Literature

समाजशास्त्राचे कांही नियम

कच्चिन्मुख्या महत्स्वेव मध्यमेषु च मध्यमाः 

जघन्याश्च जघन्येषु भृत्यास्ते तत्र योजिताः ||२५||( अ. स. १००)

-त्यांच्या त्यांच्या जातिकुलशील आणि विद्वत्तेच्या योगानें उत्तम, मध्यम व कनिष्ठ असणाऱ्या त्या त्या सेवक जनांना त्यांच्या त्यांच्या योग्यते प्रमाणे त्यांना त्यांना अनुरूप असणाऱ्या त्या त्या उत्तम, मध्यम व कनिष्ठ कार्यामध्ये त्यांची त्यांची बिनबोभाट नेमणूक करतोस ना, भरता ! म्हणून श्रीरामानें विचारले आहे. या ठिकाणी समाजशास्त्राचा एक सिद्धांत प्रगट झाला आहे. शीलभ्रष्ट किंवा हीन जातीच्या माणसाला अधिकारपद दिलें असतां तो सज्जनांचे व उच्च वर्णियांचे आचारविचार नीतिनियम मुद्दाम बिघडवितो. त्याची मर्जी संपादण्याकरितां कांहीं मुद्दामच त्याच्याप्रमाणेच वागू लागतात. जो म्हणून त्याला विरोध करतो त्याचा तो डावच धरतो. अधिकाराचा दुरुपयोग करून बळजबरीने त्याला बिघडविल्याशिवाय तो राहात नाही. असेंच अधिक प्रमाणांत होऊं लागलें म्हणजे क्रमशः उच्च आदर्शाचा उच्च वर्ण व सज्जनांचे अनुकरणीय दिव्य आचरण राष्ट्रांतून नष्ट होण्याच्या मार्गाला लागते. समाजांतील नीतीचाच नाश होऊं लागल्यामुळे त्या राष्ट्राला सर्वतोपरी उतरती कळा लागते. उच्च संस्काराच्या श्रेष्ठ माणसांना आपल्या सारखेच सर्वांनीं व्हावें म्हणून जसें वाटतें तसेंच हीन संस्काराच्या कनिष्ठ माणसांनाहि पण आपल्यासारखेच सर्वांनी व्हावे असे वाटत असतें. त्यामुळे राष्ट्राची उन्नति व्हावी असे इच्छिणाऱ्या राष्ट्रचालकांनी अधिकारीवर्गाची.नेमणूक फारच खोल विचाराने करावी. अधिकाराचीं पदें श्रेष्टांना मिळाली म्हणजे तदनुषंगानें सबंध राष्ट्रच श्रेष्ठ बनतें, समाजाचा उत्कर्ष होतो. उच्च अधिकारीवर्ग आपल्या संस्काराप्रमाणे कायदे बनवतो व सबंध राष्ट्र आपल्याकडे ओढतो. उंच घरांत खुजा मनुष्य वाटेल तसा फिरला तरी त्याच्या डोक्याला लागत नाहीं. याच्या उलट खुजा घरांत मात्र उंच नी धिप्पाड माणूस वावरूं शकत नाहीं हें लक्षांत ठेवावें. अधिकार पाहून कार्य सोपवावें, मोठ्यामध्यें लहानांचा समावेश होतो, पण लहानांत मात्र मोठ्यांचा समावेश होत नाही. अशक्तांना खांद्यावर घेऊन चढून जाणाराहि समाजांत लागतो. सर्वच अशक्त बनून भागत नाहीं. मनुष्य हा अनुकरणप्रिय आहे. वरच्या माणसाला पाहून खालचा माणूस वर जाऊं लागतो. माणसापुढे केव्हांहि उच्च आदर्श असावा लागतो. विहिरीतून काढणारा विहिरीवरच असावयाला पाहिजे. विहिरींतल्या माणसांबरोबर राहून त्यांना काढतां येणें कसें शक्य होईल ? आड आलेल्यांना बाजूला सारूनच पुढे जावे लागतें. बांडगुळांचा नाश केला नाहीं तरी झाडच वाळून जाते. कीड नाहींशी केली नाही तर पीकच हाती लागत नाही. औषध देऊन रोग घालवावाच लागतो. अनिष्टाची निवृत्ति करून इष्टाची जोपासना करणे हा जगण्याचा उपाय आहे. वाईटाचा नाश करून ‘ चांगलें’ प्रयत्नानें बाढवावे लागतें. बिना मशागत वाढलेल्या निवडुंग, शेर, लाजाळू इत्यादि पिकांची नासाडी करून जमिनीस हिणकस करणाऱ्या या झाडा झुडपांना पार मुळासहित उपटून टाकूनच खत घालून पीक वाढवावे लागते. चांगल्या पिकाची वाढ करण्याकरितां मात्र कुंपणाची आवश्यकता असते. पीक नष्ट करणाऱ्या लाजाळूस मात्र त्याची कांही जरुरी नसते. वाईट आपोआप वाढतें व चांगले प्रयत्नाने वाढवावे लागते. वाचकांना इथे  दया तिचे नांव भूतांचें पाळण । आणि निर्दळण कंटकांचे । या तुकारामांच्या उक्तींचें सहज स्मरण होईल. मागासलेल्यांनी दिव्य जीवनाच्या लोकांकडे धांव घ्यावी व दिव्य जीवनाच्या लोकांनी त्यांना हळुहळू आपल्यासारखे करावें. रोगट हवेच्या दुर्गंधी व घाणेरड्या प्रदेशांत राहून सर्वचैत्र उबगलेल्या रोगी माणसांची दया येऊन जर त्यांच्या बरोबरच राहू लागलें तर त्या निरोगी माणसांचीहि स्थिति त्यांच्यासारखींच होईल, यांत संशय नाहीं. खरोखरीच त्यांचे हित करावयाचे असेल तर त्यांच्याबरोबर स्वतः न राहातां त्यांनाच तिथून काढून उत्कृष्ट हवेच्या, अनेक पुण्यपुष्पांच्या सुगंधानें दरवळून राहिलेल्या सुंदर उद्यानांनी सुशोभित अशा परम रमणीय व परमपवित्र असणाऱ्या आपल्या उत्तम हवा पाण्याच्या निरोगी प्रदेशांत नेऊन जसें तिथेच ठेऊन घ्यावें लागेल, त्याप्रमाणेच मागासलेल्या लोकांची दया येऊन त्यांच्यांत मिळून मिसळून आपणहि त्यांच्या पंक्तींत बसण्यापेक्षां त्यांना त्या स्थितीतून वर काढण्याकरितां आपल्या अबाधित दिव्य आचरणाचे धडे त्यांना शिकवीत शिकवीत त्यांच्या प्रगतिपर जीवना करितां सर्वथैव झटणें हेंच त्यांच्या अधिक हिताचे ठरेल. एकाच प्रवाहांत सांपडून दोघांनीहि प्राण देण्यांत काय अर्थ आहे ? सांसर्गिक स्पर्श-रोग्याची प्रकृति आपल्याला तो रोग न लावून घेतांच सुधारली पाहिजे, हें वैद्यानें विसरतां कामा नये. सूर्य जसा डबक्यांतलें पाणी शोषून घेऊन पवित्र पाण्याचा पाऊस, पाडतो त्याप्रमाणेच पवित्र माणसांनी मागसलेल्यांचे दुर्गुण घालवून आपल्या दिव्य पवित्र आचरणांचे भरपूर धडे त्यांना द्यावेत. दूरचा प्रवास जसा अनेक टप्प्यांनी पूर्ण होतो त्याप्रमाणेच अनेक जन्मांच्या परिश्रमांनी जीवांना पुढे यावे लागते.

