्याप्रमाणे विवाहाचे इतर कायदे कसलाहि निर्बंध नाहीं. आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला ‘हा श्लोक येथे संबंध आठवतो. सध्या यद्वा तद्वा भविष्यति असे झाले आहे. कंदर्पदर्पदमने विरला मनुष्याः । कामाच्या उद्दाम दर्पाचे दमन करणारी माणसे विरळ, असे राजा भर्तृहरीचे वचन आहे. आढळून आलेल्या काही उदाहरणांवरून सांगावयाचे झाले तर भाऊ-बहीण यासारख्या शुद्ध भावनेतूनच प्रथम प्रथम या युवकयुवतिच्या प्रेमाचा उगम  झाला असला तरी पुढे पुढे कालमानाप्रमाणे व निसर्गाने दुष्ट कल्पनांचे नाले  त्या प्रवाहाला मिळून त्याचे विकृत रूप भ्रष्ट करण्यांत आणि भ्रष्ट होण्यात परिणाम पावलेले आढळून आले आहे.

अग्निकुंडसमा नारी घृतकुंभसमो नरः । संसर्गेण विलीयेत तस्मात्तां परिवर्जयेत् ॥

असें अवधूतगीतेंत श्रीदत्तांनीच सांगितले आहे. स्त्री ही अग्निकुंडासारखी आणि पुरुष हा घृतकुंभासारखा असल्यामुळे केवळ सान्निध्यानेच पाघळणे संभवनीय आहे. त्यामुळे सानिध्य टाळावे.

सर्वांचेच अधिकार सारखे नसतात. नियम हे सर्वसाधारण माणसांच्या धोरणानें आंखलेले असतात; एकच नियम सर्वांना लागू पडत नाहीं. पुर्वार्जिताप्रमाणे स्वभाववैचित्र्य असते. उत्तम जरी असला तरी एक आचार सर्वाच्या पथ्यी पडत नाही. न हि सर्वहितः कश्चित् आचारः संप्रवर्तते । सर्वांच्याच भूमिका एक सारख्या नसल्यामुळे त्या त्या भूमिकेच्या माणसांनाहि मार्गदर्शन होण्याकरिता निरनिराळा उपाय सांगून ठेवावा लागतो, निरनिराळे पण शास्त्रीयच आचार सांगावे लागतात.

तत्त्वज्ञान अखंड, एक, आनंदस्वरूप बघण्यास सांगत असता ” त्याच्याशी करावयाचेंच काय, असे जर कोणी म्हणेल, तर तें अगदी बरोबर आहे आणि त्याच निष्ठेची आम्हांला अपेक्षा आहे. विमानाने जाणाऱ्याला जमिनीवरच्या रस्त्याची माहिती घेऊन करावयाचे काय आणि त्याला ती माहिती देतो तरी कोण ? तितकी साधनसंपत्ति नसतांना त्यांना अशी हीं विघ्ने आड येऊ नयेत आणि त्यांत ते बेसावध राहून फसू नयेत, या दृष्टीने सांगून ठेवावयाचे. विघ्ने यावीत अशी अपेक्षा नाही आणि प्रत्येकाला तशी येतात असेंहि नाहीं. समाज रोगी व्हावा म्हणून औषधे करावयाची नसतात. रोग झालेल्यांच्या उपयोगार्थ म्हणून ती असतात. खडकाळ प्रांतांतून जाणाऱ्याला ठेच लागली तर घाणेरीच्या अथवा एकदांडीच्या पाल्याचा रस पीळला म्हणजे रक्त थांबतें म्हणून सांगून ठेवावयाचे. वेळी उपयोग झाला तर झाला; तशी वेळ आली नाही तर कोण तो पाला पाहावयाला जातो ? प्रयोजनमनुद्दिश्य न मन्दोऽपि प्रवर्तते। प्रयोजन आहे असे वाटल्यास प्रवृत्ति, नाहीं तर निवृत्ति. स्वेतर पदार्थातून असणारी प्रयोजन दृष्टि घालवून स्वमात्र आनंदरूपानें असणें ही आत्मनिष्ठा. यानें अनंत आनंदरूप स्वतःच होतो. आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्य वैरिणः । (भ.गी. ३-३९) कामक्रोध ज्ञान्यांचेहि वैरी आहेत. असें भगवंताच्याच मुखांतून आल्यानंतर इतरांचे तर ते आहेतच आहेत. हें कैमुतिकन्यायाने सहज सिद्ध होते. या प्रतिपक्षाचे सामर्थ्य ओळखून याला जिंकण्याकरितां यांच्या दसपट अशी जय्यत तयारी आपली पाहिजे की, आपल्याला पाहिल्याबरोबर याची गाळण उडून जावी; मग पुढे यावयाला कशाला धजेल बिचारा काम !

home-last-sec-img