मागासलेल्यांना श्रेष्ठांनी पुढे सरसावण्यास प्रोत्साहन देणें, साहाय्य करणे योग्यच आहे. पुढे गेलेल्यांचा आदर्श मार्गे राहिलेल्यांसाठी असावा. चढत्यांचे पाय खाली ओढू नयेत. प्रगतीच्या शिखरावर पोहोचण्याकरितां मानवांची मोठी यात्राच निघाली आहे. कांहींनीं तें स्थळ गांठलेले असते तर कांहीं जवळ पोहोचलेले असतात. कांहीं मध्ये असतात तर कांहीं चढून थोडे वर आलेले असतात. कांहींनी चढण्यास सुरुवात केलेली असते, तर कांहीं अजून त्या विचारांत असतात. पुढे आलेल्यांनी मागासलेल्यांच्या बरोबरच चाललें पाहिजे असा आग्रह धरणें, तशी त्यांच्यावर बळजबरी करणें मात्र अनुचित आहे. तसें करणें श्रेयस्कर ठरणार नाही. उच्च आदर्श डोळ्यापुढें ठेऊन श्रेष्टांच्या सेवेनें कनिष्ठ श्रेष्ठ बनतात. म्हणून श्रेष्ठांच्या सेवेला कनिष्ठ लावणे योग्य होईल. तो कनिष्ठांच्या उद्धाराचा खरा मार्ग आहे. याच्या उलट कनिष्ठांच्या सेवेला श्रेष्ठांना लावणे म्हणजे श्रेष्ठांपुढें कनिष्ठांचा आदर्श ठेवणे होय. यानें समाजाची प्रगति होत नाही. पुढच्या आदर्शाप्रमाणे लोक बनतात. पुढच्यांना गांठण्याकरितां मागचे लोक झपाट्यानें चालू लागतात, म्हणून पुढच्यांना मागें खेचू नये. अनेक कालच्या प्रगतिपर जीवनाचे ‘ वर्णाश्रम ‘ हे टप्पेच होत.

अमात्यानुपधातीतान्पितृपैतामहाञ्छूचीन् । 

श्रेष्ठाञ्छ्रेष्टेषु कच्चित्ते नियोजयासि कर्मसु ||२६||

भरता ! मंत्रीजन धर्मात्मे आहेत की अर्थातुर आहेत, मुक्त आहे की कामी आहेत, प्रामाणिक आहेत की लबाड आहेत, स्वामीभक्त आहेत की स्वामीद्रोही आहेत, राष्ट्राचे संवर्धक आहेत की राष्ट्राला पिळून आपली पोळी पिकविणारे आहेत, राष्ट्राचे हित पाहातात की आपल्या पोळीवरच तूप ओढून घेतात हे नीट परीक्षून जातिनीति व कुलपरंपरा यांनी श्रेष्ठ असणाऱ्या वेदवेत्त्यांनाच अमात्यादि सर्व श्रेष्ठ अधिकारावर नेमतोस ना ? नेमल्यानंतरहि त्यांच्या चारित्र्याकडे दृष्टि ठेवतोस ना ? सर्व खात्यांतून त्या त्या खात्यांना अनुरूप अशा योग्य माणसांचीच निवड झाली पाहिजे. मोठमोठी कामे करून दाखविलेल्यांचा आदर करून त्यांना बक्षिसे दिल्याने मोठमोठ्या कार्याची धमक समाजांतून वाढते व गुणाचा गौरव केल्यासारखा होतो व सत्कार्यांना प्रोत्साहन मिळते. गुणांचा गौरव केला पाहिजे; तसें नाहीं केलें तर समाजांतून सद्गुणांची वाढ होत नाही. महिन्याचे शेवटीं प्रत्येकाला त्याचे त्याचे योग्य वेतन मिळेल अशी राज्यांतून व्यवस्था ठेवावी. वेळेवर पगार न मिळाल्यास कर्जाऊ अथवा उसनवार पैसे काढावे लागतात. तेहि सर्वांनाच मिळतात असे नाहीं; न मिळाल्यास उपासमार होते. मिळाल्यास व्याजाचे पैसे पगारांतून खर्च होऊन कुटुंबाचा खर्च भागत नाही. आणि मग ‘दारिद्र्यदोषाञ्च करोति पापं : दारिद्र्यामुळे लांच खाण्याची संवय लागते आणि असे लोक इतर फंदांत पडतात. पगार भरपूर ठेवावेत. राष्ट्रीयत्वाची भावना उत्पन्न करावी. राष्ट्राच्या पैशाचा विनियोग योग्य व्हावा ही भावना प्रत्येकांत उत्पन्न व्हावी. नैतिक शिक्षणानें हृदयाची पातळी सर्वसम, प्रामाणिक व परम पवित्र व्हावी लांचलुचपतीचा प्रतिबंधक कायदा करणारे व ती चालू नये म्हणून त्यावर नेमले जाणारेच लांच खाणारे झाले, धर्म शिकविणारेच अधर्मी बनले व नौतीचे धडे गिरवावयास लावणारेच अनीतीनें वागूं लागले म्हणजे सर्व कारभारच आटोपला. समाज सुधारण्याची जोखीम घेऊन वागणाऱ्या मंडळींचेंच गलिच्छ आचरण झाल्यानंतर समाज सुधारण्याची आशाच नको. असें न होईल अशी पूर्वीपासूनच काळजी घेत आले पाहिजे. योग्य न्याय, तोहि त्वरित मिळण्याची व्यवस्था राज्यांतून सर्वत्र असावी. अर्ज केलेल्या मनुष्याच्या अर्जाचा निकाल त्याच्या निधनानंतर मिळाल्यास त्याचा काय उपयोग

कच्चिन्नोग्रेण दण्डेन भृशमुद्विजते जनाः । 

राष्ट्र तवावजानन्ति मंत्रिणः कैकयीसुत ||२७||

अधिकाऱ्यांच्या स्वार्थपरतेमुळे अथवा अपराधाची शिक्षा म्हणून त्यांनी दिलेल्या अत्युग्र दण्डानें प्रजा पुनः पुनः उद्विग्न होते की काय म्हणून तुझे मंत्री फार बारकाईने पाहात असतात ना अपराध करणाऱ्यांना उग्र शिक्षा देणें हें एक दुष्ट वृत्तींना आळा घालण्याचे तात्कालिक साधन झालें तरी ती प्रवृत्तीच घालवून टाकण्याकरितां त्याच्या अंतःकरणाचें परिवर्तन करणारे नीतिशिक्षण त्यांना देणें अवश्य असते. स्त्रीजित, लोभी व सज्जन बहिष्कृत निंद्य आचरणाचे असे राष्ट्रांत कोणी असूच नये. मूलत:च समाज उत्कृष्ट व्हावा म्हणून बाल्यावस्थेपासूनच पृथक् पृथकपर्णे स्त्रीपुरुषांना तत्तदनुसार नीति, धर्म इत्यादिकांचे उच्च शिक्षण देऊन राष्ट्राच्या अंतःकरणाची भूमिका पवित्र राखणे अधिक हिताचें होतें.

उपायकुशलं वैद्यं भृत्यं संदूषणे रतम् । 

शूरमैश्वर्यकामं च यो न हन्ति स हन्यते ||२९||

–रोगाचे निदान करणे, त्याला अनुरूप अशा औषधाची निवड करणें व योग्य अनुपानावर रोग्यास ठेवणें हें ज्या वैद्यास माहीत नसतें त्या वैद्यास, स्वामीनिंदक सेवकास व ऐश्वर्याच्या पाठीमागे लागलेल्या सेनापति आदि शूरवीरांस जो नाहीसे करीत नाही, त्याचें जीवित यांचेपासून धोक्यांत येतें.

कश्चिदृष्टश्च शूरश्च धृतिमान्मतिमाञ्छुचि: । 

कुलीनश्चानुरक्तश्च दक्षः सेनापतिः कृतः ||३०|| 

बलवन्तश्च कच्चित्ते मुख्याः युद्धविशारदाः । 

दृष्टा पदानां विक्रान्तास्त्वया सत्कृत्य मानिताः ॥३१॥ 

काच्चिद्वलस्य भक्तं च वेतनं च यथोचितम् । 

संप्राप्तकालं दातव्यं ददासि न विलम्बसे ॥३२॥ 

कालाति क्रमणाच्चैव भक्तवेतनयोर्भृताः । 

भर्तुरप्यात कुप्यन्ति सोऽनर्थः सुमहान्स्मृतः ॥३३॥

-भरता ! धष्ट, पुष्ट, शूर, धीर, युक्ति-बुद्धि-बलसंपन्न, निग्रही, जितेंद्रिय, पवित्र, कुलीन, निःसीम स्वामीभक्तीचा, अतिदक्ष असा सेनापति हवा. तुझा सेनापति असाच आहे ना ? तुझे युद्धविशारद असे मुख्य अधिकारी बलिष्ठ असून आलेल्या आपत्तीचें झपाट्याने निवारण करण्यांत अति कुशल, बुद्धिमान व शूर असे आहेत ना ? योग्य सन्मानानें अशांचा गौरव तूं राखतोस ना ? सैनिकांना व सर्व इतर खात्याचे अधिकारी व चाकरनौकर यांना अन्नवेतनादि वेळच्यावेळी पोहोचण्याची व्यवस्था राज्यांतून ठेवली आहेस ना ? विलंब होत नाहीं ना ? अन्नाच्छादन, वेळच्या वेळी पोहोचली नाहीत म्हणजे पोपिंद्यावरच पोष्य वर्ग तुटून पडावयाला मार्गे पुढे पाहात नाहीं, हा फार मोठा अनर्थ.

home-last-sec-img